30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरसंपादकीयराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ताटातले वाटीत

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ताटातले वाटीत

ज्या राज्यात भाजपाची शक्ती आहे, तिथे ही यात्राच नाही.

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. १५० दिवसांच्या ३५७० किमी अंतराच्या या यात्रेच्या निमित्ताने राहुल पक्षामध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्यामुळे काँग्रेसने भारत जोडोच्या माध्यमातून षड्डू ठोकले आहेत.

भाजपा आणि रा.स्व.संघ हे देश तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण भारत जोडो यात्रेवर निघालो आहोत. असे राहुल यांनी सांगितले आहे. निशाणा भाजपा आणि संघावर आहे, असा राहुल यांचा दावा असला तरी त्यांच्या यात्रेचे एकूण वेळापत्रक पाहून राजकीय विश्लेषकांनी, नेत्यांनी या यात्रेवर अनेक प्रश्न चिन्ह लावली आहेत. यात्रेची सुरूवात तामिळनाडूतून झाली. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्तान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू कश्मीर या राज्यातून ही यात्रा जाणार आहे.

लोकसभेच्या केवळ २० जागा असलेल्या केरळमध्ये राहुल गांधी २० दिवस देणार आहेत आणि ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात फक्त २ दिवस, अशी राहुल गांधी यांची मास्टर स्ट्रेटेजी आहे, अशी खिल्ली केरळ भाजपाचे नेते के. सुंदरन यांनी उडवली आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे राहुल को प्रधानमंत्री पद से जोडो आणि रॉबर्ट वाड्रा को पार्टी से जोडो यात्रा आहे.
हे दोन्ही नेते भाजपाचे असल्यामुळे ते काँग्रेसवर स्वाभाविकपणे टीका करणार असे गृहीत धरले तरी काँग्रेससोबत पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काम करणारे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.

यात्रेतील बराच काळ राहुल ज्या दक्षिणेतील राज्यात असतील त्या राज्यांमध्ये भाजपाची ताकद क्षीण आहे. केरळ, तामिळवाडू आणि तेलंगणामध्ये त्यांची लढाई भाजपासोबत नाही. इथे काँग्रेस जी मतं घेईल ती भाजपाची मतं नसतील. यूपीएतील पक्षांची मतं काँग्रेसच्या झोळीत पडणार आहेत. त्यामुळे भाजपाला काय तोटा होणार? ज्या राज्यात भाजपाची ताकद आहे, त्या उत्तर प्रदेशात ही यात्रा केवळ नावापुरती जाणार आहे. तिच स्थिती गुजरात, आसाम या राज्यात. त्यामुळे काँग्रेसला आव्हान नेमकं कोणाला द्यायचे आहे, असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भाजपाच्या विरोधात आघाडी तर हवी आहे, परंतु त्यात त्यांना काँग्रेस नको आहे. उलट नीतेश कुमार काँग्रसच्या समावेशासाठी आग्रही आहेत. यात्रेचे नियोजन करताना या बाबी सुद्धा ध्यानात घेतल्या आहेत का, हा प्रश्न पडावा. दक्षिण भारतातील ज्या पास्टर जॉर्ज पोनय्या याला राहुल भेटले तो भारतविरोधी वक्तव्यांसाठी कुख्यात आणि हिंदूविरोधी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दक्षिण भारतात वाढत्या धर्मांतरामुळे फुगलेल्या ख्रिस्ती मतांवर काँग्रेसचा डोळा आहे, अशी शंका घ्यायला वाव आहे.

हे ही वाचा:

मुले पळवणाऱ्या अंजनाबाई गावित घटनेची भयंकर आठवण पुन्हा झाली ताजी, पण

बारामतीचे अझीम ओ शान शहंशाह!

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

ज्ञानवापी मशिदीत हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार अबाधित

 

राहुल ज्या विखारी पद्धतीने संघाला टार्गेट करीत आहेत, त्यामुळे अल्पसंख्यांक मतांकडे त्यांचे लक्ष आहे, यावर शिक्कामोर्तब होते आहे. पंडीत नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत गांधी परिवारातील प्रत्येक पंतप्रधानाने संघावर चिखलफेक केली. परंतु त्याचा काँग्रेसला काहीच लाभ झाला नाही. उलट संघाला समाजाची सहानुभूती मिळाली, संघ वाढतच राहिला. परंतु इतका सारासार विचार करण्याइतपत प्रगल्भता राहुल यांच्याकडे नाही. त्यामुळे या संपूर्ण यात्रेमध्ये काही निश्चित उद्दीष्ठ ठेवून काँग्रेस चालते आहे, असे दिसत नाही.

भाजपाला आव्हान देण्याच्या मनस्थितीत काँग्रेस नाही, हाती नाही ते खेचून आणण्यापेक्षा आहे ते टिकवण्यासाठी ही यात्रा आहे की काय असा प्रश्न पडतो तो त्यामुळेच. राहुल यांचे नाव पंतप्रधान पदाशी जोडण्यासाठी ही यात्रा आहे, असे शहजाद पूनावाला म्हणतायत. परंतु त्यातही तथ्य वाटत नाही. सध्या गांधी परिवाराला मिळणाऱ्या पक्षांतर्गत आव्हानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आपले अस्तित्व टिकवणे आणि जमल्यास रॉबर्ट वाड्रा यांना पक्षात रुजवणे हीच राहुल यांच्या दृष्टीने यात्रेची फलश्रुती आहे. त्यामुळे ही यात्रा भारत जोडो कमी आणि यूपीए तोडो, हिंदू झोडो जास्त आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा