डिजिटल व्यवहारांच्या युगात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस विणले जात असतानाच, आता फसवणूक झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे आता कायदेशीर आणि स्वयंचलित पद्धतीने थेट पीडितांच्या बँक खात्यात परत मिळणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) यासाठी ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’ (MRM) आणि ‘तक्रार निवारण यंत्रणा’ (GRM) ही दोन अत्याधुनिक डिजिटल पोर्टल्स सुरू केली आहेत.
फसवणुकीचे पैसे आता थेट खात्यात …
अनेकदा सायबर फसवणुकीनंतर पोलिसांकडून जप्त केलेली रक्कम न्यायालयाच्या आणि बँकांच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे खात्यात पडून राहायची. मात्र, आता ‘MRM’ (Money Restoration Module) मुळे हा विलंब टळणार आहे. या प्रणालीद्वारे पीडित नागरिक, तपास अधिकारी आणि बँका यांच्यात रिअल-टाइम समन्वय साधला जाणार असून, फसवणुकीची रक्कम थेट पीडिताच्या खात्यात वर्ग केली जाईल. एकाच खात्यावर अनेक तक्रारी असल्यास, कायदेशीर तरतुदींनुसार या रकमेचे प्रमाणशीर वाटपही केले जाणार आहे.
हे ही वाचा:
होर्मुझ खुला, तेलवाहतूक पुन्हा सुरू
ऑपरेशन टायगर यशस्वी; ठाकरे गटाला मोठा धक्का
राजौरीत जमीन खचल्याने घरांचे नुकसान
चुकीचे ‘फ्रीज’ झालेले खाते होणार सुरू…..
सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संशयावरून अनेकदा निष्पाप नागरिकांची बँक खाती ‘फ्रीज’ किंवा ‘होल्ड’ केली जातात. अशा खातेदारांना दिलासा देण्यासाठी ‘GRM’ (Grievance Redressal Mechanism) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे बँक, पोलीस आणि खातेदार यांच्यात थेट संवाद होऊन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पडताळणी करून पात्र खाती त्वरित ‘अनफ्रीज’ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दोन्ही पोर्टल्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व सायबर आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
गोल्डन अवरः फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये (पहिली काही तासांत) तक्रार नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेल्पलाईन: त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसलेली रक्कम पारदर्शकपणे परत मिळावी यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे फसवणूक झाल्यास घाबरून न जाता, तात्काळ संबंधित हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या पोर्टल्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई सायबर गुन्हे विभागातर्फे करण्यात आले आहे.







