संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर वक्फ दुरुस्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाले. मात्र, यानंतरही काही ठिकाणी वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. अशातच आता कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने वक्फ कायद्याला विरोध करताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ विधेयक २०२५ च्या निषेधार्थ हिंसाचार भडकवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कबीर खान हे तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे आणि कायद्याला विरोध करण्यासाठी जीवांचे बलिदान देण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये कबीर खान हे वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हिंसक आंदोलन करण्याचा सल्ला देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक शहरात आठ ते दहा लोक मरू द्या, असं विधान कबीर खान यांनी केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, कबीर खान तरुणांना सांगत आहेत की, “पोस्टर पकडून, निवेदन देऊन काही फायदा होणार नाही. रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जाळा, मरा, प्राणांचे बलिदान द्या. प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. बस, ट्रेन जाळा. या गोष्टी फक्त बोलून होत नाही. हिंदुस्तानात आज कोणीही आपले नेतृत्व नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने ते बिल रद्द होणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान द्यावे लागेल,” असे कबीर खान यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दोन मिनिटांची ही क्लिप असून ८ एप्रिल रोजी ऑनलाइन शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कबीर खानविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून खान यांचा मोबाईल फोन बंद आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा :
चीनचा पलटवार; अमेरिकन वस्तूंवरील करात १२५ टक्क्यांपर्यंतची वाढ
तहव्वूर राणाला मोदी सरकारने फरफटत आणले, काँग्रेस मात्र राणाच्या प्रेमात!
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी खा खरबुज!
बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे १०२ जणांचा मृत्यू!
आझाद नगर येथील रहिवासी आणि दावणगेरे शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील माजी नगरसेवक खान हे फरार असल्याचे वृत्त आहे. व्हिडिओ प्रसारित करण्यात किंवा तयार करण्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. दरम्यान, दावणगेरे पोलिसांनी एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे ज्यामध्ये नागरिकांना वक्फ विधेयक किंवा इतर संवेदनशील विषयांशी संबंधित कोणतीही उत्तेजक किंवा द्वेषपूर्ण सामग्री शेअर किंवा फॉरवर्ड करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक सामग्री प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.