कांदिवली पश्चिमेतील चारकोप परिसरात बँकेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना चारकोप पोलिसांनी रंगेहात पकडले. १७ जूनच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली असून, या अटकेमुळे मुंबईतील चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चारकोप पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना सेक्टर ५ मधील ‘सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक’चे शटर तोडण्याचा प्रयत्न करताना दोन संशयित तरुण दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्यांचा पाठलाग करून दोघांनाही पकडले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींची ओळख मुकेश रमेश दुबे (३३) आणि शिवकुमार श्रीनाथ दुबे (३९) अशी पटली असून ते मालाड पश्चिम येथील रहिवासी आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मालाड, गोरेगाव आणि बोरीवली पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा:
३८ दशलक्ष डॉलरच्या मेडिकेड घोटाळ्यासंबंधी पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती अटकेत
कोळसा तस्करी प्रकरणात पोलीस अधिकारी मनोरंजन मंडल अटकेत
लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये १८ जण ठार; इराण-अमेरिका शांतता चर्चा रद्द?
भारत-पाक सीमा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी र. अ. किडवाई मार्ग, गोरेगाव आणि चारकोप पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत चार गुन्हे उघड झाले आहेत. या दोघांचा इतरही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.







