उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका कारवाईत पाकिस्तानस्थित गुंडांच्या संपर्कात असलेल्या आणि देशातील पोलीस पथके तसेच संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्यांची तयारी करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. बाराबंकी येथील २३ वर्षीय दानियाल अश्रफ आणि कुशीनगर येथील २० वर्षीय कृष्णा मिश्रा अशी दोन आरोपींची ओळख पटली आहे.
अटक करण्यात आलेले दोघे पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जट्ट आणि हम्माद यांच्याशी कॉल, चॅट, व्हॉइस नोट आणि व्हिडिओ मेसेजद्वारे नियमितपणे संपर्कात होते, असे उघडकीस आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे सूत्रधार त्यांना मोठ्या रकमेचे आणि प्रसिद्धीचे आमिष दाखवून कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करत होते. एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी दहशतवादी गट इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय तरुणांना लक्ष्य करत आहेत. भारतात स्लीपर सेल तयार करणे हा त्यांचा उद्देश होता. तपासकर्त्यांनी दोन्ही आरोपींच्या मोबाईल फोनमधून व्हॉट्सॲप चॅट्स, देशविरोधी संभाषणे, व्हिडिओ कॉल्स आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.
चौकशीदरम्यान, आरोपींनी उघड केले की शहजाद भट्टीने त्यांना सांगितले होते, “जर तुम्ही माझ्या निर्देशांनुसार काम केले, तर मी तुम्हाला भारतात हिरो बनवीन.” एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दानियाल अश्रफने दुसऱ्या राज्यातील पोलीस ठाण्याचा व्हिडिओ त्याच्या पाकिस्तानी सूत्रधारांना पाठवला होता. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि शस्त्रेही मागितली होती. त्याच्या सूत्रधारांपैकी एक, हम्माद याने त्याला आबिद जट्टचा फोटो पाठवून त्याला ‘पाकिस्तानी डॉन’ म्हटले आणि ५० पोस्टर्स छापून महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले.
कृष्णा मिश्राला धोकादायक कामेही देण्यात आली होती. त्याच्या फोनमध्ये शहजाद भट्टी आणि आबिद जट यांचे व्हिडिओ सापडले. एटीएसच्या म्हणण्यानुसार, कृष्णाला पोलीस किंवा गणवेशधारी व्यक्तीवर गोळी झाडून त्या हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच्या डिव्हाइसमधून जप्त केलेल्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचे हँडलर्स कृष्णा आणि त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत योजनेवर चर्चा करताना दिसत होते.
या कारवाईदरम्यान, एटीएसने आरोपीकडून एक ९ मिमी गावठी पिस्तूल, एक .३१५ बोर पिस्तूल, ९ मिमीच्या सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, ही शस्त्रे पाकिस्तानी सूत्रधारांच्या सूचनेनुसार नियोजित हल्ल्यांसाठी होती.
हे ही वाचा:
तृणमूल कार्यकर्त्यांनी बसीरहाटमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झाडली गोळी
मुख्यमंत्री मान यांच्या ओएसडीशी संबंधित छापे; रोकड भरलेल्या दोन बॅगा जप्त
दहशतवादाचा पराभव करण्याचा भारताचा निर्धार
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येत बनावट नंबर प्लेटच्या गाडीचा वापर
सुरक्षा यंत्रणांनी गेल्या दोन महिन्यांतच उत्तर प्रदेशात १२ दहशतवादी संशयितांना अटक केली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी लखनौमध्ये चार संशयितांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान, त्यांनी कबूल केले की, देशात ते किती भीती आणि नुकसान निर्माण करू शकतात यावर अवलंबून पाकिस्तानी सूत्रधारांनी त्यांना पैशांचे आमिष दाखवले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोठा स्फोट घडवण्यापूर्वी सराव म्हणून त्या संशयितांनी एक पिकअप ट्रक आणि एक मोटारसायकलसुद्धा पेटवून दिली होती. या घटनांचे व्हिडिओ त्यांचा सूत्रधार अबू बकर याला पाठवण्यात आले होते, जो त्यांना प्रत्येक कृत्यासाठी १२,००० रुपये देत असे, असे म्हटले जाते.







