दिल्लीतील भीषण अग्नितांडवानंतर राजधानीतील बेकायदा बांधकामांविरोधात प्रशासनाने मोठी धडक मोहीम सुरू केली असून अनधिकृत इमारतींवर बुलडोझर चालवण्याचा सपाटा लावला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर दिल्ली महानगरपालिका (MCD) आणि इतर यंत्रणांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेमुळे बेकायदा बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ता मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, १ जूनपासून सुरू झालेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत ९४ बेकायदा इमारती पाडण्यात आल्या आहेत, तर ११४ मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय १२४ मालमत्तांवर विविध प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाया करण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरून प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात किती व्यापक मोहीम हाती घेतली आहे, याचा अंदाज येतो.
हे ही वाचा:
वरळीतील म्युझिक कॉन्सर्टनंतर महिलेची प्रकृती बिघडली
दिल्ली अग्निकांडात कुक केशव नेगीचा मोठा खुलासा
वचनपूर्ती…आमदार भातखळकरांच्या संघर्षाला यश, मागाठाणे–गोरेगाव रस्त्याचे लोकार्पण
टीएमसी आमदार मदन मित्रांविरोधात जनतेचा संताप
दक्षिण दिल्ली, मालवीय नगर, हौज राणी आणि इतर संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक इमारती मंजूर नकाशापेक्षा जास्त मजल्यांच्या असल्याचे, तर काही ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणांचा पूर्णपणे अभाव असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोणतीही तडजोड न करता थेट तोडक कारवाई सुरू केली.
विशेष म्हणजे, दक्षिण दिल्लीत अवघ्या २४ तासांत १४ इमारती सील करण्यात आल्या, तर अनेक बांधकाम मालकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
दिल्लीतील अलीकडील अग्नितांडवाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अनेक भागांमध्ये अरुंद रस्ते, पार्किंगसाठी जागेचा अभाव, अग्निशमन वाहनांना प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि सुरक्षा नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे दुर्घटना घडल्यास बचावकार्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाने आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारत अशा बांधकामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दिल्ली सरकार आणि MCD ने स्पष्ट केले आहे की, राजधानीत बेकायदा बांधकामांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नागरिकांची सुरक्षितता आणि शहराचा नियोजनबद्ध विकास लक्षात घेऊन ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजधानीतील आणखी अनेक बेकायदा इमारतींवर बुलडोझरची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







