29 C
Mumbai
Monday, September 12, 2022
घरसंपादकीयबारामतीचे अझीम ओ शान शहंशाह!

बारामतीचे अझीम ओ शान शहंशाह!

Related

दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारीणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या खांद्यावर पक्षाने पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पवारांना संजय राऊत यांची कमी मात्र नक्कीच जाणवली असणार. पवार आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असे एकाच वेळी वाटणारा आणि मीडियाकडे हे ठणकावून सांगणारा दुसरा नेता भारतात अस्तित्वात नाही.

अध्यक्ष पदासाठी पवारांचा एकमेव अर्ज आला. पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध निवड पार पडली. गेल्या २४ वर्षांत काँग्रेस पक्षात निवडणुका झाल्या नाहीत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आलटून पालटून पक्षाचे अध्यक्ष पद भूषविले. हे असामान्य कर्तृत्व आहे. परंतु पवारांच्या तुलनेत हे काहीच नाही. स्वत:च स्थापन केलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम पवार गेल्या २३ वर्ष सातत्याने करतायत. पवार यांची लोकप्रियता गिनेज मध्ये नोंदवण्याच्या लायकीची आहे.

खरे तर महाराष्ट्रातील चार खासदार आणि ५४ आमदार ही पवारांच्या पक्षाची ताकद. परंतु पक्ष राष्ट्रीय असल्यामुळे त्यांनी कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली. सध्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपासमोर मजबूत आघाडी बनवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीत जदयूचे नीतीश कुमार, टीआरएसचे चंद्रशेखर राव, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल या चार काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. या पक्षाच्या राजकीय ताकदीच्या तुलनेत पवार आसपासही नाहीत, परंतु तरीही ते शहंशाह आहेत. हे त्यांचे वैशिष्ट्य. उर्दूत याला बेताज बादशहा म्हणतात. शहंशाह असल्यामुळे ते तहहयात पक्षाचे अध्यक्ष असू शकतात. दिल्लीत बैठकीचे आयोजन करून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.

पवार हेच यूपीएला नेतृत्व देऊ शकतात. तेच नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे पंतप्रधान पदाचे एकमेव उमेदवार आहेत, असे ठाम मत असलेले संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. त्यांची कमतरता लक्षात घेऊन पवारांच्या एण्ट्रीच्या वेळी अझीम ओ शान शहंशाह हे गाणं वाजवण्याचा निर्णय सर्वानुमते झाला असावा. कार्यकारीणीच्या बैठकीत पक्षाची कार्यक्रम पत्रिका मांडली जाते, ध्येयधोरणांवर चर्चा होते. त्यानुसार कार्यकारिणीत भाजपाला झोडणारी भाषणे झाली. कारण भाजपाविरोध हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव कार्यक्रम आहे.

पक्षाच्या कार्यक्रमापेक्षा गाजले पवारांच्या एण्ट्रीच्या वेळी अधिवेशनात वाजलेले अझीम ओ शान शहेनशाह हे गाणे. पवार हे महाराष्ट्रात स्वत:ला जाणते राजे म्हणवून घेतात. छत्रपती शिवरायांना हे बिरुद समर्थ रामदासांनी दिले असल्यामुळे शिवरायांना जाणते राजे म्हणू नये, असा फतवा पवारांनी काही वर्षांपूर्वी काढला होता. परंतु महाराष्ट्रात लागणाऱ्या पोस्टर बॅनरवर त्यांच्या पक्षाचे लोक मात्र त्यांचा उल्लेख जाणता राजा असाच करीत असतात. कारण शिवरायांना जाणता राजा म्हणू नका असा पवारांचा फतवा आहे, त्यांना स्वत:ला म्हटलेले चालणार नाही असे काही पवार म्हणालेले नाहीत.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी पवारांना साडे तीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शहंशाह म्हटले आहे. परंतु साडे तीन जिल्ह्याचे असले तरी ते शंहशाह आहेत, हे भातखळकर यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पवार स्वत:ला महाराष्ट्रात जाणता राजा म्हणवतात, परंतु दिल्लीत गेल्यावर मात्र त्यांना मुघल शहंशाह म्हणवण्याचा मोह का होतो?
पवार कायम शाहु, फुले, आंबेडकरांचे नावे घेतात. परंतु छत्रपती शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत, असा आक्षेप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेतल्यापासून त्यांच्यात बदल झाला आहे. दिल्लीत त्यांनी छत्रपतींचे नाव घेतले. आश्चर्य म्हणजे पेशव्यांचेही कौतुक केले. पेशव्यांचा स्वर्गस्थ आत्मा धन्य धन्य झाला असेल.

हे ही वाचा:

लघु शंकेमुळे येते दीर्घ शंका

दादर, प्रभादेवीत का होतोय राडा?

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

मुंबईतल्या वसतिगृहातून सहा मुली पळाल्या

 

अल्पसंख्यकांच्या मतांमुळे आपण सत्तेवर आलो, असे पवार २०२० मध्ये एका भाषणात म्हणाले होते. त्यामुळे जाणता राजा म्हणण्यापेक्षा शहंशाह म्हणवून घेणे त्यांच्यासाठी जास्त सोयीचे आहे. पवांराना शहंशाह म्हटलं तर भाजपा नेत्यांच्या पोटात का दुखते? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. भाजपाची मुस्लिम विरोधी भूमिका यामुळे उघड झाली आहे, असेही ते म्हणाले. एकवेळ ब्राह्मण विरोधी भूमिका चालेल, पण मुस्लिम विरोधी भूमिका मात्र खपवून घ्यायला मिटकरी अजिबात तयार नाही. कारण प्रश्न मतांचा आहे.

बाकी कार्यकारिणीत अजित पवार यांना बोलू दिले नाही म्हणून ते नाराज झाले असे म्हणतात. शिंदे सरकारचे मंत्री इतक्या वेळा रूसतात, जेवढ्या महिलाही रुसत नसतील, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. अजित पवारांबाबतही त्यांचे हेच मत आहे का हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल. दादा लघू शंकेला गेले होते, म्हणून आपण भाषण केलं असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. दादांच्या बाबतीत लघू शंकेचा काय योगायोग आहे, देव जाणे. गेल्या वेळीही धरणातल्या लघू शंकेमुळे ते अडचणीत आले होते. दिल्लीतही पुन्हा त्याच मुळे. दिल्लीतील कार्यकारिणीमुळे बारामतीच्या राजकारणात पडसाद उमटणार हे मात्र नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,942चाहतेआवड दर्शवा
1,914अनुयायीअनुकरण करा
34,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा