वांद्रे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी दीड लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी एच/पूर्व विभागातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता रुपेश कोथरे आणि मुकादम कुकप्पा कादर अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी कारवाई केली आहे.
तक्रारदाराच्या मालकीचा वांद्रे येथील खेरवाडी परिसरात मोठा प्लॉट आहे. या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. संबंधित बांधकाम तोडण्यासाठी तक्रारदाराने एच/पूर्व महानगरपालिका कार्यालयात अर्ज केला होता. या कारवाईसाठी रुपेश कोथरे आणि कुकप्पा कादर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अर्ज करूनही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली.
हे ही वाचा:
यूएईचा कॅनडावर ५ विकेट्सनी विजय
गोवा विशेष: दाबोळीम विमानतळ कधीच बंद होणार नाही
शेअर बाजारात एआयमुळे हाहा:कार
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आरोपींनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तक्रारदाराने दीड लाख रुपये दिले. उर्वरित ५० हजार रुपये दिल्यानंतरच कारवाई सुरू करू, असा दबावही आरोपींकडून टाकण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ९ जानेवारी २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची ३ एप्रिल २०२५ रोजी शहानिशा करण्यात आली. चौकशीत दीड लाख रुपये स्वीकारल्याची तसेच उर्वरित रकमेची मागणी केल्याची बाब स्पष्ट झाली.
यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध लाचेची मागणी करून पहिला हप्ता स्वीकारणे आणि दुसऱ्या हप्त्याची मागणी करून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे करत आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे एच/पूर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.







