28 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरधर्म संस्कृतीकाय भगवद्गीता ‘जिहाद’ ची शिकवण देते ? !

काय भगवद्गीता ‘जिहाद’ ची शिकवण देते ? !

काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी भगवतगीतेवर केलेल्या वक्तव्याने खळबळ

Google News Follow

Related

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील यांनी नुकतेच असे विधान केले, की ‘जिहाद’ ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मांत ही आहे. शिवराज पाटील यांनी ‘जिहाद विषयी बोलताना म्हटले, की “हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल, आणि ते कुणी मान्य करत नसेल, तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणातच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मात ही हेच सांगितले आहे.” (!)

‘जिहाद’ ची संकल्पना इस्लाम मध्ये इस्लामच्या प्रसाराशी, सगळे जग इस्लामच्या सत्तेखाली आणण्याशी निगडीत आहे, हे सर्वज्ञात आहे. “इस्लामचा प्रसार“ हा शिवराज पाटील यांना “चांगला हेतू” वाटत असावा, हे उघडच आहे ! इस्लामला अभिप्रेत असलेला ‘धर्मप्रसार’ हिंदू धर्माला कधीही मान्य नव्हता, अपेक्षित नव्हता. त्यामुळे ‘धर्मप्रसार’ या हेतूने ‘जिहाद’ (धर्मयुद्ध) ही संकल्पना हिंदू धर्मात नाहीच. तथापि, ‘अन्यायाविरुद्ध लढा’, ‘दुष्ट दुर्जनांचा विनाश’, ‘अधर्माचा नाश’, या अर्थाने पहायचे झाले, तर असे म्हणावे लागेल, की “होय. त्या अर्थाने ‘धर्मयुद्धाची’ संकल्पना भगवद्गीतेत आहे!

महाभारतीय युद्धाचा आरंभ हा पांडवांवर झालेल्या अन्यायातूनच झालेला आहे. युधिष्ठिर स्वतः पंडू राजाचा ज्येष्ठपुत्र (धृतराष्ट्राच्या दुर्योधनापेक्षाही ज्येष्ठ) असूनही, आंधळ्या पुत्रप्रेमापोटी दुर्योधनाला युवराजपद दिले गेले, पुढे त्याची राज्यलालसा वाढत गेली. ती इतकी, की पांडव राजपुत्र केवळ पाच गावे घेऊन आपला बाकीचा सर्व अधिकार सोडायला तयार होऊनही, दुर्योधनाने तसे करण्यास साफ नकार दिला. “सुईच्या अग्रावर मावेल एव्हढी भूमीही मी देत नाही” – हे त्याचे उद्गार प्रसिद्ध आहेत ! ह्याची परिणती शेवटी पांडवांना आपला न्याय्य हक्क मिळवण्यासाठी युद्ध करावे लागण्यात झाली.

इथे आपण ‘भगवद्गीतेतील धर्मयुद्ध’ या संकल्पनेपाशी येतो. होय, भगवद्गीता अन्यायाविरुद्ध लढण्याचा, प्रसंगी आपल्या स्वजनांशी, बांधवांशी, इतकेच नव्हे तर वयोवृद्ध, मार्गदर्शक, गुरुजन, यांच्याशीही लढण्याची तयारी ठेवण्याचा स्पष्ट उपदेश देते. धर्मयुद्धा किंवा जिहाद या संकल्पनेशी जुळणारा उपदेश गीतेत कुठे कुठे आढळतो, ते पाहू :

अध्याय दुसरा (श्लोक ३१ ते ३७) :

पहिल्या अध्यायात (अर्जुन विषादयोग) युद्धासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये अर्जुन जेव्हा आपले स्वतःचे नातेवाईक – “आजे, काके तसे मामे सासरे सोयरे सखे ……गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे “ (अध्याय १, श्लोक २६) पाहतो, तेव्हा तो अत्यंत विषादग्रस्त  होतो. “कृष्णा स्वजन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी …..गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडे (अध्याय १, श्लोक २८) हे कौरव किती झाले तरी आमचे भाऊच आहेत; ह्यांना मारून आमचे काय भले होणार ? ह्यांना मारून आम्हास पापच लागेल – असे विचार अर्जुनाला त्रस्त करतात. त्यांचे निराकरण करणारा स्पष्ट उपदेश दुसऱ्या अध्यायात श्लोक ३१ ते ३७ मध्ये आहे, जो ‘धर्मयुद्ध’ संकल्पनेशी खूप मिळता जुळता म्हणता येईल.

स्वधर्म तो ही पाहूनी न योग्य डगणे तुज I धर्मयुद्धाहूनी काही क्षत्रियास नसे भले II
प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे I क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे II
हे धर्मयुद्ध टाळुनी पापांत पडशील तू I स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुनिया स्वयें II
अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी I मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी II

2

भिऊनि टाळीले युद्ध मानितील महारथी I असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की II
बोलीतील तुझे शत्रू भलते भलते बहु I निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद II
मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही तळ I म्हणुनी अर्जुना ऊठ युद्धास दृढ निश्चये II
(इथे श्रीकृष्ण अर्जुनाला धर्मयुद्धात मेलेला वीर सरळ स्वर्गात जातो, हेच सांगत आहे.)

अध्याय ३ श्लोक ३५

“उणा ही आपुला धर्म पर धर्माहुनी बरा I स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर II”
गीतेतील हा श्लोक प्रसिद्धच आहे. ह्याच गीतोपदेशानुसार छत्रपती संभाजी राजांनी चाळीस दिवस औरंगझेबाकडून अतोनात हाल सोसून मृत्यू स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारण्यास शेवटपर्यंत नकार दिला.

हे ही वाचा:

सोन्याच्या खरेदीने चेहरे उजळले

मेलबर्नमध्ये ‘विराट’ दीपोत्सव, पाकिस्तानविरोधात विजयाचे फटाके

केनियात बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची हत्या

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना KBC च्या सेटवर दुखापत

 

अध्याय ४ श्लोक ७, ८.

गळुनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना I अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे II
राखावया जगी संतां दुष्टा दूर करावया I स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी II
(इथे “विनाशाय च दुष्कृताम” चे भाषांतर खरे म्हणजे “दुष्टा नष्ट करावया” असे हवे, पण विनोबांनी ते
गांधीवादी अहिंसे नुसार “दुष्टा दूर करावया” असे केले आहे !)

ह्या गीता श्लोकांमध्ये अधर्माच्या, आणि दुष्ट दुर्जनांच्या विनाशाकरता वेळोवेळी भगवंत अवतार घेतो, ही कल्पना आहे. थोडक्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांत ‘धर्मासाठी लढण्याची’ जबाबदारी माणसांवर न टाकता, थेट भगवंतावर सोपवली आहे ! ह्यामुळे हिंदू धर्माचे किती नुकसान झालेले आहे, हा संशोधनाचा विषय ठरेल. इस्लामी जिहाद संकल्पनेत धर्म प्रसाराची जबाबदारी पूर्णतः माणसांवर (जिहादी मुस्लिमांवर) सोपवली आहे. आज जगात सुमारे ५० राष्ट्रे ‘इस्लामिक’ आहेत. संपूर्ण जगात हिंदूंचा आपला म्हणावा असा भारत हा एकच देश आहे.

अध्याय १८ श्लोक १७

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता I मारी विश्व जरी सारे न मारीचि न बांधिला II
अठराव्या अध्यायातील ह्या श्लोकात भगवंत सांगतात, की बुद्धीत “अहंभाव” (Ego) नसेल, आणि अलिप्तता, तटस्थता असेल, तर एखाद्याने प्रचंड संहार केला, तरी त्याचा दोष त्याला लागणार नाही. बुद्धी स्वच्छ, निर्विकार, अलिप्त हवी. हेतू विषयी स्वच्छ, स्पष्टता हवी. अशा बुद्धीने एखाद्याने आपल्या इप्सित न्यायोचित कार्यासाठी मोठा संहार केला, तरी त्याला त्याचे ‘पाप’ लागणार नाही. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज असंख्य युद्धे लढले, त्यात प्रचंड संहार झाला. अर्थातच ते ‘पाप’ नव्हते. राजांना त्याचा किंचित ही दोष नाही. ही गीतेची शिकवण ‘धर्मयुद्धा’ शी जुळणारी म्हणता येईल.

(इथे संदर्भासाठी घेतलेले श्लोक मूळ भगवद्गीते ऐवजी विनोबांच्या ‘गीताई’मधील आहेत. हे समश्लोकी भाषांतर विनोबांनी केलेले प्रसिद्ध आहे. संस्कृतपेक्षा मराठी समजण्यास सोपे पडेल, या हेतूने गीताई मधील श्लोक घेतले आहेत.)

आजवर भगवद्गीतेचा अभ्यास, संशोधन, विवरण – पंडित मदन मोहन मालवीय, आचार्य विनोबा भावे, गांधीजी, महायोगी अरविंद, लोकमान्य टिळक, स्वामी रामसुखदास, ……अशा सारख्या अनेक संत महंत, विचारवंतांनी केले. त्यापैकी कोणीही शिवराज पाटीलांनी लावलेला जावई शोध लावलेला नाही. शिवराज पाटील यांनी उगीचच नको त्या विषयात हात घालून केवळ स्वतःच्या नसलेल्या विद्वत्तेचे प्रदर्शन मांडले, आणि हसे करून घेतले. मात्र त्यांचे सार्वजनिक जीवनातील स्थान लक्षात घेऊन, त्यांना योग्य उत्तर देणे गरजेचे वाटले, त्यासाठी हा लेख.

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद म्हणत, की हिंदूंनी अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. हिंदूंनी खरेच भगवद्गीतेतील ‘धर्मयुद्धा’चे विचार आत्मसात केले, तर ‘छद्म निधर्मितावाद’ किंवा ‘मुस्लीम धार्जिणेपणा’ संपुष्टात येईल.

-श्रीकांत पटवर्धन

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा