38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरधर्म संस्कृतीविघ्नहर्ता हा ऋणहर्तासुद्धा!

विघ्नहर्ता हा ऋणहर्तासुद्धा!

Google News Follow

Related

गणेशोत्सव काळात श्री गणेशाची खूपशी नावे समोर आली. ही नावे त्याला कशी मिळाली, दिली गेली या मागच्या अनेक कथा पाहिल्या. तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण पण फार प्रचलित नसणारे नाव म्हणजे ‘ऋणहर्ता’. आणि त्याच्याशी संबंधित ऋणहर्ता गणेश स्तोत्र आता समजून घेऊया.

ऋणहर्ता हे नाव थेट ऋण म्हणजे कर्ज देणं-घेणं आणि हर्ता म्हणजे ते दूर करणारा. तर कर्जमुक्त होऊन संपन्न, सुखी जीवन मिळवून देणारं एक अत्यंत प्रभावशाली, शक्तिशाली स्तोत्र अर्थात ऋणहर्ता गणेश स्तोत्र. यामुळे आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात या भावनेने या स्तोत्राचा पाठ करतात. हे “ऋणनाशं करोतु मे” म्हणजे “माझे ऋण दूर करावे”, अशा थेट प्रार्थनेतून जाणवतं. आत्तापर्यंत पाहिलेली गणेश रूपं ही बहुतांशी चार हात असणारी म्हणजे चतुर्भुज स्वरूपातील गणेश प्रतिमेची होती. पण या स्तोत्राच्या सुरुवातीचा श्लोक पाहूया:

ॐ सिन्दूरवर्णं द्विभुजं गणेशं लम्बोदरं पद्मदले निविष्टम्।

ब्रह्मादिदेवैः परि-सेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणामि देवम्॥

म्हणजे या स्तोत्राच्या सुरुवातीलाच सिंदूरवर्ण, द्विभुज, लम्बोदर अशा गणेश स्वरूपाचं ध्यान करून त्याला ब्रह्मादिक देवतांनी देवस्वरूप मानलं आहे. पण या स्तोत्राचं वैशिष्ट्य केवळ कर्जमुक्तीपुरतं मर्यादित नाही. या स्तोत्रात गणेशाच्या पूजेचे अनेक संदर्भ आहेत. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने फलसिद्धीसाठी गणेशाची पूजा केली, तर त्रिपुरासुराच्या वधापूर्वी भगवान शिवाने त्यांची आराधना केली असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे हिरण्यकश्यपू आदींच्या वधासाठी विष्णूंनी, महिषासुराच्या वधासाठी देवीने आणि तारकासुराच्या वधापूर्वी कुमाराने गणेशाची पूजा केल्याचं स्तोत्रात सांगितलं आहे. पुढे सूर्याने तेजप्राप्तीसाठी, चंद्राने कांतिवृद्धीसाठी आणि विश्वामित्रांनी तपस्येच्या पालनासाठी गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आढळतो.

या वर्णनांमध्ये “सदैव पार्वतीपुत्रः ऋण-नाशं करोतु मे” म्हणजेच “पार्वतीपुत्र गणेशाने माझे ऋण दूर करावे” ही प्रार्थना केली जाते. यातून स्तोत्राचा एक महत्त्वाचा धागा स्पष्ट होतो. मोठं कार्य असो, एखादं संकट असो किंवा एखादी विशेष सिद्धी साधायची असो, गणेशाचं स्मरण केलं जातं. स्तोत्राच्या रचनेत ‘ऋणनाश’ ही थेट प्रार्थना असली तरी त्यातील पौराणिक संदर्भ गणेशाच्या कार्यारंभीच्या पूजेची आणि फलसिद्धीशी जोडलेल्या परंपरेची आठवण करून देतात.

या स्तोत्राच्या फलश्रुतीत त्याला ‘तीव्र दारिद्र्यनाशन’ असं म्हटलं आहे. तसंच एकाग्रतेने दररोज एकदा वर्षभर पठण केल्यास दारिद्र्य दूर होऊन कुबेरासमान समृद्धी प्राप्त होण्याची फलश्रुती दिली आहे. हा धार्मिक परंपरेतील श्रद्धाधारित उल्लेख आहे. म्हणूनच, श्री ऋणहर्ता गणेश स्तोत्रातली प्रार्थना केवळ धनप्राप्तीची नाही, “ऋणनाशं करोतु मे” या एका वाक्यात भक्ताची संपूर्ण अपेक्षा सामावलेली आहे. कर्जाचं ओझं दूर व्हावं, अडचणी कमी व्हाव्यात आणि जीवनातील महत्त्वाच्या कार्यांसाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणजेच विघ्नांचा नाश होऊन जीवन सुखमय व्हावं हेच मागणं.

गणपतीच्या असंख्य नावांमध्ये ‘ऋणहर्ता’ हे नाव त्यामुळेच वेगळं ठरतं. कारण या रूपात गणरायाकडे केली जाणारी प्रार्थना थेट माणसाच्या आर्थिक संकटाला स्पर्श करते आणि त्याच वेळी स्तोत्रात दिलेल्या देवतांच्या पूजेच्या संदर्भांमधून कार्यसिद्धीसाठी गणेशस्मरणाची परंपराही अधोरेखित होते. तर इतर स्तोत्रांप्रमाणेच हे स्तोत्रही आत्मविश्वास, बळ आणि सुख-समृद्धीचं फळ देणारं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा