‘अपहरणाच्या दृश्याचे शूटिंग सुरू आहे’ असा बनाव करून प्रत्यक्षात अपहरणाची योजना आखणारा रोहित आर्या हा गुरुवारी पोलिस चकमकीत ठार झाला. पवईतील आरए स्टुडिओत १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवण्यामागील त्याचा हेतू अधिक गंभीर होता, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली आहे. एका प्रकरणात अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या प्रकरणात रोहित आर्याच्या मृत्यूसंदर्भात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पवईतील महावीर क्लासिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरए स्टुडिओत ही संपूर्ण घटना घडली. स्टुडिओत १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या पोलिस कारवाईत ठार झाल्यानंतर गुरुवारी या नाट्याचा शेवट झाला. पवई पोलिस ठाण्यात पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून रोहित आर्याविरुद्ध अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पवईतील ओलीस नाट्यात मंगल पाटणकर यांचे धाडस कौतुकास्पद
विमानतळावर ४७ कोटींचे कोकेन जप्त; महिला प्रवासी अटकेत
“मी उघडपणे म्हणतो की आरएसएसवर बंदी घालावी”
‘शूटिंग’च्या आड अपहरणाची योजना
रोहित आर्याने पाच दिवसांपूर्वी पवईतील आरए स्टुडिओ भाड्याने घेतला होता. तोथे ‘वेबसिरीज’चे शूटिंग असल्याचे सांगून त्याने स्टुडिओमध्ये अपहरणाच्या दृश्याची तयारी केली. प्रवेशद्वार ग्रीलने बंद करून घेतले होते, तर प्रत्येक दरवाजावर मोशन सेन्सर बसवले होते. शूटिंगच्या बहाण्याने आणलेल्या १७ मुलांपैकी १२ मुलांना त्याने एका बंद खोलीत कोंडले होते. त्या खोलीत काळ्या रंगाच्या रासायनिक द्रव्याने भिजवलेले कापड ठेवण्यात आले होते.
आर्याने खोट्या शूटिंगच्या माध्यमातून खरेच अपहरण घडवून आणायचे ठरवले होते. त्याची ही योजना इतकी गुप्त ठेवली होती की त्याच्या सहकाऱ्यांनाही सत्याची कल्पना नव्हती. सर्वांना वाटत होते की शूटिंग सुरू आहे.
पालकांना पाठवला भयावह व्हिडिओ
अपहरणाच्या दृश्याच्या नावाखाली संपूर्ण कारस्थान तयार झाल्यानंतर रोहित आर्याने स्वतः बनवलेला व्हिडिओ ओलीस ठेवलेल्या मुलांच्या पालकांना पाठवला. त्या व्हिडिओमुळे त्याचे खरे उद्दिष्ट उघड झाले आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणाने पवई परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास आता या विचित्र आणि भयावह कटाचा उलगडा करण्यावर केंद्रित आहे.







