बुधवारी (२९ ऑक्टोबर) संध्याकाळी मुंबईत झालेल्या ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक एनरिक इग्लेसियस यांच्या खचाखच भरलेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित कार्यक्रमादरम्यान एकूण ७३ मोबाईल फोन चोरीला गेले, ज्यांची एकत्रित किंमत सुमारे ₹२३.८५ लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या चोरीच्या घटनांबाबत सात स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. चोरीला बळी पडलेल्यांमध्ये मेकअप आर्टिस्ट, हॉटेल व्यावसायिक, विद्यार्थी, पत्रकार आणि व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश आहे.
या सर्वांनी कार्यक्रमासाठी किमान ₹७,००० इतक्या किमतीची तिकिटे घेतली होती.
इग्लेसियसचे पहिले मुंबईतील सादरीकरण
५० वर्षीय स्पॅनिश पॉप गायक एनरिक इग्लेसियस यांनी मुंबईतील आपल्या पदार्पणाच्या सादरीकरणात ९० मिनिटांचा थरारक परफॉर्मन्स दिला. ‘हिरो’, ‘बैलामोस’ यांसारख्या त्यांच्या लोकप्रिय हिट गाण्यांवर प्रेक्षकांनी जल्लोष केला. सुमारे २५,००० हून अधिक चाहत्यांनी हजेरी लावून हा कार्यक्रम अविस्मरणीय बनवला.
हे ही वाचा :
खलिस्तानी संघटनेशी संबंधित दोन जणांना अटक
सेना प्रमुखांनी युवकांना दिले महत्वाचे धडे
देशविरोधी, सनातन विरोधी शक्ती स्वार्थी हेतूने आरएसएसला विरोध करतात!
‘इंग्रजी सण हॅलोविन साजरा’; भाजपाने लालू यादवांना महाकुंभ ‘फालतू’ची आठवण करून दिली!
उत्कृष्ट सादरीकरण आणि प्रचंड उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला असला, तरी मोबाईल चोरीच्या घटनांमुळे वातावरणात गोंधळ निर्माण झाला. अनेक उपस्थितांनी तक्रार केली की, कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाईल हातोहात लंपास केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात आहे.







