आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोमवारी (२५ मे) सकाळच्या व्यवहारात बीएसईचा सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी वाढून ७६,२७५ या पातळीवर पोहोचला. तर एनएसईचा निफ्टी २५० हून अधिक अंकांनी वाढून २३,९७३.१५ वर व्यवहार करत होता. त्यामुळे निफ्टी पुन्हा एकदा २४,००० या महत्त्वाच्या पातळीच्या जवळ पोहोचला.
बाजारातील तेजीमागील प्रमुख कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली सुमारे पाच टक्क्यांची घसरण. वृत्तानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याबाबत तत्त्वतः सहमती झाली आहे. मात्र, अंतिम कराराच्या तपशीलांवर अद्याप चर्चा सुरू असून अमेरिकेची नौदल नाकेबंदी पूर्णपणे हटविण्यात आलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, “कराराचा मोठा भाग निश्चित झाला असून त्याला अंतिम स्वरूप देणे बाकी आहे. यामध्ये अमेरिका, इराण आणि इतर संबंधित देश सहभागी आहेत.”
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. हा मार्ग खुला होण्याच्या शक्यतेमुळे तेलपुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. WTI (West Texas Intermediate) क्रूड फ्युचर्स जवळपास ५ टक्क्यांनी घसरून ९१.६५ डॉलर प्रति बॅरलवर आले. तर ब्रेंट क्रूडच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी घसरून ९८.३० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होत्या. कॉमेक्सवर कच्चे तेल ४.९३ टक्क्यांनी घसरून ९१.८४ डॉलर प्रति बॅरलवर आले. तेलाच्या किमती घसरल्याचा सर्वाधिक फायदा ऑइल मार्केटिंग कंपन्यांना (OMCs) झाला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. स्वस्त कच्च्या तेलामुळे या कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जिलेटिन स्टिक सापडल्याप्रकरणी सहा पोलिस निलंबित
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील बायो-रिमेडिएशन अंतिम टप्प्यात; ६० एकर जमीन होणार पुनर्प्राप्त
पुनर्वसनाबाबत अनिश्चितता; दिल्ली जिमखाना क्लबची सरकारकडे ‘ही’ विनंती
जम्मू- काश्मीरमधील ११६ अमली पदार्थ तस्करांचे पासपोर्ट होणार रद्द
आशियाई बाजारांमध्येही सकारात्मक वातावरण दिसून आले. Nikkei 225 निर्देशांकाने प्रथमच ६५,००० चा टप्पा ओलांडत विक्रमी उच्चांक गाठला. सोमवारी हा निर्देशांक २.७५ टक्क्यांच्या वाढीसह ६५,०८१.९६ वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांकात ०.६५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातील बाजार सार्वजनिक सुट्टीमुळे बंद होते.
