केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले की, गुजरातमधील तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये पायलट उत्पादनाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि आयटी मंत्री अर्जुन मोढवाडिया यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये उभारले जात असलेल्या चारही सेमीकंडक्टर प्रकल्पांचा आढावा घेतला.
आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले, “चारही प्रकल्पांवर काम अत्यंत वेगाने सुरू आहे. कायन्स आणि सीजी यांच्या प्रकल्पांमध्ये पायलट उत्पादन सुरू झाले आहे आणि पुढील दोन ते तीन महिन्यांत उत्पादन वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, मायक्रोनच्या मिनी प्लांटमध्ये पायलट उत्पादन आधीपासूनच सुरू आहे आणि लवकरच उत्पादनात आणखी वाढ होईल.
हेही वाचा..
ट्रम्प यांनी नायजेरियावर हल्ल्याचा नाही केला इन्कार
“पाकिस्तान, चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत!” ट्रम्प यांचा गौप्यस्फोट
नक्षलवाद संपला, बिहारच्या चोरमाराचे गावकरी करणार मतदान!
विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी
केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, धोलेरा येथे उभारत असलेल्या फॅब प्रकल्पावरही झपाट्याने काम सुरू आहे. आगामी काळात धोलेरा हे उच्च-तंत्रज्ञान उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनेल. देशभरात अनेक सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जात आहेत. पहिली मेड-इन-इंडिया २८-९० एनएम चिप लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात नॅनोमीटर (एनएम) ही मोजमापाची एकक असून, त्याचा आकडा जितका लहान तितके ट्रान्झिस्टर डिझाईन अधिक संक्षिप्त होते. त्यामुळे उत्पादकांना एका चिपवर अधिक ट्रान्झिस्टर बसवणे शक्य होते. २८-९० एनएम चिपचा वापर ऑटोमोबाईल, दूरसंचार, वीज आणि रेल्वे यांसारख्या क्षेत्रांत केला जातो.
यापूर्वी, शनिवारी केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी ओडिशातील भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली परिसरात सिक्सेम प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपाऊंड सेमीकंडक्टर फॅब आणि एटीएमपी सुविधेच्या भूमिपूजन आणि ग्राउंडब्रेकिंग समारंभात सहभाग घेतला होता. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, मागील ११ वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहापट वाढले असून निर्यात आठपट वाढली आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स हे भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा सेमीकंडक्टर सुविधांमुळे ओडिशा लवकरच या वाढीच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्य बनेल.







