27.4 C
Mumbai
Sunday, July 5, 2026
घरक्राईमनामा३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक

३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक

‘चार्ल्स शोभराज’पासून प्रेरणा घेतल्याची आरोपीची कबुली

Google News Follow

Related

छत्तीसगडची राजधानी रायपूर पोलिसांनी तब्बल ३६ वर्षांपासून देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांची फसवणूक करणाऱ्या ६९ वर्षीय बिंगसन जॉन या सराईत ठगाला अटक केली आहे. तमिळनाडूचा रहिवासी असलेल्या या आरोपीने चौकशीदरम्यान कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज याच्याकडून प्रेरणा घेतल्याची कबुली दिली असून, त्याच्याप्रमाणे बनावट ओळख वापरून फसवणुकीची पद्धत अवलंबल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणाची सुरुवात रायपूरमधील हयात (Hyatt) हॉटेलच्या तक्रारीतून झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, बिंगसन जॉनने २५ जून रोजी हॉटेलमध्ये चेक-इन केले आणि २७ जूनच्या सकाळी कोणतीही औपचारिक चेक-आउट प्रक्रिया न करता हॉटेलमधून पसार झाला. त्याने हॉटेलचे ६३,७५५ रुपयांचे बिल न भरता, हॉटेलने वापरासाठी दिलेला सुमारे १.४८ लाख रुपये किमतीचा लॅपटॉपही सोबत नेल्याचा आरोप आहे. हॉटेल प्रशासनाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

तक्रारीनंतर तेलीबांधा पोलिस ठाणे आणि रायपूर पोलिसांच्या अँटी-क्राइम व सायबर युनिटने संयुक्त तपास सुरू केला. आरोपीने हॉटेलमध्ये दिलेली कागदपत्रे, मोबाईल क्रमांक आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी त्याचा माग काढला. या तपासातून तो ओडिशातील भुवनेश्वर येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या चौकशीत बिंगसन जॉनची फसवणुकीची पद्धतही उघड झाली. तो कधी स्वतःला परदेशी टूर गाईड, कधी इंग्रजी शिक्षक, तर कधी योग प्रशिक्षक असल्याचे सांगत असे. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्यामुळे आणि इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांचा त्याच्यावर सहज विश्वास बसत असे. हॉटेलमध्ये काही दिवस आलिशान मुक्काम केल्यानंतर तो बिल न भरताच गायब होत असे. काही प्रकरणांमध्ये हॉटेलमधील मौल्यवान वस्तूही सोबत घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

चौकशीदरम्यान आरोपीने १९९० पासून देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध देशातील १० पेक्षा अधिक राज्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसह अनेक महानगरांमध्ये त्याने अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बिंगसन जॉनने आतापर्यंत १५ वर्षांहून अधिक काळ विविध तुरुंगांत शिक्षा भोगली आहे. त्यात दिल्लीतील तिहार कारागृहाचाही समावेश आहे. तिहारमध्ये असताना अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा:

अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग

सायबर जनजागृती मोहिमेला गैरहजर, २ कोटींच्या फसवणुकीला पडले बळी

डावे चळ राज ठाकरेंच्या डोक्यात कसे शिरले?

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

चौकशीत आरोपीने कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो होतो, अशी कबुली दिली. वेगवेगळ्या ओळखी धारण करणे, विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर फसवणूक करून पसार होणे, हीच पद्धत आपण वर्षानुवर्षे वापरत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सध्या रायपूर पोलीस आरोपीकडून अधिक चौकशी करत असून, त्याने देशभरात नेमक्या किती हॉटेलांना गंडा घातला, त्याचे इतर साथीदार होते का आणि आणखी कोणत्या राज्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत, याचा तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा