मुहर्रमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना ‘पेनकिलर’ समजून चक्क विषारी गोळ्या वाटल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील भायखळा भागात उघडकीस आला आहे. ‘जगाचा बदला’ घेण्याच्या अजब आणि क्रूर इराद्याने १५ हजार लोकांचा जीव घेण्याचा कट रचणाऱ्या पुण्यातील एका ३९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फैयाज प्रेमजी असे या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल ३० हजार रिकाम्या आणि १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी मुहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान डोंगरीतील नूर बाग येथून ही मिरवणूक निघाली होती. परंपरेनुसार, मिरवणुकीत भाविकांना अन्न, पाणी आणि औषधांचे वाटप केले जात होते. याच दरम्यान, बुर्का घातलेल्या एका व्यक्तीने (जो नंतर फैयाज असल्याचे निष्पन्न झाले) भाविकांना पेनकिलर म्हणून या गोळ्यांचे वाटप केले. काही भाविकांनी या गोळ्यांचे सेवन करताच त्यांना मळमळणे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने खळबळ उडाली. शनिवारी पहाटेपर्यंत अनेकांना त्रास होऊ लागल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाल्याने फैयाज मानसिक तणावात होता. या वैयक्तिक नैराश्यातून त्याने “जगाचा बदला घेण्याचा” निर्णय घेतला. त्याने पुण्यातून ५० किलो ‘झिंक फॉस्फाइड’ (उंदीर मारण्याचे विष) आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूल ऑनलाइन मागवल्या होत्या. तो गेल्या १५ दिवसांपासून डोंगरीतील एका गेस्ट हाउसमध्ये मुक्कामी होता आणि दररोज स्वतः हाताने या कॅप्सूलमध्ये विष भरण्याचे काम करत होता.
आरोपी फैयाज हा बी.बी.ए. पदवीधर असून, तो वडिलांसोबत पेंट मॅन्युफॅक्चरिंगच्या व्यवसायात आहे. त्याचे कुटुंबीय (आई आणि बहीण) इराणमध्ये राहतात. फैयाज यापूर्वी इराक आणि इराणमध्येही काम करत होता, त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन काय आहे, याचाही तपास इंटेलिजन्स ब्युरो (IB), एटीएस (ATS) आणि मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. सध्या त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
AI वर अतिविश्वास ‘फोर्ड’ला पडला महागात; अनुभवी अभियंत्यांना पुन्हा बोलावले
भारत-सेशेल्सला जोडतो हिंद महासागर
पाकिस्तानचे मेजर इक्बाल झोपलेत काय?
काय आहे झिंक फॉस्फाइड?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाइड हे अत्यंत घातक विष आहे. पोटात गेल्यावर हे रसायन गॅसच्या स्वरूपात शरीरात पसरते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावून मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि काही वेळात मृत्यू ओढवू शकतो. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार खुनाचा प्रयत्न आणि विषबाधा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.







