32 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरसंपादकीयसिलिकॉन व्हॅलीतील विषकन्यांचा अमेरिकेला ताप

सिलिकॉन व्हॅलीतील विषकन्यांचा अमेरिकेला ताप

Google News Follow

Related

लॉस एन्जल्समध्ये राहणारे एक गोड अमेरिकी जोडपं. निक आणि रुबी. लग्नाला दहा वर्षे झाली होती. या दांपत्याला दोन मुली होत्या. निक एरोस्पेसशी संबंधित एका स्टार्टअपचा एक संस्थापक होता. एक दिवस अचानक एफबीआयची टीम त्यांच्या घरी धडकली. रुबीला अटक करून घेऊन गेली. ही तक्रार निकनेच केली होती. काही दिवस तिच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्यानेच एफबीआयला तक्रार केली होती. रुबी त्याच्या लॅपटॉपमधील काही संवेदनशील डेटा चोरत असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिला तिच्या विश्वासघाताची योग्य शिक्षा दिली होती.

अमेरिका चीन, अमेरिका रशिया यांच्यातील वैमनस्य आता टीपेला पोहोचले आहे. टेरीफ वॉर तीव्र झाले आहे. हे व्यापारी युद्ध नाही. ही वर्चस्वाची लढाई आहे. अमेरिकेसाठी ती अस्तित्वाची लढाईही आहे. एक तर तु राहशील किंवा मी राहीन, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा समोरच्याला नेस्तनाबूत करण्यासाठी अत्यंत घातक हत्यारे वापरली जातात. चीन आणि रशियाने यासाठी अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा विषकन्यांचा वापर सढळ हस्ते केलेला आहे, अशी माहिती द टाईम्स या ब्रिटीश वर्तमानपत्राच्या एका अत्यंत खळबळजनक अहवालातून समोर आलेली आहे.

या अहवालात एक दोन नाही, खंडीभर उदाहरणे देण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यात अमेरिकेत अनेक चीनी हेरांची धरपकड झाली. त्यात मोठा भरणा महिला आणि तरुणींचा आहे. देखण्या आणि आकर्षक असलेल्या या महिला हेरगिरी करून डेटा चोरण्याचे काम करीत होत्या. महत्वाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत किंवा संरक्षण, एरोस्पेस, संशोधन आदी महत्वाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्वाच्या व्यक्तिंवर नजर ठेवली जात आहे. कोणी तरी त्यांचे व्यावसायिक सुरक्षा कवच भेदून त्यात शिरकाव कऱण्याचा प्रयत्न करते आहे. ती व्यक्ति अगदी जवळपास वावरणारी, कदाचित अगदी जवळची असते. एखादी देखणी सहकारी, कार्यालयातील मैत्रीण, प्रेयसी किंवा तुमची पत्नीही. जिच्या पासून तुम्हाला दोन मुलं आहेत.

ही उदाहरणे चक्रावणारी आहेत. दहा वर्षांपूर्वी एका सेमिनारमध्ये निक आणि रुबीची भेट झाली. निक एका एरोस्पेस स्टार्टअपची जुळवाजुळव करत होता. वर्तमानपत्रात त्याच्या नव्या उपक्रमाबद्दल बरेच छापून आले होते. रुबी laमॅनेजमेंटची विद्यार्थिनी. पहिल्या भेटीतच तो तिच्यावर लट्टू झाला. ते स्वाभाविक होते. ती अत्यंत आकर्षक होती. गोड गुलाबी चेहरा, निळसर डोळे, अत्यंत सुडौल बांधा. ती फक्त चार्मिंग नव्हती, हुशारही होती. एरोस्पेस या विषयाबाबत तिला जाणून घ्यायचे होते. निक तिच्यावर भाळला. त्याचे वयही भाळण्याचेच होते. वर्षभर दोघे एकमेकांना भेटत राहीले. लवकरच ते प्रेमात पडले. पुढे त्यांचे लग्न झाले. दहा वर्षे उलटून गेल्यावर अचानक त्याला तिच्याबद्दल संशय यायला लागला. तिने त्याच्या नकळत लॅपटॉपचा एक्सेस मिळवल्याचे कळले तेव्हा तो हादरला. त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक संवेदनशील माहिती होती. आपल्या दोन मुलांची आई आपल्या लॅपटॉपमधून काय मिळण्याचा प्रयत्न करते आहे, असा प्रश्न त्याला पडला होता. त्याने शहाणपणा केला. त्याने याबाबत त्याच्या पार्टनरची चर्चा केली. पुढील काही दिवस तो पत्नीवर नजर ठेवून होता. त्याचा संशय पक्का झाल्यानंतर त्याने रितसर तक्रार केली. एफबीआयने तिला अटक केली. चौकशी अंती ती एक चीनी हेर असल्याचे उघड झाले.

ब्रिटीश वर्तमान पत्र द टाईम्सने काही माजी सीआयए एजंट, सायबर सेक्युरीटी तज्ञ्ज, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत महत्वाच्या पदावर बसलेल्या काही लोकांशी चर्चा करून एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल अत्यंत खळबळजनक आहे. त्या अहवालात अशी ढीगभर उदाहरणे आहेत. चीनी आणि रशियन हेरांनी अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली पोखरून काढली आहे. अत्यंत संवेदनशील माहितीची दर साल चोरी होते आहे. चोरीचा हा आकडा दर साल ६०० अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे. भारताच्या खजिन्यात आज ७०० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. यावरून चोरीचा हा आकडा किती मोठा आहे, हे लक्षात घ्या. ही माहिती चीनची श्रीमंती वाढवते आहे. अमेरिकेच्या खजिन्याला गळती लावते आहे.

जिम केरीचा द ट्रुमन शो हा एक अफाट सिनेमा आहे. एक नामवंत निर्माता, एका चॅनेलचा मालक. ट्रुमन बरबँक नावाच्या एका व्यक्तिचे जीवन एका टीव्ही शोच्या रुपात विकून रग्गड पैसा कमावत असतो. त्याच्यासाठी एक आभासी जग निर्माण करण्यात आलेले असते. त्याची पत्नीही या बनावट दुनियेचा भाग आहे, हे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा त्याला धक्का बसतो. तसाच धक्का या हेरगिरीच्या रॅकेटमुळे अनेक आयटी व्यावसायिकांना बसलेला आहे.

हेरगिरीसाठी अशी सुंदर फुलपाखरं तयार कऱण्याची एक खूप मोठी यंत्रणा चीन आणि रशियाने विकसित केले आहे. अगदी कोवळ्या वयात सुंदर मुलींना हेरले जाते. त्यांना चालण्या बोलण्यापासून प्रत्येक गोष्टीत तयार केले जाते. भाषा प्रभुत्व, संवाद कला, आकर्षक हावभाव, मार्शल आर्ट्स, यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो एखाद्याला जाळ्यात ओढणे आणि त्याच्याकडून माहिती चोरणे. अनेकदा देहविक्रयाच्या व्यवसायात असलेल्या मुलींचाही यासाठी वापर केला जातो. आयटी प्रोफेशनल्ससोबत थिंक टॅंकशी संबंधित विचारवंत, राजकारणी, सरकारी अधिकारी यांनाही जाळ्यात ओढण्यात येते. ज्यांना बकरा बनवायचे आहे, त्यांची संपूर्ण माहिती, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांची कमजोरी असा सगळा तपशील या फुलपाखरांना पुरवला जातो. त्यामुळे जाळ्यात ओढण्याची प्रक्रीया सोपी होते.

हेही वाचा..

सिडनीमध्ये रोहित- विराटची फटकेबाजी; भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय

अलीगढमध्ये पाच मंदिरांवर लिहिले “आय लव्ह मोहम्मद”

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या अकील खानला अटक

निवडणुकीपूर्वी मोतिहारीत शस्त्र साठा सापडला

२०१८–२०२3 दरम्यान अमेरिकेची एफबीआय आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी असे अनेक अहवाल सरकारला दिले. ज्यात चिनी, रशियन आणि इतर परकीय गुप्तचर संस्था सिलिकॉन व्हॅलीला पोखरतायत. स्टार्टअप्स, संशोधक आणि संरक्षण-संबंधित तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये हनीट्रॅपच्या माध्यमातून माहिती मिळवत आहेत. अशी माहिती अमेरिकी सरकारला सादर केली. सुंदर कॉलेज तरुणी, मॉडेल्स, सिनेमा आणि छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या देखण्या तरुणी यांचा हेरगिरीसाठी वापर केला जातो आहे. त्यांना भरपूर पैसे देऊन वापरले जाते आहे. डेटिंग-अप्लिकेशन, किंवा बिझनेस मीटिंग्स ही भेटीची माध्यमे बनतात. ही ओळख पद्धतशीरपणे वाढवली जाते. पुढे विश्वासात घेऊन किंवा चोरुन कंपनीची गुप्त माहिती, कोड, किंवा ग्राहक डेटाबेस मिळवला जातो.

सोशल मीडियाचाही यासाठी सढळ वापर केला जातो. अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर स्टार्टअपमध्ये वरिष्ठ अभियंता असलेल्या जेम्सला लिक्डीनवरून एक आकर्षक महिलेने संपर्क साधला. एका बड्या रिक्रूटमेंट कंपनीची एक्झिक्युटीव्ह अशी तिने ओळख दिली. जेम्सला बड्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. पुढे दोन महिन्यांच्या संवादात जेम्सने आपला काही सॉफ्टवेअर कोड आणि AI अल्गोरिदम तिच्यासोबत शेअर केले. काही काळाने त्याच्या लक्षात आले की तिचा प्रोफाईल बनावट होता. त्याला गळाला लावून माहिती काढण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये चीन आणि अमेरिकेत हा राडा वाढणार आहे. त्यामुळे अमेरिकाभर पसरलेल्या चीनी एजंटवर वरवंटा चालवण्याशिवाय ट्रम्प यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा