30 C
Mumbai
Thursday, April 23, 2026
घरधर्म संस्कृतीजत्रा म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, तर दानाचे, कष्टाचे, श्रमाचे सामूहिक सेलिब्रेशन

जत्रा म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, तर दानाचे, कष्टाचे, श्रमाचे सामूहिक सेलिब्रेशन

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील जत्रा-यात्रांचे वेळापत्रक आणि इथले कृषी चक्र यांचे नाते अतिशय अतूट आणि सेंद्रिय आहे. भारतीय कृषी परंपरेत दोन मुख्य हंगाम असतात; खरीप आणि रब्बी. चैत्र महिना उजाडेपर्यंत रब्बी हंगामाची सुगी पूर्ण झालेली असते. शेतातील गहू, हरभरा, ज्वारीचे पीक कापून, मळून घरात आलेले असते आणि खळ्यावरची लगबग संपलेली असते. वर्षभर ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता मातीत राबणाऱ्या बळीराजाला या काळात खऱ्या अर्थाने नैसर्गिक निवांतपणा मिळतो. पिकाची विक्री झाल्यानंतर खिशात दोन पैसे खुळखुळत असतात आणि मनात निसर्गाप्रती, आपल्या ग्रामदैवताप्रती एक कृतज्ञतेची अपार भावना दाटून आलेली असते.

शेतीची कामे संपल्यामुळे मिळणारा हा शारीरिक आणि मानसिक निवांतपणा जत्रेच्या उधाणलेल्या उत्साहात थेट परावर्तित होतो. शेतकरी कुटुंबासाठी हा काळ म्हणजे वर्षभराच्या कष्टाचे परिमार्जन करण्याचा काळ असतो. ही जत्रा म्हणजे केवळ देवाची साचेबद्ध पूजा नसते, तर ती निसर्गाने दिलेल्या दानाचे, कष्टाचे आणि श्रमाचे सामूहिक सेलिब्रेशन (उत्सव) असते. ग्रामीण भागात या काळात विविध विलक्षण प्रथा पाहायला मिळतात. काही कुटुंबे या काळात देवाच्या नैवेद्यासाठी मांसाहाराचा (खारा नैवेद्य) बेत आखतात, तर काही शाकाहारी महाप्रसादाचा (गोड नैवेद्य) आनंद घेतात. कृषी चक्रातील हा ‘पॉज’ जत्रेच्या रूपाने समाजाला नवसंजीवनी देतो, ज्यामुळे शेतकरी पुन्हा येणाऱ्या मृगाच्या पावसासाठी आणि नव्या खरिपाच्या पेरणीसाठी मानसिकदृष्ट्या सज्ज होतो.

ग्रामदैवतांचे दैवतशास्त्र

संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात हरीचिया दासा हरी दाही दिशा| भावे जैसा तैसा हरी एक|| असे म्हटले आहे. त्याप्रमाणे देव भक्ताला त्याच्याप्रमाणेच, त्याच्या भावविश्वातील गोष्टी धारण केलेला भासतो. लोकधर्माचे आणि दैवतांचे थोर अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनानुसार, “ग्रामीण भागात देव माणसांसोबत मातीत राबणारे, त्यांच्या अडीअडचणीत धावून येणारे, गुरा-ढोरांचे रक्षण करणारे आणि प्रसंगी रागावणारे ‘आपले’ देव आहेत. या ग्रामदैवतांचे लौकिक स्वरूप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि मातीशी नाळ जोडणारे आहे. हे देव ‘क्षेत्रपाळ’ (रक्षक) श्रेणीतील आहेत.”

हे ही वाचा:

पश्चिम आशियातील तणावातही भारतीय रिअल इस्टेटची झपाट्याने वाढ

“दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात आम्ही भारतासोबत”

“भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!”

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश PNG कनेक्शनमध्ये आघाडीवर

हे देव गावाची वेस ओलांडून आत येणाऱ्या संकटांपासून, रोगांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून गावाचे रक्षण करतात. त्यांच्या आख्यायिका या सहसा दुष्ट शक्तींच्या, म्हणजेच राक्षसांच्या संहाराशी आणि मानवी समाजाला भयमुक्त करण्याशी जोडलेल्या असतात. यमाई, सटवाई, जोतिबा, खंडोबा, काळूबाई, मरीआई ही सर्व दैवते याच लोकधर्माची प्रतीके आहेत. इथले दैवतशास्त्र अतिशय साधे, पारदर्शक आणि व्यवहारी आहे – ‘तू माझे रक्षण कर, माझ्या पिकाला पाणी दे, माझ्या लेकरा-बाळांना सुखरूप ठेव, मी तुझा कुलाचार निष्ठेने पाळीन.’ या साध्या देवाणघेवाणीच्या तत्त्वावर पिढ्यानपिढ्यांची निस्सीम श्रद्धा टिकून आहे. या लोकधर्मात बोजड मंत्र नाहीत, तर साधी आर्त हाक आहे. देवाला दिला जाणारा नैवेद्यही पंचपक्वान्नांचा नसतो, तर तो गरिबाघरच्या पिठल्या-भाकरीचा, पुरणपोळीचा किंवा मीठ-पिठाच्या जोगव्याचा असतो. हे देव भक्तांच्या घामाचा वास ओळखतात आणि त्यांच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा वाचतात.

चैत्रातील प्रमुख जत्रा आणि त्यांचे स्थान महात्म्य

चैत्र महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र जणू यात्रांच्या निमित्ताने जागा होतो. कोकणच्या लाल मातीपासून ते विदर्भाच्या घनदाट जंगलांपर्यंत आणि खानदेशाच्या तापी खोऱ्यापासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांपर्यंत जत्रांचे पडघम वाजू लागतात. या प्रत्येक स्थानाची आपली एक स्वतंत्र ओळख, एक वेगळा भूगोल आणि एक विलक्षण इतिहास आहे. या आख्यायिका मानवी जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या रूपककथा आहेत. पुढे केवळ महाराष्ट्रातील चैत्र महिन्यात भरणाऱ्या प्रसिद्ध जत्रांची माहिती दिली आहे. पण गावोगावी होणाऱ्या जत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, परंपरा व आनंद ओतप्रोत भरलेला असतो.

दख्खनचा राजा: वाडीचा जोतिबा

सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून सुमारे ३१२० फूट उंचीवर वसलेल्या वाडी रत्नागिरी (कोल्हापूर) येथील जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेला भक्तीचा जो महासागर उसळतो, तो डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. जोतिबा म्हणजेच केदारेश्वर. हे दैवत ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी यांचे एकत्रित तेज:पुंज रूप मानले जाते.

आख्यायिकेनुसार, करवीर निवासिनी अंबाबाईला (महालक्ष्मी) रत्नासुर आणि कोल्हासुर या भयंकर राक्षसांचा वध करण्यासाठी जोतिबाने हिमालयातून येऊन साहाय्य केले. या विजयाचे प्रतीक आणि कृतज्ञतेचा उत्सव म्हणून ही जत्रा भरते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण डोंगर गुलाबी-लाल गुलालाने आणि खोबऱ्याच्या तुकड्यांनी न्हाऊन निघतो. हवेत उडणाऱ्या गुलालामुळे आकाशाचा रंगही लालसर होतो आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ या एकाच नादाने आसमंत दुमदुमून जातो. हा गुलाल केवळ रंग नाही, तर तो शौर्याचा, त्यागाचा आणि जगण्याच्या ऊर्जेचा रंग आहे.

मुंगी घाटाचा थरार आणि कावड यात्रा: शिखर शिंगणापूर

छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा या १५ दिवसांच्या काळात चालते. समुद्रसपाटीपासून सुमारे ३२०० फूट उंचीवर असलेल्या या पर्वत रांगांवर हे अतिप्राचीन आणि भव्य असे हेमांडपंथी शिवालय आहे. आख्यायिकेनुसार, येथे चैत्र शुद्ध अष्टमीला शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडतो. या यात्रेचे सर्वात मोठे आणि थरारक वैशिष्ट्य म्हणजे ‘कावड यात्रा’. अत्यंत खडा, अरुंद आणि अवघड असा ‘मुंगी घाट’ सर करून लाखो भाविक महादेवाला पाण्याचा अभिषेक करण्यासाठी पाण्याचे हंडे बांधलेल्या कावडी घेऊन वर येतात. सासवडच्या भुतोजीबुवा तेली यांची मानाची ‘तेल्या भुत्याची कावड’ जेव्हा मुंगी घाटातून मानवी साखळी करून वर ओढली जाते, तेव्हा ते दृश्य अंगावर शहारे आणणारे असते. पायाला फोड आलेले असतात, ऊन डोक्यावर आग ओकत असते, पण खांद्यावरील कावड आणि मुखातील ‘हर हर महादेव’चा गजर भक्तांना थकवा जाणवू देत नाही. हे दृश्य म्हणजे मानवी इच्छाशक्ती आणि निस्सीम भक्तीचा सर्वोच्च नमुना आहे. भटक्यांची पंढरी: मढीचा कानिफनाथ

नाथ संप्रदायाचे आद्यस्थान असलेल्या मढी (पाथर्डी) येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी येथे समाधी घेतली, त्यामुळे येथूनच यात्रेला सुरुवात होते आणि ती गुढीपाडव्यापर्यंत चालते. ही यात्रा म्हणजे अठरापगड जाती, विशेषत: भटक्या विमुक्त समाजाची (उदा. गोसावी, वैदू, घिसाडी, कैकाडी) ‘पंढरी’ मानली जाते. वर्षभर गावोगावी भटकंती करणारा हा समाज या यात्रेच्या निमित्ताने एका जागी एकत्र येतो. रखरखत्या उन्हात भाविक गुळाचा किंवा साखरेचा आणि गव्हाचा ‘मलिदा’ (प्रसाद) देवाला अर्पण करतात. हा मलिदा पोटासाठी थंड, हलका आणि रखरखत्या उन्हात शरीराला त्वरित ऊर्जा (ग्लुकोज) देणारा असतो. या प्रसादामागेही एक नैसर्गिक विज्ञान दडलेले आहे. ‘अलख निरंजन’ च्या जयघोषाने मढीचा परिसर निनादून जातो.

यमाई देवीची यात्रा : मातृशक्तीचा उग्र आणि प्रेमळ जागर

सातारा जिल्ह्यातील औंध येथील यमाई देवीची यात्रा अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्वाची आहे. औंधासुर नावाच्या अतिपराक्रमी पण कपटी राक्षसाने सामान्य जनतेचा अनन्वित छळ मांडला होता. त्याचा वध करण्यासाठी साक्षात जगदंबेने यमाईचे रूप धारण केले आणि त्याचा सर्वनाश करून जनतेला भयमुक्त केले, अशी आख्यायिका आहे. येथील देवस्थान मूळपीठ मानले जाते आणि इ.स. १७४५ मध्ये या भव्य हेमाडपंती मंदिराचा जीर्णोद्धार झाला. देवीला मिठा-पिठाचा जोगवा अर्पण करण्याची प्राचीन प्रथा आजही पाळली जाते.

जेजुरीचा खंडेराया

पुणे जिल्ह्यातील जेजुरीला चैत्र पौर्णिमा हा खंडोबाचा अवतार दिन मानला जातो. या दिवशी देवाला अतिशय प्रिय असणारा सुगंधी ‘दवणा’ अर्पण करण्याची आणि तळी भंडार उधळण्याची प्रथा आहे. “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गर्जनेत संपूर्ण जेजुरी गड हळदीच्या पिवळ्याधमक रंगात रंगून जातो.

परंपरा, विधी आणि मान-पान

महाराष्ट्रातील जत्रा म्हणजे केवळ गर्दी किंवा बाजारपेठ नाही, तर ती शेकडो वर्षे अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या ‘मान-पान’ आणि ‘विधींची’ एक सुसज्ज, शिस्तबद्ध व्यवस्था आहे. या परंपरांमध्ये श्रद्धेसोबतच ग्रामीण समाजाच्या रचनेचे आणि व्यवस्थापनाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते.

सासनकाठीची कसरत आणि भक्ती:

जोतिबा आणि खरसुंडीच्या (आटपाडी) सिद्धनाथाच्या यात्रेत ‘सासनकाठी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ५० ते ७० फूट उंचीच्या बांबूच्या काठीला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवून, तिच्या तळाशी जोतिबाचा घोडा बसवला जातो. ही काठी नुसती उभी करणे हेच महाकठीण काम असते. पण इथले तरुण ही काठी स्वतःच्या खांद्यावर पेलत, ढोलाच्या तालावर तोल सावरत नाचवतात. वाडी रत्नागिरीत अशा १०८ मानाच्या सासनकाठ्या येतात. सासनकाठी नाचवणे हे केवळ शारीरिक बळाचे काम नाही, तर त्यासाठी लागणारी एकाग्रता आणि तोल हा केवळ भक्तीतूनच मिळतो, अशी येथील तरुणांची ठाम श्रद्धा आहे.

कावड

शिखर शिंगणापूरला राज्याच्या विविध भागांतून भाविक पाण्याचे हंडे कावडीत बांधून आणतात. ही कावड मुंगी घाटासारख्या १०५० मीटर उंचीच्या अवघड वाटेने वर नेणे ही एक आध्यात्मिक तपश्चर्या मानली जाते. भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड, जिचे स्वागत आमदार, तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी करतात, ही केवळ एक परंपरा नसून तो एक मानवी साखळीचा आणि सामूहिक एकजुटीचा अभूतपूर्व संगम आहे. दोन-दोन महिने अनवाणी पायाने चालत जाऊन नद्यांचे पवित्र पाणी आणून ते महादेवाला अर्पण करणे, यात निसर्गाप्रती (पाण्याप्रती) असलेली कृतज्ञता दिसून येते.

छबीना, पालखी आणि रथोत्सव

रात्रीच्या वेळी देवी-देवतांचा निघणारा ‘छबीना’ (मिरवणूक) हे जत्रेचे अत्यंत विलोभनीय रूप असते. औंधच्या यमाईच्या छबिन्यात पालखीपुढे तेलभूती, दिवटे, आराधी, गोंधळी, डवरी, घडशी हे सर्व लोककलाकार आपला पारंपरिक कलाविष्कार मोठ्या अभिमानाने सादर करतात. दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला रथ जेव्हा हजारो भाविक हाताने ओढतात, तेव्हा “आई उदे गं अंबे उदे” च्या नादाने संपूर्ण परिसर भारून जातो.

मान-पान आणि सामाजिक गुंफण

ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि समाजकारणात ‘मान-पानाला’ जे महत्त्व आहे, ते शब्दांत सांगणे कठीण आहे. प्रत्येक जत्रेत विशिष्ट विधींचा मान गावातील ठराविक कुटुंबांकडे, मग ते कोणत्याही जातीचे असोत, पिढ्यानपिढ्या दिलेला असतो. खरसुंडीच्या सिद्धनाथ यात्रेत धावडवाडीच्या मुस्लिम मानकऱ्यांनी आणि विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र येऊन देवाला नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. तसेच रात्री सासनकाठीला टक्कर देण्याचा मान ‘टकऱ्या घडशी’ समाजाचा असतो. कोणाला पालखीला खांदा देण्याचा मान, तर कोणाला तोफेची सलामी देण्याचा मान असतो. हे मान-पान केवळ अहंकार सुखावण्यासाठी नसतात, तर ते गावाची सामाजिक वीण घट्ट बांधून ठेवतात. यामुळे जत्रेच्या व्यवस्थापनात प्रत्येक घटकाला सामावून घेतले जाते आणि कोणीही उपेक्षित राहत नाही.

नॉस्टॅल्जिया: कनातीचा सिनेमा, लाल मातीतील कुस्ती

कृषी जीवनातील थकवा विसरायला लावणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जत्रेतील मनोरंजन. आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि ओटीटीच्या (OTT) जगातही जत्रेतील जुन्या मनोरंजनाच्या आठवणींचा गोडवा मनाच्या एका कोपऱ्यात कायम दरवळत असतो.

जत्रा सुरू झाली की, गावाबाहेर मोकळ्या माळावर कनातीचे (कापडी तंबूचे) तमाशाचे फड उभे राहायचे. पेट्रोमॅक्सच्या (बत्तीच्या) पिवळसर प्रकाशात लावणीचा शृंगार, ढोलकीचा कडकडाट, तुणतुण्याची तार आणि सोंगाड्याच्या बतावणीतून होणारी हास्यजत्रा याने शेतकरी आपला सगळा शीण खळाळून हसून विसरून जायचा. यासोबतच कुस्तीचे फड हे ग्रामीण मर्दुमकीचे, ताकदीचे आणि इर्ष्येचे मुख्य केंद्र असायचे. लाल मातीत (तांबड्या मातीत) जेव्हा दोन मल्ल अंगाला माती फासून शड्डू ठोकून उभे राहायचे, तेव्हा त्यांच्या केवळ शरीराचीच नाही, तर संपूर्ण गावाची इज्जत पणाला लागलेली असायची. पैलवान जिंकला की त्याला खांद्यावर बसवून ढोला-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जायची.

त्यातच लहान मुलांचे आणि तरुणांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आकाशाला भिडणारे लाकडी पाळणे आणि जीवावर उदार होऊन चालवला जाणारा ‘मौत का कुआँ’ (Well of Death). लाकडी फळ्यांच्या गोलाकार विहिरीत जेव्हा मोटरसायकल गोल-गोल फिरत वर यायची, तेव्हा तो कानठळ्या बसवणारा आवाज आणि पेट्रोलचा दर्प आजही जत्रांमध्ये जिवंत आहे.

पण या सर्वांत सर्वात रम्य आठवण आहे ती जुन्या काळातील ‘कनातीचा सिनेमा’ किंवा ‘टुरिंग टॉकीज’ची (Touring Talkies / Tent Cinema). गावाबाहेर मोकळ्या जागेत कापडाचा पांढरा पडदा लावला जायचा. समोर साधी सतरंजी किंवा थेट मातीवर बसून गावाने रात्रीचे सिनेमे पाहिले आहेत. पडद्यावर पडणारा तो धुळीने भरलेला प्रकाशझोत, मध्येच तुटणारी फिल्म, आणि ‘शोले’ किंवा दादा कोंडकेंचा ‘सोंगाड्या’ पाहताना मारलेल्या शिट्ट्या, हे सारे ग्रामीण आयुष्यातील ऑक्सिजन होते. आज मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कनातीचा सिनेमा हरवला असला, तरी त्या जुन्या आठवणींचा नॉस्टॅल्जिया प्रत्येक ग्रामीण मनाला आजही सुखावून जातो.

जत्रेची खाद्यसंस्कृती

कोणतीही जत्रा तिच्या खास खाद्यपदार्थांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जत्रेतील खाद्यसंस्कृती ही अतिशय साधी, कोणतीही कृत्रिम सजावट नसलेली पण मनाला भुरळ घालणारी असते. जत्रेच्या वाटेवर दोन्ही बाजूंना लागणारी दुकाने पाहणे हाच एक आनंदोत्सव असतो. कुरुकुरीत आणि गोड ‘खाजे’, साखरेचे पांढरे शुभ्र आणि जिभेवर विरघळणारे ‘बत्तासे’, गुळाच्या आणि तिळाच्या ‘रेवड्या’, आणि एका मोठ्या कढईत उकळत्या तेलातून थेट पाकात बुडवून काढलेली गरम-गरम जिलेबी या चवींना जगात तोड नाही. चैत्राच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात रखरखत्या उन्हात चालून आल्यावर बर्फाच्या किसलेल्या चुऱ्यावर लाल-पिवळ्या रंगाचे सायरप टाकून बनवलेला ‘बर्फाचा गोळा’ चाखण्यात जो स्वर्गीय आनंद आहे, तो आजच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेल्समधील डेझर्ट्समध्ये मिळत नाही.

यासोबतच यात्रेतील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ‘भंडारा’ किंवा महाप्रसाद. हजारो भाविक जेव्हा एकाच पंगतीत, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदाभेद न पाळता खाली मांडी घालून बसून महाप्रसाद ग्रहण करतात, तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने भक्तीचा आणि मानवतेचा संगम होतो. मढी येथे दिला जाणारा ‘मलिदा’ किंवा जेजुरीत उधळला जाणारा ‘तळी-भंडारा’ हे याच एकरूपतेचे द्योतक आहेत. हे अन्न केवळ भूक भागवत नाही, तर ते मनाला एक विलक्षण शांती देते, कारण त्यात शिजवणाऱ्याची श्रद्धा आणि वाढणाऱ्याचा जिव्हाळा मिसळलेला असतो. सामाजिक एकोपा

जत्रा आणि यात्रा या केवळ धार्मिक भावनांपुरत्या किंवा नवस फेडण्यापुरत्या मर्यादित नाहीत; त्या ग्रामीण सामाजिक एकोप्याचा सर्वांत मोठा आणि मजबूत कणा आहेत. या जत्रांमधून कुठल्याही कृत्रिम राजकीय प्रयत्नांशिवाय, अत्यंत नैसर्गिक आणि नकळतपणे सामाजिक एकोपा साधला जातो. ग्रामदैवतांच्या मूर्तीसमोर हिंदू समाजातील सर्व जातींचे लोक मोठ्या भक्तीने नतमस्तक होतात. अनेक ठिकाणी देवीची ओटी भरणारा कुणी असतो, तर छबिन्याची सजावट करणारा किंवा सनई-चौघडा वाजवणारा कुणी कलावंत असतो. वारकरी संप्रदायाचा उच्च तात्विक संदेश इथल्या जत्रांनी प्रत्यक्ष जगण्यात आणि आचरणात उतरवला आहे. येथे देव कुणा एका जातीचा नसतो, तो ‘गावचा’ असतो.

ग्रामीण अर्थव्यवस्थेची उलाढाल

जत्रा म्हणजे ग्रामीण भागातील तात्पुरते पण प्रचंड मोठे ‘मॉल’ असतात. एका मोठ्या यात्रेच्या ५ ते १५ दिवसांच्या काळात स्थानिक अर्थव्यवस्थेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. औंधच्या यमाई यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार (बैल बाजार) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे उत्तम प्रतीचे बैल, गायी, म्हशी आणि घोडे यांची खरेदी-विक्री होते आणि लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात होतात.

या व्यतिरिक्त, अर्थव्यवस्थेचे एक मोठे चक्र या जत्रेवर अवलंबून असते. फुले-हार विकणाऱ्या माळणीपासून ते लाकडी खेळणी विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत, आणि एसटी महामंडळापासून ते स्थानिक हॉटेल्स, वडापावच्या गाड्या आणि रिक्षाचालकांपर्यंत सर्वांना या जत्रेमुळे हक्काचा रोजगार मिळतो. अर्थतज्ज्ञांच्या परिभाषेत याला ‘एक्स्पॅट इकॉनॉमी’ (Expat Economy) असेही म्हणता येईल. पोटापाण्यासाठी आणि रोजगारासाठी वर्षभर मुंबई, पुणे सारख्या शहरांत गेलेले ‘चाकरमानी’ जत्रेच्या निमित्ताने न चुकता आपल्या मूळ गावी येतात. ते शहरातून कमावलेला पैसा गावात येऊन जत्रेत, देवाच्या देणगीत आणि नातेवाईकांवर खर्च करतात. त्यातून गावाची अर्थव्यवस्था वर्षभरासाठी रिचार्ज होते. जत्रा ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी आर्थिक आधार आणि श्रीमंतांसाठी दान देण्याची सर्वात मोठी संधी असते.

बदलत्या काळातील जत्रेचे अढळ आणि शाश्वत स्थान

आज एकविसाव्या शतकात, जेव्हा शहरे गगनचुंबी इमारतींनी, कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) आणि तंत्रज्ञानाने वेढली गेली आहेत, जेव्हा माणसांचा एकमेकांशी संवाद कमी होऊन तो मोबाईलच्या स्क्रीनपुरता मर्यादित राहिला आहे, तेव्हा असा प्रश्न पडतो की या यात्रा आणि जत्रांचे महत्त्व आज काय उरले आहे? पण जेव्हा आपण जोतिबाच्या डोंगरावर उधळलेला गुलाल पाहतो, मुंगी घाटात ‘हर हर महादेव’च्या गर्जनेसह अनवाणी पायांनी चढणारी कावड पाहतो, किंवा मढीच्या यात्रेत चालत येणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या डोळ्यांतील भाव पाहतो, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळते.

या जत्रा म्हणजे केवळ जुन्या परंपरा किंवा अंधश्रद्धा नाहीत; ती महाराष्ट्रातील संस्कृतीची, मातीची आणि इथल्या माणसांची सर्वांत खोलवर रुजलेली मुळे आहेत. याच जत्रांनी या मातीतील माणसाला एकोपा शिकवला, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची ताकद दिली, श्रमाचा आदर करायला शिकवला आणि कृतज्ञ राहण्याचे धडे दिले. आधुनिकतेचे वारे कितीही वेगाने वाहिले, शहरीकरणाचा वेग कितीही वाढला, तरी जोपर्यंत इथला शेतकरी मातीत घाम गाळत राहील, तोपर्यंत हलगीचा कडकडाट घुमत राहील. कनातीचा सिनेमा जरी आज बंद झाला असला, तरी आकाशाला भिडणारे पाळणे फिरत राहतील आणि ‘चांगभलं’चा आवाज असाच पिढ्यानपिढ्या आसमंत भेदत राहील.

बदलत्या काळातही या यात्रांचे बाह्य रूप थोडेफार बदलले असेल, गर्दीचे स्वरूप बदलले असेल, पण त्यांचा मूळ गाभा, ती निस्सीम भक्ती, तो गावचा जिव्हाळा आणि तो उत्साह आजही तसाच टिकून आहे. माणसाला मातीशी जोडून ठेवणारा हा सांस्कृतिक धागा भविष्यातही असाच अतूट राहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा