मध्य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात दगडफेक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असून या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
बुरहानपूर जिल्ह्यातील लालबाग पोलीस ठाणे परिसरातील बिरोडा गावात गणेश विसर्जनादरम्यान हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. पठण संपताच काही समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस दल उपस्थित आहे. सध्या या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
बिरोडा गावातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते मात्र, चंद्रग्रहणामुळे सोमवारी एका गणेश मूर्तीचे विसर्जन करावे लागले. या दरम्यान हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हनुमान चालीसा संपताच दगडफेक झाली आणि गोंधळ निर्माण झाला.
हे ही वाचा :
शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!
युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी मिशन मोडमध्ये योगी सरकार
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीच्या ‘अमिताभ बच्चन’च्या वाट्याला एकटेपण
बुरहानपूरचे पोलिस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी सांगितले की, बिरोडा भागात हनुमान चालीसा पठणावेळी अचानक दगडफेक सुरू झाली. यामुळे परिस्थिती बिघडली आणि दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गोंधळ शांत करण्यासाठी कारवाई केली. या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दगडफेकीत काही लोक जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर जप्त केला असून, घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.







