मुंबई पोलिसांच्या परिमंडळ -६ आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा (पूर्व) येथील पेल्हार परिसरात सुरू असणाऱ्या एमडी या अमली पदार्थाचा कारखाना उध्वस्त करून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी १४ कोटींचा अमली पदार्थ तसेच एमडी तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि साहित्य (कच्चा माल) जप्त केला आहे.
मुंबई पोलिसांनी मीरा भायंदर – वसई विरार पोलिसांच्या हद्दीत केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.या ड्रग्सचे थेट कनेक्शन दुबईतील ड्रग्स माफियाशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी नालासोपारा पूर्व रशीद कंपाऊंडमध्ये चालणाऱ्या या बेकायदेशीर कारखान्यातून तब्बल ७ किलो एमडी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल पोलिसांच्या हाती लागला आहे.
ही कारवाई मुंबई पोलिसांच्या झोन-६ (चेंबूर) आणि टिळकनगर पोलिस ठाण्याच्या नार्कोटिक्स सेलने संयुक्तपणे केली. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यापैकी चार जण मुंबईतील आणि एक जण नालासोपारा परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील वाढत्या बेकायदेशीर ड्रग्ज व्यापाराला आळा घालण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा हा भाग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कारखान्याचा शोध लागणे हे प्रदेशातील ड्रग्ज उत्पादन आणि वितरणाच्या वाढत्या साखळीचे गंभीर चित्र उघड करते.
विशेष म्हणजे, ही फॅक्टरी पेल्हार पोलिस ठाण्या पासून थोड्याच अंतरावर, मांडवी पोलिसांच्या हद्दीजवळ कार्यरत होती. या जवळीकतेमुळे स्थानिक पोलिस यंत्रणेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे ही वाचा :
भारताने ६० बांगलादेशींना परत पाठवले: ६ ट्रान्सजेंडरचा समावेश!
पाकिस्तानने सलमान खानला ‘दहशतवादी’ घोषित केले!
लालू-तेजस्वीचे मॉडेल म्हणजे ‘जमीन द्या आणि नोकरी घ्या’
‘दारू पिऊन गाडी चालवणारे दहशतवादी’
सदर युनिट हे अनधिकृत झोपडपट्टी परिसरात उभारण्यात आले होते. अशा क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या प्रशासनावर नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार होऊनही कारवाई न झाल्याने अशा अवैध कारवाया वाढीस लागल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.







