कॅपजेमिनीच्या बंगळुरू येथील कॅम्पसमधील डे-केअर सेंटरमध्ये चिमुकल्या मुलांवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओंनंतर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच महिला केअरगिव्हर्सपैकी एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर बंगळुरू पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही या प्रकरणाची स्वतंत्र दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दोन ते तीन वर्षांच्या मुलांशी अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचे दिसून आले. मुलांना रडणे थांबवण्यासाठी वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बसवणे, अंधाऱ्या बाथरूममध्ये कोंडून ठेवणे, जबरदस्तीने कमोडवर बसवणे आणि टॉयलेट जेटमधून तोंडात पाणी मारल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओंनंतर बालसुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी मंजुळा, विजयलक्ष्मी, भवानी, सिंधू आणि बिंदू या पाच महिला कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डे-केअरमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
जिल्हा बाल संरक्षण विभागाला व्हॉट्सअॅपवर चार धक्कादायक व्हिडिओ प्राप्त झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने HAL पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात डे-केअरमध्ये सुमारे ५० ते ६० मुलांची नोंदणी असून दररोज १५ ते २० मुले येत असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार बराच काळ सुरू असण्याची शक्यता आहे. घटनेनंतर कॅपजेमिनीने अधिकृत निवेदन जारी करत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरू कॅम्पसमधील डे-केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच हे डे-केअर बाह्य सेवा पुरवठादारामार्फत चालवले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
इराणच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा इस्रायलचा कट?
“काश्मिरींना बंदुका पाक लष्कराने दिल्या आणि आता दहशतवादी म्हणतात”
मोजतबा खामेनी वडिलांच्या अंत्यविधीला राहणार गैरहजर
भारत-जपानमध्ये संयुक्त संरक्षण सह-विकास प्रकल्प करार
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डे-केअर केंद्रांमध्ये २४ तास सीसीटीव्ही देखरेख, पालकांना थेट व्हिडिओ प्रवेश आणि नियमित सुरक्षा लेखापरीक्षण सक्तीचे करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट कॅम्पसमधील बालसंगोपन केंद्रांच्या सुरक्षेवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







