भारतीय निवडणूक आयोगाने सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १० ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही १७ ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि २० ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल. अर्जांची छाननी ही १८ ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि २१ ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ही २० ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि २३ ऑक्टोबर (दुसरा टप्पा) अशी असेल.
बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४३ कोटी आहे, ज्यामध्ये सुमारे १४ लाख पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदान मध्य बिहारमधील १२१ मतदारसंघांमध्ये होईल, ज्यामध्ये पूरग्रस्त आणि ग्रामीण भागांचा समावेश असेल. ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात सीमावर्ती भागातील १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. सर्व राजकीय पक्षांच्या विनंतीला मान्यता देऊन, निवडणूक आयोगाने या महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या बिहारमधील सर्वात लोकप्रिय सण छठ पूजा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक वेळापत्रक कायम ठेवल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बिहारच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) च्या नेतृत्वाखालील आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि इतरांच्या पाठिंब्याने सत्ताधारी एनडीए सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर विरोधी पक्षांचे गट ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे पक्ष सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
हे ही वाचा :
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; ‘या’ संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित
“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?
बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!
‘न्यू बॉल स्टार’ क्रांती गोड — पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास!
मुख्य निवडणूक आयुक्तांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन घोषणा केल्या आहेत. पहिल्यांदाच, ईव्हीएम मतपत्रिकांवर उमेदवारांचे फोटो मानक काळ्या-पांढऱ्या प्रतिमांऐवजी रंगीत आणि मोठ्या फॉन्टसह प्रदर्शित केले जातील. बूथ-स्तरीय अधिकारी अधिकृत ओळखपत्रे बाळगतील जेणेकरून त्यांची ओळख पटवणे सोपे होईल. मतदारांना मतदान केंद्राबाहेर मोबाईल फोन जमा करावे लागतील आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सर्व केंद्रांवर संपूर्ण वेबकास्टिंग कव्हरेज असेल.







