36 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरसंपादकीयअर्थक्षेत्रातील पोंगा पंडितांना नागडे करणारा अहवाल

अर्थक्षेत्रातील पोंगा पंडितांना नागडे करणारा अहवाल

Google News Follow

Related

अर्थकारण क्षेत्रात भरारी घेण्यासाठी ज्या ज्या पूर्वअटी आहेत, त्याची पूर्तता करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांच्या काळात केले. त्याची गोमटी फळे जगाला दिसत असली तरी काही तथाकथित तज्ज्ञ भारताच्या अर्थकारणाच्या नावाने कायम करपट ढेकर काढत असतात. अलीकडेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे आल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी वित्त सचिव यांनी बोंब ठोकली. त्यांचे कपडे उतरवणारा अहवाल जेफरीज या नामांकित वित्तसंस्थेने जारी केलेला आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वाढीवर आणि धोरणांवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या अर्थकारणाबाबत त्यांच्या नकारात्मक विधानांची जंत्री देता येईल. भारताने जेमतेम ५ टक्के विकासदर जरी गाठला तरी नशीब समजा, हे त्यांचे डिसेंबर २०२२ चे विधान आहे. २०२३-२४ मध्ये भारताने ८.२ टक्क्यांचा विकासदर नोंदवला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्क्यांचा दमदार विकासदर नोंदवला. तेव्हाही त्यांनी तोंड वाकडे केले. सेमीकंडक्टर उद्योगांची उभारणी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांबाबतही त्यांनी ‘प्रकल्प कशाला भारतीय, सेमीकंडक्टर चिपची तस्करी करा’, असे मेंदू गहाण ठेवल्यासारखे विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर जेफरीजच्या ताज्या अहवालाकडे पाहावे लागेल. जागतिक दर्जाच्या ‘जेफरीज्’ या वित्तसंस्थेचा अहवाल भारताच्या औद्योगिक भवितव्याबद्दल अत्यंत आशावादी चित्र उभे करतो. जेफरीज्‌नुसार, भारत सध्या एका “नवीन औद्योगिक क्रांतीच्या” उंबरठ्यावर उभा आहे. सरकारी प्रोत्साहनांमुळे (पीएलआय स्कीम) आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळे खाजगी क्षेत्र आता केवळ साध्या उत्पादनापुरते मर्यादित न राहता सेमीकंडक्टर, अंतराळ तंत्रज्ञान, डेटा सेंटर आणि एरोस्पेस अशा उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांत वेगाने पुढे जात आहे, असा दावा केला आहे.

हा अहवाल स्पष्ट करतो की भारत आता केवळ सुट्या भागांची आयात करणे आणि भारतात त्याची जुळणी अर्थात असेंब्लीपुरता मर्यादित राहिला नसून, मोबाईलच्या सुट्या भागांची निर्मिती, सौर ऊर्जा क्षेत्र, सेमीकंडक्टर व स्पेस क्षेत्रात २०३० पर्यंत अब्जावधी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. हे काही एका रात्रीत घडलेले नाही. इथे काँग्रेस पक्षाला नाममात्र श्रेय घेण्याचीही संधी नाही. कारण मोबाईल निर्मिती, सेमीकंडक्टर चिप निर्मिती किंवा खासगी अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारत हा २०१४ पूर्वी अंधारयुगात होता. सेमीकंडक्टर चिप ही तस्करी करण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट, असल्याचे आचरट विधान रघुराम राजन यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ करतो, तेव्हा त्यांच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तज्ज्ञ म्हणून मिरवणारा एखादा माणूस आपल्याच देशाबाबत सतत नकारात्मक कसा बोलू शकतो? हा प्रश्न रघुराम राजन यांच्याबद्दल अनेकांना पडलाय. रघुराम राजन सतत चुकीची आणि बिनबुडाची विधाने करतायत. लोकांची दिशाभूल करण्याचा इरादा यामागे आहे की काय, असा संशय आता येऊ लागला आहे.

चीनप्रमाणे केवळ उत्पादन क्षेत्रावर भर देऊन भारताला अपेक्षित आर्थिक यश मिळणार नाही. भारताचा विकास दर कागदावर मजबूत दिसत असला, तरी प्रत्यक्षात देशात नव्या नोकऱ्यांची आणि खाजगी गुंतवणुकीची मोठी कमतरता असल्याचे ते अधोरेखित करतात. केवळ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर वस्तूंची ‘असेंब्ली’ करून देशाच्या अर्थकारणात फार मोठे मूल्यवर्धन होत नाही, त्यामुळे भारताने उत्पादन क्षेत्राऐवजी सेवा क्षेत्र आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा राजन यांचा युक्तिवाद आहे.

गंमत पाहा, एकेकाळी देशातील सगळे कारखाने चीनमध्ये हलवण्याचा धोरणात्मक निर्णय अमेरिका आणि युरोपातील देशांनी घेतला. आज हे देश पश्चात्ताप करतायत. चीनवर निर्माण झालेले अवलंबित्व त्यांना प्रचंड खुपू लागलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न करतायत. कारण रोजगार वाढवायचे असतील तर उत्पादन क्षेत्राला पर्याय नाही. एआयमुळे सेवाक्षेत्रात वाढ झाली तरी रोजगारांची संख्या मात्र झपाट्याने कमी होते आहे. त्यामुळे रोजगार वाढवायचे असतील तर उत्पादन क्षेत्राला पर्याय नाही.

एकीकडे म्हणायचे की, ‘विकासदर वाढल्याचे दिसले तरी देशात रोजगारांची आणि खासगी गुंतवणुकीची कमतरता आहे’, दुसऱ्या बाजूला रोजगार निर्माण करण्याच्या प्रयत्नांची खिल्ली उडवायची. सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची गरज काय? असे फाजील सवाल उपस्थित करायचे आणि ‘उत्पादन क्षेत्रावर भर नको’, असे आचरट सल्ले द्यायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही करतायत, त्यामुळे भारतात क्रांती होते आहे, हे जगाला दिसते आहे. विदेशात राहून भारताच्या प्रगतीकडे पाहणाऱ्या राहुल गांधी यांच्या कंपूतील तज्ज्ञांनी मात्र डोळ्यांवर कातडे ओढलेले दिसते. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रेमाखातर ते देशाची प्रगती नजरेआड करत असून वेळप्रसंगी देशाची दिशाभूल आणि बदनामी करण्याचीही त्यांची तयारी आहे. ही मंडळी जनतेला ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत जे त्यांना दाखवायचे आहे. ते वास्तव असले नसले तरी त्यामुळे त्यांचे काही बिघडत नाही. त्यासाठी कपाळावर मूर्खपणाचा शिक्का मारून घेण्याची त्यांची तयारी आहे.

देशाच्या अर्थकारणाबाबत जगाच्या मनात संशय निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सपशेल फसला आहे. जेफरीजने हे सिद्ध केले आहे. कारण या बड्या वित्त संस्थांकडे स्वतःच्या तज्ज्ञांचे मोठे जाळे असते, जे जागतिक अर्थकारणाचा अभ्यास करीत असतात. रघुराम यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांच्या चष्म्यातून पाहण्याची त्यांना गरज नसते. सध्याची रघुराम राजन यांच्यासारख्यांची विधाने पाहून तर त्यांना अशा पूर्वग्रह दूषित तज्ज्ञांना अशा संस्था नोकरीवर ठेवण्याचीही शक्यता नाही.

सेमीकंडक्टर चिपशिवाय जिथे देशाचे पान हलणार नाही, अशी परिस्थिती असताना ‘देशात सेमीकंडक्टर प्रकल्पांची गरज काय?’, असा सवाल विचारणारे तज्ज्ञ भारतात आहेत. मोदींनी २०२१ मध्ये देशाला पहिले ‘इंडिया सेमी कंडक्टर मिशन’ दिले. ७६ हजार कोटींची गुंतवणूक केली. २०२६ मध्ये ‘इंडिया सेमी कंडक्टर मिशन २.०’ सुरू केले. त्यासाठी १२७५०० कोटी रुपयांची तरतूद केली. आज परिस्थिती अशी आहे की, वर्षाअखेरपर्यंत देशात चिपच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होईल. भारत येत्या काही वर्षांत सेमीकंडक्टर चिपचा प्रमुख निर्माता आणि निर्यातक बनेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेमीकंडक्टर चिपसाठी आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही. दुसरा देश आपली अडवणूकही करू शकणार नाही. हे भारताचे यश आहे.

हे ही वाचा:

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

लडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

रघुराम राजन यांच्यासारख्यांची अडचण ही आहे की, याचे श्रेय काँग्रेसला मिळणार नाही, ते मोदींना मिळणार आहे. मोदी रघुराम राजन यांच्यासारख्यांना फार किंमत देत नाहीत. त्यांचे सल्ले घेत नाहीत. त्यांच्या नकारात्मक मतांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे रघुराम राजन यांच्यातला तज्ज्ञ अस्वस्थ होतो. अशा वेळी जे त्यांच्याकडे येतात, सल्ले मागतात, त्यांच्या सोयीचे सल्ले देणे आणि त्यांच्या मनासारखे बोलणे एवढेच काम आता त्यांच्याकडे उरलेले आहे.

काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या सावलीत वाढलेले आणि बहरलेले तज्ज्ञ सध्या बेरोजगार झाले आहेत. त्यांना सतत नैराश्याचे झटके येत असतात. तोंडातून वाट्टेल ती विधाने येत असतात. देशाचे माजी अर्थमंत्री, गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे ताजे विधान ऐका. ते म्हणतायत, ब्रिक्स परिषदेचे आयोजन करून देशाचा काय फायदा होणार आहे? यांनी बुद्धी इतकी गहाण ठेवली आहे की उद्या वेटलिफ्टिंग करणाऱ्या खेळाडूला हे एवढे वजन उचलून काय फायदा, किंवा बॉक्सिंग करणाऱ्यालाही विचारतील एवढी हाणामारी करून काय फायदा? वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग असो वा ब्रिक्स परिषदेचे आयोजन; या गोष्टी जे करतात त्यांना दोन फायदे होतात. एक तर त्यांना स्वतःची क्षमता किती हे लक्षात येते, जगालाही त्यांची ताकद क्षमता पाहता येते हा दुसरा फायदा. परंतु ज्यांनी मोदी विरोधाची झापडे डोळ्यांवर लावली आहेत, त्यांना यापैकी काही दिसणार नाही, रघुराम राजन असो वा चिदंबरम.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा