भारताचा आयफोन निर्यात दर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १० अब्ज डॉलर्स (सुमारे ₹८८,५००कोटी) इतका झाला आहे. उद्योग क्षेत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत सुमारे ७५ टक्क्यांनी जास्त आहे.
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, भारतामध्ये बनवलेल्या उत्पादनांवर आता संपूर्ण जग विश्वास ठेवत आहे. उद्योगाच्या आकडेवारीनुसार, ॲपलने एकट्यानेच सप्टेंबर महिन्यात 1.25 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्यात केले, जे गेल्या वर्षी याच महिन्यातील 490 दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत खूप जास्त आहे.
विक्रमी स्मार्टफोन निर्यात
उद्योगाच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत भारताचा स्मार्टफोन निर्यात आकडा १ लाख कोटींच्या वर पोहोचला आहे, जो एक नवा विक्रम आहे. हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) त्याच कालावधीतील ६४,५०० कोटींच्या तुलनेत ५५ टक्के अधिक आहे.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत भारताचा स्मार्टफोन बाजार वार्षिक तुलनेत २ टक्क्यांनी वाढला, आणि या काळात एकूण ६ कोटी युनिट्सची शिपमेंट झाली. अहवालात म्हटले आहे की, ५० हजारपेक्षा अधिक किंमतीच्या प्रीमियम स्मार्टफोननी वाढीमध्ये मोठा वाटा उचलला, तर १० हजार ते २० हजार या दरम्यानच्या मिड-रेंज सेगमेंटने सर्वाधिक विक्री नोंदवली.
प्रादेशिक पातळीवर पाहता, उत्तर भारताने ३३ टक्के वाट्यासह बाजारात आघाडी घेतली, तर दक्षिण भारतात सर्वाधिक वेगाने वाढ नोंदली गेली. शिपमेंटमध्ये ३५ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाल्याने ॲपल हा भारतातील सर्वात जलद वाढणारा स्मार्टफोन ब्रँड ठरला आहे.
हे ही वाचा:
अभिनेता, लेफ्टिनंट कर्नल मोहनलाल यांचा सैन्यप्रमुखांकडून सन्मान
लँड क्रूझर, डिफेंडर आणि मासेराती कारची बेकायदा आयात, ईडीची कारवाई
दिवाळीआधी अजमेरमध्ये मोठी कारवाई
सणासुदीच्या हंगामात विक्रीत मोठी वाढ अपेक्षित
सायबरमीडिया रिसर्च (CMR) च्या आणखी एका अहवालानुसार, आगामी सणासुदीच्या काळात प्रीमियम स्मार्टफोनची विक्री वार्षिक तुलनेत १८ टक्क्यांनी वाढू शकते, तर मार्केट व्हॅल्यूत २४ टक्क्यांची वाढ दिसू शकते.
सुपर-प्रीमियम सेगमेंट (५० हजार ते १ लाख) मध्ये विक्री १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अपर-प्रीमियम सेगमेंट (१ लाखपेक्षा जास्त) मध्ये वाढ १६७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, याचे कारण म्हणजे फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे.







