26 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरसंपादकीयसरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?

सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?

Google News Follow

Related

रा. स्व. संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे काल नागपूरमध्ये तृतीय वर्ष, संघशिक्षा वर्गाच्या समारोप सत्रात बौद्धिक झाले. त्यावर माध्यामामध्ये जोरदार हंगामा झाला. सरसंघचालकांनी भाजपाला झापले, त्यांचे कान उपटले, अशा बातम्यांचे पीक आले. संघाने भाजपाला सत्तेवरून खाली खेचावे, असे विनोदी सल्ले उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत देताहेत. उद्धव ठाकरे यांनीही अशीच मनोरंजक टीप्पणी केलेली आहे. संघाचे बौद्धिक पचायला जड आणि समजायला अवघड असते हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेले आहे.

ज्यांना संघ म्हणजे काय? ते माहित नाही. संघ भाजपाचे संबंध कसे असतात ते माहिती नाही, ते अज्ञानातून किंवा जाणीवपूर्वक अशा बातम्यातून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. सरसंघचालकांचे बौद्धिक तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गात झाले. स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी दरवर्षी देशभरात अशा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. तृतीय वर्ष मात्र फक्त नागपूरात होते. मोहनरावांच्या भाषणात स्वयंसेवकांना काही वावगे वाटले नाही. संघ देशाच्या भल्यासाठी काम करतो, कोणत्या राजकीय पक्षाच्या भल्यासाठी नाही, हे त्यांना ठाऊक असते. तृतीय वर्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या स्वयंसेवकांना संघ विचारधारेची ओळख झालेली असते. ज्यांना संघ ठाऊक नाही त्यांना या भाषणात फटकारे दिसले.

भगव्या ध्वजाला संघाचे फडके म्हणणारे, संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्व खुंटीला टांगून मुस्लीमांपुढे लोटांगण घालणारे उद्धव ठाकरे यांना मुळात सरसंघचालकांच्या भाषणावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी आता मुस्लीम संघटनांबाबत चर्चा करायला हवी. परंतु, तरीही ते बोलले. निवडणूक प्रचारात संघाला विनाकारण ओढण्यात आले, हा सरसंघचालकांचा टोला तर केवळ ठाकरेंसाठी होता. मुस्लीमांना खूष करण्यासाठी प्रचार सभांमधून संघावर टीका करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही केले. आज सामनामध्ये अग्रलेख खरडलेला आहे. ‘सरसंघचालकांचे बौद्धिक, पण उपयोग होईल काय?’ हा अग्रलेखाचा मथळा आहे. बाकी कोणावर होईल न होईल, परंतु ठाकरेंवर तरी या बौद्धिकाचा परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

संघाने या देशाला दोन पंतप्रधान दिले. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. दोघेही संघाचे प्रचारक होते. सत्तेच्या सर्वोच्च पदावर आल्यानंतरही त्यांनी स्वयंसेवकत्व जाहीरपणे मिरवले. संघ ही संघ परिवारातील मातृ संघटना आहे. संघानेच आपले पूर्णवेळ प्रचारक देऊन भाजपा, विहिंप, अभाविप, मजदूर संघ, आदी संघटना वाढवल्या. त्यांना लौकीक मिळवून दिला. आजही भाजपामध्ये प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावर संघटन मंत्री नावाचे जे पद असते त्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक असलेले समर्पित कार्यकर्ते नियुक्त केले जातात. संघाचे हे द्वैत अनेकांच्या बुद्धीच्या पलिकडले असते. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, याचा फैसला नागपूरमध्ये होणार, अशा प्रकारच्या बिनडोक बातम्या याच अज्ञानातून पाडल्या जातात.
संघाचे हे योगदान मोदींनीही अनेकदा जाहीरपणे मान्य केले आहे. भाजपाला सत्तेवर आणण्याचे यश माझे नाही, यासाठी कित्येक पिढ्या खपल्या, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. झिजलेल्या या पिढ्या संघ कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले मोदी स्वतःही एक आहेत.

नागपूरात सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात देशात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीवर टिपण्णी केली. ‘लोकसभेच्या निवडणुका युद्धा सारख्या लढल्या गेल्या’, असे ते म्हणाले. ‘देशात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्पर्धा असते. प्रत्येक जण पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु, स्पर्धा करताना मर्यादांचे पालन झाले नाही, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली गेली असल्याचा प्रचार करण्यात आला. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला’, अशी अनेक विधाने सरसंघचालकांच्या भाषणात आहेत. ही विधाने भाजपाच्या रोखाने करण्यात आलेली आहेत, असे कसे म्हणता येईल?
या निवडणुकीत असत्याचा प्रचार करण्यात, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. भाजपा आरक्षण रद्द करणार, असा जोरदार प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी करत होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाच्या एका व्हिडीओमध्ये छेडछाड करून हा व्हीडीओ जोरदार व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी एफआयआर झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटकही झाली. या निवडणुकीला युद्धाचे स्वरुप देण्याचे कामही काँग्रेसनेच केले. पाकिस्तानातून काँग्रेस नेत्यांवर, इंडी आघाडीतील अन्य नेत्यांवर शुभेच्छांचा पाऊस पडत होता. या शुभेच्छा मोदींना पराभूत करण्यासाठी होत्या.
तथाकथित उच्चवर्णीयांना मागासवर्गीयांशी आणि मुस्लीम आरक्षणाचा वाद उकरून हिंदूना मुस्लीमांशी लढवण्याचे कामही काँग्रेसचे. १ लाख रुपयांचे तद्दन खोटे ठकाठक आश्वासनही काँग्रेसचे.

सरसंघचालकांचे भाषण कोण्या पक्षाच्या विरोधात आणि बाजूने नव्हते. ते देशाच्या भल्यासाठी होते. चूकलेल्या प्रत्येकाला खडे बोल सुनवण्याचे काम त्यांनी केले. चार खडे बोल भाजपालाही अधिकारवाणीने सुनावले. ‘काम करतो, पण अहंकार करत नाही, तोच सच्चा सेवक’. अशा कान पिचक्या त्यांनी भाजपालाही दिल्या. मणिपूर वर्षभर धुमसतो आहे, यावर त्यांनी चिंताही व्यक्त केली. या चिंता त्यांनी वडीलकीच्या नात्याने व्यक्त केलेल्या आहेत. त्यात हिशोब चुकते करण्याचा राजकीय विचार नाही. कारण हे राष्ट्रकारण आहे, राजकारण नव्हे.

हे ही वाचा:

नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार, पेमा खांडूं बनले मुख्यमंत्री!

डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश

धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!

विरोधी पक्षांना देशाच्या भल्याचे हिताचे कितपत घेणे देणे हा प्रश्नच आहे. उद्धव ठाकरेंनी हे तत्काळ सिद्ध केले. सरसंघचालकांच्या विधानाचे राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मणिपूरवरून ते थेट कश्मीरवर घसरले. ३७० कलम हटवून काय झाले, असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला. उद्धव ठाकरे काश्मीरच्या हिंसाचारावर अनेकदा बोट ठेवतात. परंतु, या प्रश्नाचे जन्मदाते जवाहरलाल नेहरु यांच्यावर मात्र कधी ठपका ठेवताना दिसत नाहीत. काश्मीर, खालिस्तानी चळवळ आणि धुमसत्या ईशान्य भारताचा वारसा देशाला काँग्रेस पक्षाकडून मिळालेला आहे.

या तिन्ही चळवळी मागे पाकिस्तान, चीन, अमेरीकेसारख्या विदेशी सत्ता आहेत. त्यातले बारकावे उद्धव ठाकरे यांना माहीत असण्याची शक्यता शून्य. सरसंघचालकांच्या सुरात सूर मिसळताना, त्यांच्या हृदयात देशाबद्दल जी तगमग आहे, त्याची थोडी अनुभूती घेतल्यानंतर ठाकरेंनी वक्तव्य केले असते तर ते उचित ठरले असते. संपूर्ण आय़ुष्य देशाला समर्पित करणाऱ्या सरसंघचालकांच्या विधानावर टीप्पणी करण्याची योग्यता असलेल्यांनाच त्यावर टीप्पणी करण्याचा नैतिक अधिकार आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना रोखणार कोण? परंतु, स्वयंसेवकांनी त्यातून बोध घेणे अपेक्षित आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
165,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा