काश्मीरमधून गेल्या काही दिवसांपूर्वी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. तबरक हुसैन असे या दहशतवाद्याचे नाव आहे. या दरम्यान झालेल्या गोळीबारात हुसैन हा जखमी झाला होता. त्यानंतर त्याला लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. भारतीय जवानांनी त्याचा प्राण वाचवण्यासाठी रक्तदान देखील केले होते. दरम्यान या दहशतवाद्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सोमवार, ५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने ताब्यात घेतला.
गेल्या दोन दशकांत प्रथमच पाकिस्तानने कोणा दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तबरक हुसैन असे या ३२ वर्षीय पाकिस्तानी हस्तकाचे नाव असून पाकिस्तानचा हा प्रशिक्षित हस्तक लष्कर-ए-तोयबाच्या एका गटाला दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण देत होता. राजौरी जिल्ह्यातील एका लष्करी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि काल त्याचा मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आला.
हुसैन हा पाकव्याप्त काश्मीरमधील सब्जकोट गावचा रहिवासी होता. गेल्या महिन्यात त्याने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता. तर त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
हे ही वाचा:
लिज ट्रस लवकरच घेणार ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ
अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार
‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैन याचा मृतदेह भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ताब्यात दिला आहे. पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील चाकण दा बाग या ठिकाणी पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांच्या समक्ष हा मृतदेह पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्वीकारला. विशेष म्हणजे पाकिस्तानने भारताकडून एखाद्या दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारल्याची ही घटना गेल्या दोन दशकांहून अधिक काळातील पहिलीच घटना असावी, अशी शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.







