31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरसंपादकीयपवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

ज्या अधिकारवाणीने उद्धव ठाकरे यांची उणीदुणी सांगितली, त्याच अधिकार वाणीने पवारांनी ठाकरेंच्या पक्षाचे भवितव्यही सांगितले

Google News Follow

Related

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा जर बारकाईने विचार केला तर आगामी काळात शरद पवार आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो. याला विलिनीकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार ठरण्याची शक्यता आहेत. कारण मोदींनी न पटल्यामुळे आणि पचल्यामुळे हे घडणार आहे. उद्धव ठाकरेंचे वस्त्रहरण करण्याचा कार्यक्रम पवारांनी या मुलाखतीतूनही पार पाडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी निवडणूक आयोगाने अजित पवार यांना बहाल केल्यानंतर उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. शरद पवारांना या प्रश्नाचे उत्तर सापडलेले दिसते. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत देशातील राजकारणाची दशा आणि दिशा स्पष्ट करताना त्यांच्या पक्षाचे भविष्य सुद्धा सांगून टाकले आहे.

देशातील प्रादेशिक पक्ष भविष्यात एक तर काँग्रेसमध्ये विलिन होतील किंवा काँग्रेसच्या अधिक जवळ जातील असे भाकीत पवारांनी या मुलाखतीत केलेले आहे. तुमच्या पक्षाचे काय? असा सवाल जेव्हा त्यांना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, काँग्रेस आणि आमची विचारधारा सारखीच आहे. आम्ही सुद्धा नेहरु-गांधींचे विचार मानणारे लोक आहोत. विलिनीकरणाबाबत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेता येईल.

पवारांना प्रश्न विचारला होता, त्यांनी आपल्या पक्षाबाबत चर्चा केली इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यांनी उबाठा शिवसेनेसह अन्य पक्षांचे सुद्धा भविष्य वर्तविले. मविआमध्ये ठाकरेंचा पक्ष सामील झाल्यापासून पवार आणि ठाकरे यांच्यातील द्वैत संपलेले आहे. एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्तेपद यशस्वीरित्या सांभाळून संजय राऊतांनी याची सुरुवात केली.

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचारित्रात शरद पवारांनी ज्या अधिकारवाणीने उद्धव ठाकरे यांची उणीदुणी सांगितली, त्याच अधिकार वाणीने शरद पवारांनी ठाकरेंच्या पक्षाचे भवितव्यही सांगितले. मविआतील उबाठा शिवसेना सुद्धा पवारांच्या भाकीताप्रमाणे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, याचे संकेत पवारांनी दिलेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत. मला त्यांचे विचार ठाऊक आहेत. तेही आमच्यासारखेच आहेत, असे पवारांनी सांगून टाकलेले आहे.

 

पवार जे काही बोलतात, त्यातून ठाकरेंची मानसिकता आणि कल स्पष्ट होतो आहे. वैचारीक दृष्ट्या काँग्रेस पक्ष आम्हाला जवळचा वाटतो. आम्ही गांधी नेहरुंच्या विचारावरच चालतो, असे पवार म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात की, ठाकरेंचे विचार आमच्यासारखे आहेत. याचा अर्थ ठाकरे सुद्धा काँग्रेसी विचारांचे आहेत, हे पवारांनी सांगून टाकले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांना कळले आहे, आता पक्ष चालवणे शक्य नाही!

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हीच नावे कायम…विरोधातील याचिका फेटाळल्या!

सदावर्ते दांपत्याचे एसटी बँक संचालकपद गेले!

राहुल गांधी आता अंबानी-अदानींबद्दल बोलत नाहीत, त्यांच्याकडून किती माल घेतला?

आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे उबाठा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेदा जाहीरपणे सांगितले आहे. ते शरद पवारांनी एका फटक्यात खोटे ठरवले. ठाकरेंचे विचार शरद पवारांसारखे आहेत, याचा अर्थ शरद पवार हिंदुत्ववादी बनले आहेत, असा अजिबात होत नाही. ठाकरे काँग्रेसी बनले आहेत, असा मात्र निश्चितपणे होऊ शकतो, असा पवारांच्या विधानाचा अर्थ काढता येऊ शकतो. ठाकरेंचे विचार आमच्यासारखेच असल्याचे सांगून पवारांनी ते स्पष्ट केलेले आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले. काँग्रेसचे विद्यमान नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना वारंवार अत्यंत शेलक्या शब्दात झोडले. त्यांचा पुत्र मात्र काँग्रेसी विचारांचा आहे, असा दावा शरद पवार करीत आहेत.

 

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा सांगू नये. बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचा वैचारिक वारसा आम्ही पुढे नेत आहोत हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा योग्य असल्याचा अर्थही शरद पवारांच्या विधानातून काढता येतो.

‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या भागात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्य आणि एकूणच वकूब किती मर्यादित आहे हे अत्यंत परखडपणे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये शरद पवार बसलेल्या खोलीत उद्धव ठाकरे प्रवेश करतात. त्यावेळी शरद पवार कोणासोबत तरी चर्चा करतायत. ते आत आलेल्या उद्धव ठाकरे यांना बाहेर थांबायला सांगतात. हा व्हीडिओ बहुधा सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानातील आहे. इथे हा व्हीडिओ काढणाऱ्या इसमाने शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय हे कांड केले असण्याची शक्यता कमीच आहे. पवारांच्या इशाऱ्यावरून झालेले हे ठाकरेंचे वस्त्रहरण होते असे मानायला वाव आहे. आता तेच पवार पुन्हा एकदा मी हिंदुत्व सोडलेले नाही, या ठाकरेंच्या दाव्याचे पोस्टमॉर्टेम करतात. त्यांना काँग्रेसी विचारांचे ठरवतात. ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याची शक्यता व्यक्त करतात. हेही ठाकरेंचे वैचारिक वस्त्रहरण आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार गुंडाळून ठेवले आहेत, त्यामुळेच त्यांच्या सभांमध्ये अल्ला हो अकबर आणि हजरत टीपू सुलतान की जय… च्या घोषणा होतात, असा घणाघात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. फडणवीस हे ठाकरेंचे विरोधक आहेत, ते अशा प्रकारची टीका करणारच. परंतु त्यांचे मित्र असलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत फडणवीसांनी केलेल्या मतावर शिक्कामोर्तबच केले आहे. उद्धव ठाकरे कधी अडचणीत सापडले तर धावून जाणारा मी पहिला असेन असे नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांची कोलांटी क्षमता सिद्ध केलेली आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अशी कोलांटी मारणारच नाही, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पवारांनाही हे माहीत आहे. त्यामुळे शरद पवारांनी या मुलाखतीच्या माध्यमातून ठाकरे हे काँग्रेसी विचारांचे आहेत, असे सांगून आणि विलिनीकरणाची शक्यता व्यक्त करून ठाकरेंच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा