30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरसंपादकीयमैत्रीपूर्ण लढतीची चर्चा; मविआ आटोपल्याची पोचपावती

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा; मविआ आटोपल्याची पोचपावती

Google News Follow

Related

मविआतील तीन प्रमुख पक्षांच्या वाटाघाटीची चर्चा आता मैत्रीपूर्ण लढतीच्या वळणावर आलेली आहे. पाच जागांवर अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता आहे असा अधिकृत प्रस्ताव द्या, अशी मागणी उबाठा गटाने केली आहे. मैत्रीपूर्ण लढती हा शब्द नवा नसला तरी आजवर कोणत्याही युती किंवा आघाडीत झालेल्या लढती मैत्रीपूर्ण असल्याचे उदाहरण नाही. मैत्रीपूर्ण लढत या शब्दाच्या आडून मविआ नावाने प्रकरण आटोपल्याची कबूली मविआचे नेते देत आहेत. मविआतील पक्ष एकमेंकांसमोर शड्डू ठोकणार आणि एकमेकांच्या उमेदवारांना जाहीर सभांतून ठोकणार हाच मैत्रीपूर्ण लढत या उक्तीचा अर्थ आहे.

एक ठिणगी पडल्यानंतर त्याचा भडका व्हायला फार वेळ लागत नाही. पहिली ठिणगी सांगलीत पडली. दुसरी उत्तर पश्चिम मुंबईत. त्यानंतर भिवंडी, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई असा हा मामला वाढत चालला आहे. कोल्हापूरमधून काँग्रेसने शाहु महाराजांना उमेदवारी दिलेली आहे. सांगलीत काँग्रेसने ताणून धरल्यामुळे उबाठा गटाने कोल्हापुरात शाहु महाराजांचा प्रचार बंद केला आहे. मातोश्रीवरून आदेश आल्या शिवाय हे घडलेले नाही. हे लोण आता पसरत जाणार आहे. पोपट मेला आहे, असं न सांगता तो हालचाल करत नाही, बोलत नाही, ध्यानस्थ बसला आहे, असे सांगण्याचा हा प्रकार. काँग्रेसला मैत्रीपूर्ण लढतीसाठी हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे. हे सत्य की वावड्या हे कळायला मार्ग नाही. परंतु, वावड्यांच्या आधारावरही पत्रकार प्रश्न विचारू शकतात. तसा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आल्यावर काँग्रेसने तसा प्रस्ताव द्यावा, असे म्हटले. यामुळे भाजपाचा फायदा होईल असेही सांगितले.

भाजपा शिवसेनेची युती २५ वर्षे टिकली. परंतु, या काळात अनेक महापालिकांमध्ये भाजपा-शिवसेना आमने सामने उभे ठाकले. जेव्हा असा सामना झाला तेव्हा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर तिखट हल्ले केले. छत्रपती संभाजी नगरच्या महापालिका निवडणुकीत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनेवर टीकेचा भडीमार केला होता. शिवसेनेनेही मुंडेला लक्ष्य केले. या निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला. भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत अपवादात्मक नाही. हे ठाण्यात घडले, कल्याण डोंबिवली आणि मुंबईतही घडले. अशा लढती मैत्रीपूर्ण वगैरे अजिबातच नसतात. दोन्ही पक्षांनी प्रचारा दरम्यान एकमेकांची अंडीपिल्ली बाहेर काढली. एकमेकांच्या नेत्यांवर जळजळीत प्रहार केले. तरीही युती कायम राहिली याचे कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दिलदारी, भाजपा नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा समजुतदारपणा आणि हिंदुत्वाची विचारधारा. बाळासाहेबांनी मैत्रीपूर्ण लढतीचे वर्णन मैत्रीपूर्ण बलात्कार असे केले होते.

उबाठा गटाने हिंदुत्वाशी काडीमोड घेतला असल्यामुळे मविआतील तीन पक्षांची विचारधारा आता सारखीच असली तरी या नेत्यांमध्ये ना दिलदारपणा दिसतो, ना समजुतदारपणा. भाजपाबाबतचा पोटशूळ या एकमेव फेव्हीकॉलमुळे हे तिन्ही पक्ष एकत्र नांदत होते. भाजपाविरुद्ध एकत्र आलो तर जिंकू हा समज हे समीकरण मजबूत करत होता. परंतु, विजयाची शक्यता मावळत चालल्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या उरावर बसण्याची शक्यता अधिक आहे.
आघाडीतील एक पक्ष बाहेर पडल्यानंतर नेमके काय होते याची झलक वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखवलेलीच आहे. त्यांनी उबाठा गटावर कठोर प्रहार करायला सुरूवात केलेली आहे. मविआशी चर्चा बंद झालेली नाही, असे म्हणताना ते संजय राऊत यांच्यावर कडवे प्रहार करताना दिसत आहेत. त्यांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधायला सुरूवात केलेली आहे. बराच काळ एकमेकांच्या जवळ राहीलेले जेव्हा लढायला समोर उभे ठाकतात तेव्हा त्या लढाईमध्ये अधिक कडवटपणा असतो.

हे ही वाचा :

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

अतिकनंतर मुख्तार अन्सारीचाही तुरुंगात मृत्यू; दोघांमध्ये गुन्ह्यांचेही साम्य आणि मृत्यूतही

इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

वंचित बाजूला सरल्यामुळे राज्यात तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झालेलीच होती. त्यात वंचित आता छोट्यामोठ्या गटांना सोबत घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनोज जरांगे असे छोटे मोठे गट एकत्र करण्यात वंचितला यश आले तर राज्यात तिसरी शक्ती निर्माण होईल. ही आघाडी काँग्रेसच्या सेक्युलर मतपेढीवर डल्ला मारणार. एकास एक लढतीची शक्यता संपुष्टात आणणार. त्यामुळे मविआला महायुतीच्या विरोधात जिंकण्याची जी पुसट आशा होती ती आशा संपुष्टात आलेली आहे. जिंकण्याची शक्यता कमी असताना हरण्यासाठी एकत्र राहण्याची गरज काय, असा विचार आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध नसल्यामुळे या उरलेल्या दोन पक्षांचा आपल्याला कितपत उपयोग होईल याबाबतही काँग्रेस नेत्यांमध्ये साशंकता आहे. एकत्र लढून जर हक्काचे मतदार संघ उबाठा गटाला देण्यापेक्षा ताकदीने लढून आपली मतपेढी सांभाळू असा विचार यामागे आहे. हक्काचे मतदार संघ उबाठा किंवा शरद पवार यांच्या गटाकडे गेले तर पक्षात मोठी नाराजी निर्माण होऊन अनेक नेते वंचित किंवा महायुतीकडे वळतील अशीही काँग्रेस नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच पळापळ रोखण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे पिल्लू सोडले आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली तर ती पाच मतदार संघापुरती होणार नाही. आज पाच मतदार संघातील कार्यकर्ते आवाज उठवत असले तरी अन्य मतदार संघातूनही हेच चित्र निर्माण होईल. मुंबईतील उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व या तीन जागांबाबत काँग्रेसने उबाठा गटाची पंचाईत केली तर मविआची नौका फुटल्यात जमा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा