29.2 C
Mumbai
Tuesday, May 19, 2026
घरक्राईमनामासहाय्यक पालिका आयुक्त की गँगस्टर?

सहाय्यक पालिका आयुक्त की गँगस्टर?

सहाय्यक पालिका आयुक्त महेश-पाटील कथित फसवणूक प्रकरण

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी महेश पाटील आणि इतरांविरोधात तब्बल १६ ते १८ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा मालमत्ता कक्ष सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

तक्रारीनुसार, २०२४ पासून वांद्रे पश्चिमेतील पुनर्विकास प्रकल्पात मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. महेश पाटील यांनी स्वतः पालिकेतील अधिकारी असल्याचा प्रभाव वापरत गुंतवणूक सुरक्षित असल्याचा विश्वास दिला, असा आरोप करण्यात आला आहे. “मी पालिकेत अधिकारी आहे. कोणत्या जागेची किंमत भविष्यात वाढेल हे मला माहिती असते,” असे सांगून गुंतवणूकदारांना विश्वासात घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

हबीबा जाफरी यांच्या तक्रारीनुसार, या व्यवहारात तब्बल १५.३३ कोटी रुपये ऑनलाइन व्यवहारांद्वारे घेण्यात आले. याशिवाय मोठी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. महागडी घड्याळे, विदेशी चलन तसेच मालमत्ता विकण्यास भाग पाडल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात फक्त आर्थिक फसवणूकच नव्हे, तर लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारी पदाचा वापर झाल्याचा आरोप असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूळ विकासकानेच महेश पाटील आणि संबंधित आरोपींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. जाफरी कुटुंबाने थेट विकासकाकडे चौकशी केली असता, “आमचा या लोकांशी काहीही संबंध नाही आणि अशा प्रकारची कोणतीही अधिकृत गुंतवणूक आमच्या प्रकल्पात झालेली नाही,” असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे कथित बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने आणि दिशाभूल करून पैसे उकळल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

तक्रारीत आरोपींनी बनावट सरकारी नोंदणी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये जावेद जाफरी, नावेद जाफरी, उस्मान खान, हॅपीनेस इन्व्हेस्टमेंट्स, लोंगी फर्नांडिस आणि शबाना फर्नांडिस यांनाही गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कथित घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, व्यावसायिक निशित पटेल यांनी यापूर्वीच महेश पाटील यांच्यावर तब्बल ८० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनुसार, आयएएस, आयपीएस अधिकारी, पालिका अधिकारी, कलाकार, व्यावसायिक आणि निवृत्त न्यायाधीश यांच्यासह अनेकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

निशित पटेल यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, त्यांना कार्यालयात डांबून ठेवण्यात आले, मारहाण करण्यात आली आणि बाऊन्सरच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या. बंदुकीचा धाक दाखवत ६० कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे.

महेश पाटील यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र काही दिवसांनी त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रथम एस विभागातून बदली करून रुग्णालय विभागात आणि नंतर के-नॉर्थ वॉर्डमध्ये पोस्टिंग देण्यात आल्याने आता या संपूर्ण प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा:

उद्धव ठाकरे १३३ अधिवेशन बैठकींपैकी फक्त ४२ बैठकांना उपस्थित

भारताने पाकिस्तानला पाणी दाखवले… आंतरराष्ट्रीय लवादाला कानफटवले!

आता बंगाल सरकार इमाम, पुजाऱ्यांना पोसणार नाही!

जिहादी कारवायांआधी त्याला हेअर ट्रान्सप्लांट करावेसे वाटले!

सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. निशित पटेल यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, महेश पाटील आणि इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एवढे गंभीर आरोप आणि करोडोंच्या कथित व्यवहारांची चर्चा सुरू असताना आरोपी इतके दिवस फरार कसे राहिले, असा प्रश्न आता सामान्य मुंबईकर उपस्थित करत आहेत.

या प्रकरणामुळे मुंबईत सरकारी पदांचा गैरवापर, पुनर्विकास प्रकल्पांमधील पारदर्शकता आणि आर्थिक गुन्ह्यांवरील कारवाई याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आरोप सिद्ध झाले तर ही केवळ आर्थिक फसवणूक नसून, लोकांच्या विश्वासाशी केलेला मोठा विश्वासघात ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा