राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ हे राजकीय चरित्र मंगळवार, २ मे रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात अनेक राजकीय गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या पुस्तकात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंकडे राजकीय चातुर्याची कमतरता
राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बारकाईने माहिती असायला हवी, त्याची जाण असायला हवी. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच पावले उचलायला हवीत. त्यासाठी राजकीय चातुर्य हवं. पण, या सर्व बाबतीत कमतरता जाणवत होती, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना प्रशासकीय अनुभव कमी
उद्धव ठाकरेंना अनुभव नसल्यानं हे घडत असले, तरी ते टाळता आलं असतं. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्यात माघार घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे अशा काळातही सरकार कृतिशील राहिलं, अशी खोचक टीका शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या माघारीमुळे मविआ सरकार कोसळलं
‘महविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली. संघर्ष न करता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला,’ असं परखड मत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात केवळ दोनदा जाणं न पाचणारं
उद्धव ठाकरेंना काही शारीरिक समस्यांमुळे मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांच मंत्रालयात फक्त दोनदा जाणं फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक
काँग्रेसची आता बजरंगबलीला बंदिस्त करण्याची तयारी !
गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या विरोधातील गुन्ह्यांच्या फाईल्स गहाळ
नवा अध्यक्ष झाला तर काय अडचण आहे… अजित पवारांच्या भूमिकेमुळे सगळेच दचकले!
शिवसेनेत उठलेलं वादळ शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, अशी टीका करत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील कमी दाखवून दिली.
शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात त्यांचा राजकीय प्रवास उलगडला असून अनेक नेत्यांविषयी आपले अनुभव मांडले आहेत.







