जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट

मूडीज अ‍ॅनालिटिक्सचा इशारा

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट

जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल आता संथ वाढीकडे होत असल्याचा इशारा मूडीज अॅनालिटिक्सने दिला आहे. वाढते भू-राजकीय तणाव, महागाईचा दबाव, जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर केवळ २.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२७ मध्ये तो किंचित सुधारून २.८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट अद्याप दूर झालेले नाही.

मूडीजच्या अहवालानुसार, अमेरिका, चीन आणि युरोपसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढ जागतिक व्यापारावर परिणाम करत आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांमधील वाढती सावध भूमिका यामुळे उद्योग, उत्पादन आणि निर्यात क्षेत्रावर दबाव वाढला आहे. याचाच परिणाम भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आमीर खान म्हणतो की, फुनसुक वांगडू हे पात्र वांगचुक यांच्यावर आधारित नाही!

आत्मनिर्भर भारताचा नवा प्लॅन!

मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

वर्क-लाईफ बॅलन्स बिघडतोय? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असली तरी जागतिक मंदीचा परिणाम पूर्णपणे टाळता येणार नाही, असे मूडीजने स्पष्ट केले आहे. निर्यातीतील संभाव्य घट, परकीय गुंतवणुकीचा मंदावलेला वेग आणि जागतिक मागणी कमी झाल्यामुळे भारताच्या आर्थिक वाढीचा वेग काहीसा कमी होऊ शकतो. अहवालात भारत “एक पाऊल मागे पडू शकतो” असा उल्लेख करत जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

तथापि, या आव्हानांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र आशेचा किरण ठरत आहे. AI मध्ये वाढणारी गुंतवणूक, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती आणि उद्योगांमध्ये वाढणारा वापर यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे जागतिक आर्थिक वाढीला काही प्रमाणात आधार मिळू शकतो आणि मंदीचा प्रभाव कमी करण्यास हातभार लागू शकतो.

मूडीजने पुढे इशारा दिला आहे की, भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या किमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे महागाईवर दबाव कायम राहील आणि अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांना व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर ठेवावे लागू शकतात. याचा परिणाम उद्योगांमधील गुंतवणूक, ग्राहकांचा खर्च आणि रोजगार निर्मितीवर होण्याची शक्यता आहे.

एकूणच, जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर नसली तरी तिचा वेग लक्षणीयरीत्या कमी होत आहे. भारताची अर्थव्यवस्था तुलनेने मजबूत असली, तरी जागतिक परिस्थितीचा परिणाम टाळणे शक्य नसल्याने विकासाचा वेग काहीसा मंदावू शकतो. मात्र, तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि AI क्षेत्रातील वाढ भारतासाठी तसेच जगासाठी पुढील काळात मोठा आधार ठरू शकते.

Exit mobile version