उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलीगंज भागात सोमवारी कोचिंग सेंटर असलेल्या इमारतीला भीषण आग लागून किमान १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली. आग लागल्यानंतर अनेक विद्यार्थी इमारतीत अडकले होते. जीव वाचवण्यासाठी काहींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या. आग सुमारे एक तास धुमसत राहिली आणि नियंत्रणात आल्यानंतर १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ही इमारत व्यावसायिक क्षेत्रात असून त्यात पाळीव प्राण्यांच्या वस्तूंचे दुकान तसेच इतर दुकाने आणि कोचिंग सेंटर होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अनेक विद्यार्थ्यांनी खिडक्यांतून उड्या मारून स्वतःचा बचाव केला. एका व्हिडिओमध्ये एक युवक खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना खाली पडल्याचे दिसते. त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
ऑपरेशन टायगर फत्ते! ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेत
सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांना गळा चिरण्याची धमकी
युएईला हवे ब्रह्मोस आणि आकाशतीर? संरक्षण क्षेत्रात मोठ्या कराराची चर्चा
१९३४ पासून विश्वचषक फुटबॉलमध्ये खेळणाऱ्या इजिप्तचा पहिला विजय
पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. ब्रजेश पाठक म्हणाले, “या दुर्घटनेत १४ मुलांचा मृत्यू झाला आहे. चार जण जखमी असून त्यांना केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना सर्वोत्तम उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे.”
अधिकाऱ्यांनी शोधमोहीम पूर्ण केली असून इमारतीत आता कोणीही अडकलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.
नरेंद्र मोदींकडून दुःख आणि मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना ₹२ लाख आणि जखमींना ₹ ५० हजार मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त करून प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ते अलीगडमधील कार्यक्रम रद्द करून तातडीने लखनौला रवाना झाले.
