पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला आहे. रथ यांची ६ मेच्या रात्री मध्यमग्राम येथे नियोजित हल्ल्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सीआयडी, गुप्तचर विभाग, पश्चिम बंगाल एसटीएफचे अधिकारी सहभागी आहेत.
प्राथमिक तपासात ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी रथ यांच्या हालचालींवर २ ते ३ दिवस नजर ठेवली होती. याबाबत सखोल तपास केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जी कार चोरण्यात आली होती, त्यावरचा नंबर हा ओएलएक्सवरून कॉपी करण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे.
हल्ल्यात वापरलेल्या छोट्या कारचा नंबर विल्यम जोसेफ यांच्या वाहनाचा असल्याचे तपासात समोर आले. मात्र पोलिस चौकशीत जोसेफ यांनी सांगितले की, त्यांची गाडी त्या वेळी त्यांच्या घरीच उभी होती. त्यांनी आपली गाडी विक्रीसाठी ओएलएक्सवर टाकली होती आणि त्याचे फोटो अपलोड केले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपींनी त्या फोटोमधून नंबर कॉपी केला असावा.
जोसेफ यांना तपासानंतर सोडण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यात थेट संबंध आढळलेला नाही. रथ यांची गाडी ज्या कारने अडविण्यात आली त्या वाहनाचे इंजिन आणि चेसिस नंबरही पुसून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
थलपती विजयशी ‘मैत्री’ काँग्रेसला पडली महागात
दहावीच्या निकालात ९४.९६ टक्क्यांसह मुलींची बाजी!
निदा खानला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी
पाकिस्तानी सैन्याकडून पाच बलुच नागरिकांचे अपहरण
व्यावसायिक शूटरचा संशय
पोलिसांच्या मते, हा हल्ला अत्यंत प्रशिक्षित आणि समन्वयाने करण्यात आला. प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषणानुसार, ऑस्ट्रियन बनावटीच्या ग्लॉक ९ एमएम पिस्तुलांचा वापर झाला असावा. अधिकाऱ्यांना संशय आहे की, या हल्ल्यासाठी सुपारी किलर्सची मदत घेण्यात आली असावी.
सीसीटीव्ही तपास
पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोरांनी कार सोडून दोन दिशांना मोटरसायकलवरून पळ काढल्याचा संशय आहे. एक जण जेसोर रोड आणि दुसरा राजरहाटच्या आतील मार्गाने निघाल्याचे पोलिसांना वाटते.
काही तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी नंतर बांगलादेश सीमेकडे पळाले असावेत. सिद्ध नाथ गुप्ता यांनी जप्त करण्यात आलेले पुरावे आणि बनावट नंबर प्लेट असलेले वाहन याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून एसआयटी हल्लेखोरांची ओळख, हेतू आणि संपूर्ण कट उघड करण्यावर काम करत आहे.
हल्ला कसा झाला?
घटनेच्या वेळी रथ हे चालक बुद्धदेव बेरा यांच्यासोबत पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ एसयूव्ही मधून भाजप कार्यक्रमावरून घरी परतत होते. रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान एका छोट्या चारचाकी वाहनाने त्यांची गाडी अडवली.
या वाहनावर सिलिगुडीचा बनावट नंबर प्लेट लावण्यात आला होता. गाडी थांबताच मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला आणि नंतर पळ काढला. या हल्ल्यात रथ यांचा मृत्यू झाला, तर चालक बेरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तपासात काय आढळले?
घटनास्थळावरून पोलिसांनी जिवंत काडतुसे, वापरलेल्या गोळ्यांचे कवच आणि ९ एमएम गोळ्यांचे शेल जप्त केले आहेत. फॉरेन्सिक तपासात रथ यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन गोळ्या छातीत लागल्या, एक गोळी हृदय भेदून गेली, तर दुसरी पोटात लागली.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिरक्तस्राव आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने रक्ताचे नमुने, फुटलेल्या विंडशील्डचे तुकडे आणि एसयूव्ही मधील इतर पुरावे जप्त केले आहेत.







