29 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरबिजनेसमुहूर्त ठरला! 'एनएसई'चा आयपीओ येणार सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

मुहूर्त ठरला! ‘एनएसई’चा आयपीओ येणार सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

३० हजार कोटी उभारण्याची तयारी

Google News Follow

देशातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) बहुप्रतीक्षित प्राथमिक समभाग विक्रीचा (आयपीओ) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात एनएसईचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता असून, २५ सप्टेंबरच्या आसपास समभागांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने अर्थात सेबीने एनएसईच्या प्रस्तावित आयपीओला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एनएसईचा शेअर बाजारातील प्रवेश आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, एनएसई पुढील आठवड्यात आयपीओसाठी किंमत जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुमारे १५ सप्टेंबरपासून गुंतवणूकदारांसाठी आयपीओ खुला होऊ शकतो. एनएसईचे समभाग २५ सप्टेंबरच्या आसपास शेअर बाजारात नोंदविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नियामक प्रक्रिया आणि आयपीओच्या वेळापत्रकानुसार अंतिम तारखेत बदल होऊ शकतो.

एनएसईच्या माध्यमातून सुमारे ३० हजार कोटी रुपये उभारण्याचे नियोजन असून, कंपनीचे अंदाजे मूल्यांकन ५ लाख कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. एनएसईचे समभाग बीएसईवर नोंदविले जाणार आहेत. एनएसईने जूनमध्ये सेबीकडे प्राथमिक विवरणपत्र दाखल केले होते. ४ सप्टेंबर रोजी सेबीकडून अंतिम निरीक्षणे मिळाल्यानंतर आयपीओच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा अडथळा दूर झाला.

एनएसईचा प्रस्तावित आयपीओ हा पूर्णपणे विद्यमान भागधारकांकडून समभाग विक्रीचा व्यवहार असेल. विद्यमान भागधारक सुमारे १४.८९ कोटी समभागांची विक्री करणार आहेत. ही विक्री एनएसईच्या एकूण समभाग भांडवलाच्या जवळपास ६ टक्के आहे.

हे ही वाचा:

स्वतंत्र भारद्वाजला बुलंदशहरातून अटक

अ‍ॅडोबच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती

सेन्सेक्स ३६३ अंकांनी वधारला

रविवारी चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान ५ तासांचा जम्बो ब्लॉक

देशातील तसेच परदेशातील अनेक मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार या माध्यमातून एनएसईमधील आपला काही हिस्सा कमी करण्याची शक्यता आहे. मात्र, एनएसईच्या प्रमुख भागधारकांपैकी एक असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) या समभाग विक्रीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या समभाग विक्रीमध्ये भारतीय स्टेट बँक सर्वाधिक समभाग विकणारा भागधारक ठरण्याची शक्यता आहे. एसबीआयकडून २.४८ कोटी समभागांपर्यंत विक्री केली जाऊ शकते.

मॉरिशसमधील एमएस स्ट्रॅटेजिक सुमारे १.६ कोटी समभाग विकणार आहे, तर कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड जवळपास १.१९ कोटी समभागांची विक्री करणार आहे. याशिवाय अरांडा इन्व्हेस्टमेंट्स सुमारे १.१२ कोटी समभाग विकणार आहे. बँक ऑफ बडोदा आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रत्येकी सुमारे १.१ कोटी समभाग विकण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचाही या समभाग विक्रीत सहभाग आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि न्यू इंडिया ऍश्युरन्स प्रत्येकी एक कोटीहून अधिक समभाग विकणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी प्रत्येकी सुमारे ६० लाख समभागांची विक्री करतील.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के हिस्सा

एनएसईच्या प्राथमिक विवरणपत्रानुसार, आयपीओमधील ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय आयपीओनंतरच्या एनएसईच्या भरलेल्या समभाग भांडवलापैकी ५ टक्क्यांपर्यंत हिस्सा पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा