बनावट कंपन्यांच्या नावाने म्यूल बँक खाती उघडून देशभरातील सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम वळवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सेंट्रल रिजन सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे.
बोरीवलीतील इंडियन ओव्हरसीज बँकेतून बनावट धनादेशाद्वारे १० लाख रुपये काढताना टोळीचा मुख्य सूत्रधार सलमान हबीब पठाण याच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १० लाखांची रोकड, ३० हून अधिक बनावट कंपन्यांचे रबर स्टॅम्प, नोटा मोजण्याचे मशीन, बँक खाते उघडण्यासाठी वापरले जाणारे डिजिटल टॅब, चेकबुक, मोबाइल आणि सक्रिय सिमकार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या टोळीचा तपास सुरू करण्यात आला. सलमान पठाण आणि त्याच्या साथीदारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या दादर, माहिम, बोरीवली तसेच मीरा रोड-भायंदर परिसरातील शाखांमध्ये गणेश टेक्सटाइल, कुशल एंटरप्रायझेस, रिचा एंटरप्रायझेस आणि केजीएन एंटरप्रायझेस यांसारख्या बनावट कंपन्यांच्या नावाने म्यूल करंट अकाउंट उघडल्याचे तपासात समोर आले.
हे ही वाचा:
औद्योगिक उत्पादनाला जोरदार गती; जूनमध्ये IIP वाढ ७.३ टक्क्यांवर
मैत्रिणीशी बोलल्यामुळे विद्यार्थ्याचा कोयता घेऊन पाठलाग
मेलोनी यांनी इटली प्रवेशास स्थलांतरिताना केली बंदी
पप्पू यादवना संसद परिसरातील ‘नाटक’ भोवले
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी या खात्यांची तपासणी केली. त्यावेळी देशाच्या विविध भागांत नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून लाटलेली रक्कम या खात्यांमध्ये जमा होत असल्याचे स्पष्ट झाले. या खात्यांच्या माध्यमातून सायबर ठगीची रक्कम पुढे वळवून ती खपवली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, २९ जुलै रोजी आरोपी बोरीवलीतील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत बनावट धनादेशाच्या माध्यमातून १० लाख रुपये काढण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायबर पथकाने बँकेच्या परिसरात सापळा रचला. दुपारी साडेतीनच्या सुमारास बँकेतून रोकड घेऊन बाहेर पडताच सलमान हबीब पठाण (३४), साजिद निसार अहमद कोठावाला (४५) आणि चिराग केतन टोपराणी (३१) यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
या तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकांनी भायंदर आणि मीरा रोड येथील आरोपींच्या कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाईत सैयद वजाहत वाहीउद्दीन, राकेश रमाशंकर मिश्रा, रक्षित के. राजेंद्र हेगडे आणि आर्यन रितेश ठक्कर या चौघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी वरळी सायबर पोलिस ठाण्यात अधिकारी अभिजीत गोंजारी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने आतापर्यंत किती कोटी रुपयांची सायबर फसवणुकीची रक्कम म्यूल खात्यांद्वारे वळवली, तसेच या प्रकरणात बँकेतील कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.







