मुंबई : दादर पश्चिम येथील ‘प्रभात ७२’ या इमारतीतून उडी मारून एका ६० वर्षीय महिलेने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. कमला केशव अग्निहोत्री असे मृत महिलेचे नाव असून, त्या गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास दादरच्या केळुस्कर रोडवरील ‘प्रभात ७२’ इमारतीसमोरील पदपथावर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बेशुद्ध महिलेला तत्काळ शिवाजी पार्क मोबाईल-१ वाहनातून सायन रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
हे ही वाचा:
हृदयद्रावक! खेतवाडीत स्कूल बसच्या धडकेत एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका
इमारतीचे वॉचमन वरून सिंग यांनी बेशुद्ध महिलेला पाहून ती याच इमारतीतील ७०१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारी कमला अग्निहोत्री असल्याचे ओळखले. यानंतर वॉचमनने त्यांचे पती केशव अग्निहोत्री यांना संपर्क साधला. केशव अग्निहोत्री यांनी पत्नी घरात नसल्याचे सांगत तातडीने खाली धाव घेतली. आपल्या पत्नीने गॅलरीतून उडी मारल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
पोलीस निरीक्षक प्रमोद पवार आणि उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी केशव अग्निहोत्री यांच्यासह घराची पाहणी केली. त्यावेळी बेडरूममधील गॅलरीला असलेली लोखंडी तारेची जाळी उजव्या बाजूने निघालेली दिसली. याच ठिकाणाहून कमला यांनी उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दुसरीकडे, सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी कमला अग्निहोत्री यांना तपासून पहाटे १:१५ च्या सुमारास ‘दाखलपूर्व मृत’ घोषित केले.
पोलिसांनी घेतलेल्या जबाबाांत केशव अग्निहोत्री यांनी सांगितले की, त्यांची पत्नी नेहमी चिंताग्रस्त असायची. तिच्यावर उपचार करण्यासाठी २८ जानेवारी रोजीच माहीम येथील डॉक्टर यांची वेळ घेण्यात आली होती. मात्र, उपचारापूर्वीच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेबाबत कुटुंबीयांनी कोणाविरुद्धही संशय व्यक्त केलेला नाही.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास करत आहेत.







