प्रत्येक क्षेत्रात देशाच्या अर्थकारणाचे चमकदार आकडे येत आहेत. जगाच्या तुलनेत भारत आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतोय, असा विश्वास जागतिक वित्तसंस्था व्यक्त करत आहेत. तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेरिका दौऱ्यात भारताच्या अर्थकारणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असे विधान करावेसे वाटते, ही बाब गंभीर आहे. जीडीपीच्या शर्यतीत भारत चीनला मागे टाकणार अशी चर्चा असताना, राहुल गांधी ही विधाने का करत आहेत? वडिलांच्या मांडीवर कोण बसायचे हे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. राहुल कोणाच्या मांडीवर बसून ही विधाने करत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जग त्यांना गंभीरपणे घेत असेल का? त्यांच्या बोलण्याचा नेमका काय परिणाम होतो आहे, याचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे. त्यांची विधाने बिनडोक असली तरीही त्याला उत्तर देणे भाग आहे. राहुल गांधी बहुचर्चित अमेरिका दौऱ्यावर आहेत. कोलंबिया विद्यापीठात एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अकलेचे तारे तोडले आहेत. लिडीया पॉलग्रीन या महिला पत्रकाराने ही मुलाखत घेतली. भारताबाबत सतत नकारात्मक लिखाण करणाऱ्या विदेशातील डाव्या-लिब्रांडू टोळीत लिडीया यांचे नाव येते. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यानिमित्त या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. भारताला पाण्यात पाहणारे, हिंदूंचा द्वेष करणारे, संघ-भाजपाच्या नावाने बोटे मोडणारे लोक राहुल गांधी यांच्या आसपास दिसतात. त्यामुळे त्यांची ताजी भेट त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही.



