पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. या दरम्यान, पक्षपाताचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. एक आयपीएस अधिकारी, एक एसडीपीओ आणि एक प्रभारी निरीक्षकासह पाच अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर गंभीर गैरवर्तन आणि पक्षपाताचा आरोप आहे.
मतदानाच्या दिवशी निष्पक्षतेचा अभाव आणि गैरवर्तन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा आदेश जारी केला होता. संदीप गराई, आयपीएस, अतिरिक्त एसपी, डायमंड हार्बर; सजल मंडल, SDPO, डायमंड हार्बर; मौसम चक्रवर्ती, प्रभारी निरीक्षक, डायमंड हार्बर पोलीस स्टेशन; अजय बाग, प्रभारी निरीक्षक, फाल्टा पोलीस स्टेशन; सुभेच्छा बाग, प्रभारी अधिकारी, उस्ती पोलीस स्टेशन या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच निवडणुकांसारख्या संवेदनशील बाबींमध्ये आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल डायमंड हार्बरच्या पोलीस अधीक्षक डॉ. इशानी पाल यांना ताकीद देण्यात आली आहे.
सर्व निलंबित पोलीस अधिकारी डायमंड हार्बर परिसरातील आहेत. निवडणूक आयोगाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर गैरवर्तन आणि पक्षपाताचा आरोप आहे. निलंबित अधिकाऱ्यांच्या यादीत पहिले नाव डायमंड हार्बरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) संदीप गराई यांचे आहे. त्यांच्याविरुद्धच्या पुराव्यांचा समावेश असलेला अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाऊ शकतो.
हे ही वाचा:
चंद्र-मंगळ मोहिमांसाठी मानवी सहनशक्तीची चाचणी
इराण-अमेरिका थेट चर्चा नाही; पाकिस्तानमार्फत होणार संवाद
रशियाने २२ टन सोने विकले; जागतिक बाजारात खळबळ
कोकणात डेटा सेंटरचा मोठा प्रकल्प; ₹१.४३ लाख कोटींची गुंतवणूक
२३ एप्रिल रोजी बंगालमधील १५२ जागांसाठीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान अनेक ठिकाणी तुरळक संघर्षाच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. भाजपच्या उमेदवारांवर हल्ला करण्यात आला आणि एका उमेदवाराचा पाठलाग करून त्याला मारहाणही करण्यात आली.







