सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करण्यासाठी ही कृती केल्याचे उघड झाले. यानंतर आता आरोपी वकिलावर कारवाई करण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने वकील राकेश किशोर यांना तात्काळ प्रभावाने वकिलीतून निलंबित केले आहे.
बीसीआयने दिलेल्या आदेशानुसार, दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत किशोर याने न्यायालयीन कामकाजादरम्यान त्याचे स्पोर्ट्स शूज काढले आणि ते सरन्यायाधीश गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयाच्या खोलीतून बाहेर काढले.
१९६१ च्या वकिल कायदा आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या व्यावसायिक आचरण आणि शिष्टाचार मानकांवरील नियमांनुसार बीसीआयने जारी केलेल्या अंतरिम निलंबन आदेशावर बीसीआयचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांनी स्वाक्षरी केली. कारवाईनंतर आता निलंबनाच्या कालावधीत, किशोर याला भारतातील कोणत्याही न्यायालयासमोर, न्यायाधिकरणासमोर किंवा प्राधिकरणासमोर हजर राहण्यास, काम करण्यास, वकिली करण्यास किंवा सराव करण्यास बंदी असेल.
हे ही वाचा :
बिहार निवडणुकीचे बिगुल वाजले; दोन टप्प्यात होणार मतदान
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; ‘या’ संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित
“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?
बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात वकील किशोर याने सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवलं. वकील सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करत त्यांच्याजवळ पोहोचला. त्यानंतर तो बूट काढू लागला. तो बूट फेकून मारणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि बाहेर नेलं. आरोपीला कोर्टरूममधून बाहेर काढले जात असताना, तो म्हणाला की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य न्यायाधीश गवई शांत राहिले आणि त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले. या घटनेनंतर, त्यांनी टिप्पणी केली की, या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. सुनावणी सुरू ठेवा.







