24.5 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरसंपादकीयवैयक्तिक किंमत चुकवण्याची वेळ आली आहे का?

वैयक्तिक किंमत चुकवण्याची वेळ आली आहे का?

Google News Follow

Related

नेपाळमध्ये सत्तापालट झालेला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा आणि फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकॉईस बैरु यांनी राजीनामा दिला आहे. एक भारताचा शेजारी देश, उरलेले दोन भारताचे मित्रदेश. जगाची रचना बदलते आहे किंवा बदलवली जाते आहे, असे म्हणता येईल. भारतातील काही विघ्नसंतोषी मंडळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर आहे काय? अशी कुजबुज करीत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींबाबत दुसरी पोस्ट केलेली आहे. गेल्या दहा दिवसांत ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्यांदा ही साखर पेरणी झालेली आहे. हा मामला वाटतो तेवढा सरळ नाही.

अमेरिकेत जो बायडन यांचे सरकार पायउतार झाल्यापासून म्हणजे डेमॉक्रॅट्सचे सरकार गेल्यापासून तख्तापालट मोहीम थंडावली होती. ट्रम्प यांच्या राज्यात असे काही होणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु सत्तेवर कोणीही असला तरी अमेरिकेसारख्या देशाचे जगाबाबत निश्चित असे नियोजन असते, राष्ट्राध्यक्षपदी कोण आलाय यामुळे त्यात फारसा फरक पडत नाही. नेपाळमध्ये तख्त उलथण्यात आले आहे. चीन हे करणार नाही, कारण तिथले पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली त्यांचे कळसूत्री बाहुले होते. त्यामुळे त्यांचे सरकार उलथण्याचे चीनला काहीच कारण नाही. त्यामुळे याचा सूत्रधार अमेरिकाच असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तिथे राजेशाहीच्या पुर्नस्थापनेसाठी आंदोलने झाली होती. परंतु ताज्या जेन-झीच्या आंदोलनात उतरलेली मंडळी त्या मुद्याबाबत मौन होती. त्यामुळे राजेशाही हा मुद्दा असण्याची शक्यता नाही. तो असता तर कदाचित या मागे आपल्या रिसर्च एण्ड एनालिसिस विंगचा हात आहे, अशी चर्चा झाली असती.

हे ही वाचा:

नेपाळनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार; २०० हून अधिक लोकांना अटक

पंजाबमधील आप आमदार विनयभंग प्रकरणी दोषी

ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?

नेपाळ हिंसाचार : तुरुंगातून ६ हजार कैदी फरार!

पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे तिन्ही देश भारतीय उपखंडातील. ज्याला ढोबळ मानाने साऊथ एशिया म्हणतात. त्यामुळे भारताचा नंबर कधी लागणार, याकडे डोळे लावून बरेच लोक बसले आहेत. लोकशाही मार्गाने मोदींना हटवण्याचे प्रयत्न थकल्यानंतर आता कोणाच्या तरी कृपेने देशाची सत्ता आपल्या भिक्षापात्रात पडेल, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी वरचे वर परदेशात जात असतात. काही गोपनीय गाठीभेटी घेत असतात. ते अलिकडे मलेशियातील लॅंगकावी बेटावर जाऊन आले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना हा दौरा झाला होता. अशा प्रत्येक दौऱ्यात त्यांच्या गाठीभेटी गोपनीय असतात. त्यामुळे ते मलेशियात कोणाला भेटले हे समोर आलेले नाही.
व्यापार कराराच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. वाणिज्य सल्लागार पीटर नावारोव, वाणिज्य मंत्री हावर्ड ल्युटनिक तोंडाला हगवण झाल्यासारखी विधाने करतायत. भारताला गुढग्यावर आणण्याची भाषा केली जात आहे. हा प्रकार सुरू असताना नेपाळमध्ये तख्तापालट झाला. त्यामुळे पुढचा नंबर भारताचा आहे का, असा सवाल चर्चिला जाणे अस्वाभाविक नाही.

मोदींनी जाहीरपणे असे सांगितले आहे की, देशाचे कृषीक्षेत्र, लघुउद्योग क्षेत्र अमेरिकेसाठी खुले केले जाणार नाही, याची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागेल, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे.

एखाद्या देशाचा शीर्ष नेता अशा प्रकारची विधाने करतो तेव्हा ती विश्लेषकांकडून अत्यंत गंभीरपणे घेतली जातात. भारतात तर हे प्रयोग दोन वेळा झाले आहेत. शेतकरी आंदोलन आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक. दोन्ही वेळा परकीय शक्तीनी भारतात हस्तक्षेप कऱण्याचा प्रय़त्न केला. दोन्ही वेळा मोदी त्याला पुरून उरले असले तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. या देशात आजही काँग्रेसने पोसलेली इको सिस्टीम मजबूतीने उभी आहे. काँग्रेस पक्ष दुर्बळ झाला आहे, परंतु ही इको सिस्टीम मात्र आपली शक्ती राखून आहे. वेळोवेळी या इको सिस्टीमला बाहेरुन टॉनिक मिळते.

बायडन प्रशासनाच्या काळात दक्षिण आणि मध्ये आशियाचा असिस्टंट सेक्रेटरी अशी जबाबदारी असलेला अमेरिकेतील डोनाल्ड लू नावाचा अधिकारी तख्तापलट मोहीमेवर असायचा. भारतात सुद्धा त्याने बरेच हातपाय मारले होते.
मोदी देशाचे पंतप्रधान आहे. देशातील गुप्तचर संस्था देशाच्या पंतप्रधानाचे कान आणि डोळे असतात. देशात लोकनियुक्त सरकार उलथवण्यासाठी ताकद लावली जात आहे, हे त्यांनाही माहीत असणार. व्यापार कराराच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या वाटेल त्या शर्ती मानत नाही, ही बाब स्पष्ट झाल्यानंतर हे प्रयत्न अधिक जोरात सुरू झाले. ते पंतप्रधानांच्या कानापर्यंत पोहोचले, त्यातूनच याची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागेल, असे मोदी म्हणाले असावेत.

दोन्ही देशांचे संबंध प्रचंड ताणले गेले असताना डोनाल्ड ट्रम्प अचानक शांत झाले. त्यांनी भारताच्या विरोधात सुरू असलेली आदळआपट बंद केली. दोन वेळा ट्रुथ सोशलवर भारत आणि मोदींबाबत साखर पेरणी करणारी पोस्ट केली हा मामला काही पटत नाही. भारताला माफी मागावी लागेल, नंतर ट्रम्प ठरवतील की निर्णय काय घ्यायचा, ही त्यांचा वाणिज्य मंत्री हावर्ड ल्युटनिकची भाषा, परंतु ट्रम्प पुन्हा माय फ्रेंड मोदीचे कौतूक करायला लागेल आहेत. ‘व्यापार करारात जे काही अडथळे आहेत त्याबाबत दोन्ही देशांत वाटाघाटी सुरू आहेत. येत्या आठवड्यात मी मोदींशी चर्चा करेन. दोन्ही महान देशात लवकर व्यापार करारात कोणतीही अडचण नाही.’

व्यापार करारातील अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देश प्रय़त्न करतायत, असे ट्रम्प म्हणाले आहेत. परंतु अमेरिकेच्या मनासारखा व्यापार करार करण्यात मोदी नावाचा माणूसच अडथळा असेल तर? अमेरिका हा भरवशाचा देश नाही. स्वार्थ साधण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचा त्यांचा इतिहास आणि वर्तमानही आहे. आजवर अमेरिकेला न जुमानणारा किंवा त्यांच्या राजकीय स्वार्था आड येणारा प्रत्येक नेता त्यांनी अत्यंत निर्दयपणे सत्तेवरून दूर केला आहे.

लोक राष्ट्रपती भवनात किंवा पंतप्रधान निवासात शिरून जाळपोळ करतायत, असे दृश्य श्रीलंकेत दिसले, बांगलादेशात दिसले, नेपाळमध्ये दिसले, तेच दृश्य लोककल्याण मार्ग अर्थात भारताच्या पंतप्रधान निवासात झालेले पाहण्यासाठी बरीच मंडळी आसूसलेली आहेत. मोदींचे न झुकणे महासत्तांना रुचत नाही. त्यांना अशा नेत्यांना हाताळणे जमत नाही. ते त्यांना उखडून फेकत असतात. भारतात तसे प्रयत्न झालले आहे. पुन्हा होणार नाहीत, याची कोणी खात्री देऊ शकत नाही.

ट्रम्प यांचे बदललेले वागणे ही अफजल खानाची मिठी असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. मोदींचा ताठ कणा आणि ताठ मान दोघांची अमेरिकेला एलर्जी आहे.
सोशल मीडिया बंद झाल्याचे निमित्त होऊन नेपाळची तरुणाई रस्त्यावर येते आणि क्रांति घडते यावर शहाणा माणूस विश्वास ठेऊ शकत नाही. जगाचा इतिहास तसा नाही. अशा उद्रेकाच्या मागे एखादे सेंट मार्टीन बेटांचे कारण असतेच. दाखवण्यासाठी शंभर कारणे असू शकतात. नेपाळमधील नेत्यांचा भ्रष्टाचार, त्यांच्या पोराबाळांचे चैनीत राहणे, बेरोजगारीचा भस्मासुर ही जी काही कारणे आहे, ती गंभीर आहेत. परंतु नेपाळसारख्या गरीब देशांमध्ये असे प्रकार घडतात, तेव्हा त्याचे रिंगमास्टर बाहेर कुठे तरी बसलेले असतात.

अमेरिकेच्या मालकीचा सोशल मीडिया हेही महासत्तेच्या हाती असलेले हत्यार आहे. नेपाळच्या निमित्ताने हे पुन्हा सिद्ध झालेले आहे. हाच सोशल मीडिया वापरून भारतात बांगलादेश, नेपाळची पुनरावृत्ती घडवण्याचे प्रय़त्न होतील हे मोदींना माहिती आहे. मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागेल, हे त्यांचे शब्द टाळ्या घेण्यासाठी पेरलेले वाक्य नाही. येत्या काळात याची प्रचिती आपल्या सर्वांना येणार आहे. वार करण्यापूर्वी समोरचा गाफील असेल तर बरेच असते. ट्रम्प यांची साखर पेरणी तसाच प्रकार नसेल याची हमी आज कोणी देऊ शकत नाही. इट मे बी डेंजरस टू बी अमेरिकाज एनिमी, बट टू बी अमेरिकाज फ्रेंड इज फेटल. हे अमेरिकेचे दिवंगत परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजरचे विधान कोणताही शहाणा नेता विसरू शकत नाही, त्यामुळे ट्रम्प जेव्हा जेव्हा मोदींना माय फ्रेंड म्हणतात, तेव्हा मोदींनी हे वाक्य ‘जागते रहो’ असे ऐकायला हवे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा