सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करीच्या आरोपाखाली बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. यानंतर आता रान्या राव हिच्याशी संबंधित सोने तस्करी प्रकरणात अट्रिया हॉटेलच्या मालकाचा नातू तरुण राजू याला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बेंगळुरू येथून अटक केली आहे.
सोमवारी रात्री बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या राव हिला १४.८ किलो सोन्यासह ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली. यानंतर आता तरुण राजूचा तस्करीतील सहभाग तपासकर्त्यांना आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. डीआरआयने त्याला बेंगळुरू येथील विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर केले.
तरुण राजू आणि रान्या राव हे जवळचे सहकारी होते. परदेशातून सोन्याची तस्करी करण्यात त्याचे सहकार्य असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रान्या हिने आर्किटेक्ट जतीन हुक्केरीशी लग्न केल्यानंतर तरुण आणि तिची मैत्री कमी झाली असली तरी तपास यंत्रणांचा विश्वास आहे की, त्यांनी त्यांची बेकायदेशीर कृत्ये सुरूच ठेवली आहेत. दुबईहून सोने वाहतूक करताना रान्याने तरुणशी संपर्क साधला होता, अशी माहिती आहे. रान्या कोठडीत असताना, डीआरआयने तरुण राजूला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली.
हे ही वाचा..
पंतप्रधान मोदी यांनी एससी-एसटी आरक्षणाला दिली मजबुती
पंजाब सरकार शिक्षणात आणते राजकारण
उत्तर प्रदेश: पोलीस आणि गो-तस्करांमध्ये चकमक, आरोपीच्या पायाला लागली गोळी!
पाकची नाचक्की; तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानच्या राजदूताला अमेरिकेत प्रवेश नाकारला
कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिने कबुली दिल्याचे वृत्त आहे. तिने कबूल केले की अधिकाऱ्यांनी तिच्या ताब्यातून १७ सोन्याचे बार जप्त केले आणि दुबई, सौदी अरेबिया, युरोप आणि अमेरिकेतील तिचा विस्तृत प्रवास इतिहास उघड केला. तिने गेल्या वर्षात जवळजवळ ३० वेळा दुबईला प्रवास केला होता, ज्यामध्ये १५ दिवसांत चार वेळा सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या चौकशीत तिच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली, ज्यामध्ये २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले.