उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील आयोजित महाकुंभ मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक दाखल होत आहेत. देशाच्या विविध भागांमधून लोक रेल्वे मार्गानेही येत असून रेल्वेनेही विशेष गाड्या यासाठी सोडल्या आहेत. अशातच आता झाशीहून प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. हल्लेखोरांनी दगडफेक करत ट्रेनची तोडफोड केल्यामुळे रेल्वेमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आता या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हल्लेखोरांना शोधण्याचे काम सुरू आहे.
झाशीहून प्रयागराजला जाणारी ट्रेन क्रमांक ११८०१ या गाडीवर दगडफेक करण्यात आली. झाशी विभागातील हरपालपूर स्टेशनवर रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रयागराजला जाण्यासाठी हरपालपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते. मात्र, ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांकडून ट्रेनचे दरवाजे उघडले जात नव्हते आणि या प्रकाराने स्थानकावर उपस्थित जमाव संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेक, तोडफोड सुरू केली. दगडफेक आणि तोडफोडीमुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. यामुळे घबराट निर्माण झाली. प्रयागराजला महाकुंभ स्नानासाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये सर्व महिला आणि लहान मुले उपस्थित होती.
या घटनेनंतर तात्काळ स्थानिक पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली असून अनेक गाड्यांना उशीर झाला. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा :
तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी
२६/११ चा दहशतवादी राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएचे पथक लवकरच जाणार अमेरिकेला
पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!
मंगळवार, २८ जानेवारी २०२५ च्या सकाळपर्यंत १५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात श्रद्धेने स्नान केले. अजूनही लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत असून एकूण ४५ कोटी भाविक भेट देतील अशी अपेक्षा उत्तर प्रदेश सरकारने ठेवली आहे. त्यानुसार सर्व सोयीसुविधा आणि सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.