लक्झरी वाहनांची तस्करी आणि अनधिकृत परकीय चलन व्यवहार संबंधी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. बुधवरी ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), १९९९ अंतर्गत केरळ आणि तामिळनाडूमधील १७ ठिकाणी छापे टाकले आहेत.
भारत- भूतान आणि भारत- नेपाळ या मार्गांवरून लँड क्रूझर, डिफेंडर आणि मासेराती सारख्या लक्झरी कारची बेकायदेशीर आयात आणि नोंदणी करण्यात सामील असलेल्या एका सिंडिकेटचा पर्दाफाश करणाऱ्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत पृथ्वीराज, दुलकर सलमान आणि अमित चकलाकल सारख्या चित्रपट कलाकारांची निवासस्थाने आणि आस्थापने, काही वाहन मालक, ऑटो वर्कशॉप आणि एर्नाकुलम, त्रिशूर, कोझिकोड, मलप्पुरम, कोट्टायम आणि कोइम्बतूर येथील व्यापाऱ्यांसह १७ ठिकाणांचा समावेश आहे.
संबंधित प्रकरणातील प्राथमिक निष्कर्षांमध्ये अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये बनावट कागदपत्रे (भारतीय लष्कर, अमेरिकन दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाचे असल्याचे कथित) आणि बनावट आरटीओ नोंदणी वापरून कोइम्बतूरस्थित नेटवर्क उघडकीस आल्यामुळे ईडी कोची झोनल ऑफिसने हे छापे टाकले, अशी माहिती समोर आली आहे. नंतर ही वाहने एचएनआय (हाय नेट वर्थ) व्यक्तींना, ज्यात चित्रपटातील व्यक्तींचा समावेश होता, कमी किंमतीत विकण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे.
हेही वाचा..
आयएमएफच्या माजी अर्थतज्ज्ञ म्हणतात, टॅरिफचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा झालेला नाही!
लोकांना ‘एनडीए’च्या विकास धोरणावर विश्वास
अभिनेता, लेफ्टिनंट कर्नल मोहनलाल यांचा सैन्यप्रमुखांकडून सन्मान
यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार गीता शहा यांना जाहीर
परकीय चलन व्यवस्थापन कायदच्या कलम ३, ४ आणि ८ चे प्रथमदर्शनी उल्लंघन आढळून आल्याने ईडीने कारवाई सुरू केली आहे. ज्यामध्ये हवाला चॅनेलद्वारे अनधिकृत परकीय चलन व्यवहार आणि सीमापार पेमेंटचा समावेश होता. पैशांचा माग, लाभार्थी नेटवर्क आणि परकीय चलन हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.







