पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई दौऱ्यात भारताला मोठा आर्थिक आणि सामरिक लाभ मिळाला आहे. अबू धाबी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि यूएई यांच्यात संरक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सागरी क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. याशिवाय यूएईकडून भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर भारत आणि यूएई यांनी ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकट करण्यावर भर दिला. दोन्ही देशांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भारताच्या तेलसाठा व्यवस्थेला मजबुती मिळणार असून भविष्यातील इंधन तुटवडा आणि जागतिक तेलदरातील चढ-उतारांचा परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील रुग्णालयात IED बॉम्ब ठेवल्याप्रकरणी संशयित अटकेत
डॉलरऐवजी आता युआनमध्ये कर्ज; पाकिस्तानने पहिल्यांदाच जारी केला ‘पांडा बॉन्ड’
जालंधर बीएसएफ मुख्यालय स्फोट प्रकरणी टॅक्सी चालकाला अटक
कर्नाटकात जानवे, रुद्राक्ष, हिजाब सगळे एकच!
याशिवाय भारताला दीर्घकालीन एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठीही महत्त्वाचा करार करण्यात आला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यात झालेल्या या करारामुळे भारतातील घरगुती गॅस पुरवठा अधिक स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सध्या भारताच्या एलपीजी गरजांपैकी मोठा हिस्सा यूएईकडून पूर्ण केला जातो.
संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांनी मोठे पाऊल उचलले आहे. भारत आणि यूएई यांच्यात ‘स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप’ करार करण्यात आला. या कराराअंतर्गत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा संयुक्त विकास, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि दहशतवादविरोधी सहकार्य वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.
सागरी क्षेत्रात गुजरातमधील वाडीनार येथे ‘शिप रिपेअर क्लस्टर’ उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या प्रकल्पामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी लॉजिस्टिक आणि जहाज दुरुस्ती उद्योगाला चालना मिळणार आहे.
यूएईने जाहीर केलेली ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय पायाभूत सुविधा प्रकल्प, आरबीएल बँक आणि समन कॅपिटलमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यामुळे भारत-यूएई संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता संरक्षण, ऊर्जा आणि आर्थिक सहकार्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे मानले जात आहे.0







