बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण ढवळून निघालेले असताना या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच या हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावण्यात आला आहे. यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. नवीन सीसीटीव्ही समोर आला असून या सीसीटीव्हीत खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी एकत्र असल्याचे दिसून येत आहे.
बीड खंडणी प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. हा सीसीटीव्ही अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा असल्याचे बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. माहितीनुसार, या आरोपींनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती.
संबंधित सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचे असून याप्रकरणी पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. यानंतर संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा :
उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप!
देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!
अमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी
महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अशी दिसणार रश्मिका मंधाना
अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर दाखल झालेला आहे. त्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की जवळपास १० ते १०.३० च्या दरम्यान मला विष्णू चाटेच्या फोनवरुन फोन आला होता. त्यावेळी वाल्मिक कराड हे माझ्याशी फोनवरुन बोलले. सुदर्शन घुले ज्या पद्धतीने सांगतोय, त्या पद्धतीने कर, नाहीतर मी तुझे हात-पाय तोडीन, अशाप्रकारची धमकी वाल्मिक कराडने दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.







