25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरसंपादकीयते फेक नरेटीव्ह पेरणारच, तुमच्या सत्यकथांचे काय झाले?

ते फेक नरेटीव्ह पेरणारच, तुमच्या सत्यकथांचे काय झाले?

तुम्ही जे नरेटीव्ह लोकांसमोर सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केले, त्यांना तरी तार्कीक शेवटापर्यंत न्या

Google News Follow

Related

संसद ते विधिमंडळ सर्वत्र फेक नरेटीव्हचा सुळसुळाट आहे. विरोधकांच्या नरेटीव्ह अस्त्रावर सत्ताधारी सतत बोलतायत. परंतु प्रत्यक्षात या अफवा पसरवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका फेक नरेटीव्ह प्रकरणी उबाठा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत खडसावले, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असा दम दिला. कारवाईची घोषणा केली खरी, प्रत्यक्षात कारवाई कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. कारण यापूर्वी अशा अनेक घोषणा झाल्या, परंतु पुढे प्रत्यक्षात काहीही होत नाही, असा अनुभव आहे. महायुतीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी अनेक प्रकरणात एसआयटीची घोषणा केली. काही प्रकरणे सीबीआयकडे सोपवली होती. ही सगळी प्रकरण भिजत पडलेली आहेत. त्यामुळे ना फेक नरेटीव्ह प्रकरणी कारवाई होत, ना सत्ताधाऱ्यांनी लावून धरलेल्या प्रकरणातून काही निष्पन्न होत. त्यामुळे अफवा पसरवणारे, घपले करणारे निर्ढावलेले आहे.

विधानसभेत काल पेपरफुटी प्रकरणी भास्कर जाधव यांनी एक व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवला. प्रकरणे स्पर्धा परीक्षांची होती, पेपर फुटीची होती. ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत झाली असा दावा करून भास्कर जाधव मोकळे झाले.

मी ज्या फेक नरेटीव्ह बद्दल बोललो तोच तुम्ही मांडला, पुण्यात अशी एक वेबसाईट सुरू झालेली आहे, तुम्ही देखील व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवला. असे कोणतेही घोटाळे झालेले नाहीत. तुम्हीही शहानिशा न करता मेसेज वाचून दाखवला. मी या प्रकरणी फेक मेसेज पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील खडान् खडा माहिती असते, हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले. मनसुख हिरणची हत्या होत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. हिरणच्या जीवाला धोका आहे, असा इशारा त्यांनी विधानसभेत दिला आणि काही वेळात त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. काल चर्चेदरम्यान पुन्हा याचा प्रत्यय आला.

भास्कर जाधव जो मेसेज वाचून दाखवत होते, तो आधीच फडणवीसांकडे होता. त्याचे उगमस्थानही त्यांना माहिती होते. पुण्यात तरुणांना चुकीची माहिती देणारी वेबसाईट सुरू झालेली असून त्या माध्यमातून पेपरफुटीच्या चुकीच्या, बिनबुडाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, हे त्यांना माहिती होते. मग आधीच गुन्हा दाखल का झाला नाही. धूर निघण्यापूर्वीच हा विषय संपवता आला असता. अशी वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटचा निर्माता, सूत्रधार आतापर्यंत गजाआड व्हायला हवे होते, ते होत नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासारख्यांना संधी मिळते. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ वर झालेल्या पडझड प्रकरणाचा ठपका भाजपा सरकारवर फोडणाऱ्या पत्रकाराला महाराष्ट्र भाजपाने नोटीस बजावली आहे. प्रकरण याच्या पुढे जाणार नाही. नोटिशीमुळे कोणाचे काय वाकडे होते ?

जे विधिमंडळात चालते तेच संसदेत, अग्निवीर प्रकरणी राहुल गांधी धडधडीत खोटं बोलतात. देशाच्या सैन्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. हुतात्मा अग्निवीरांच्या कुटुंबियांना काहीही मिळत नाही, असे फेक दावे करतात. देशाच्या संरक्षण मंत्र्याने त्याचे ऑन रेकॉर्ड दिलेले उत्तर नाकारतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.  भाजपाकडे फडणवीसांसारखे बुद्धीमान नेते आहेत. शिवसेनेकडे एकनाथ शिंदे यांच्यासारखा धडाडीचा नेता आहे. परंतु हे दोघेही नेते वेळ आल्यावर बोलेन, हे वाक्य सतत फेकत असतात. ही वेळ येणार तरी कधी याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता करते आहे.

हे ही वाचा:

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला १०१ वर्षांची शिक्षा

मदरशातून बेपत्ता झालेल्या ९ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन

स्वराज्यप्रेरणा : राजमाता जिजाऊसाहेब

विरोधकांकडे फेक नरेटीव्हचे अस्त्र आहे. त्याचा त्यांनी प्रभावीपणे वापरही केला आहे. परंतु तुम्ही जे नरेटीव्ह लोकांसमोर सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केले, त्यांना तरी तार्कीक शेवटापर्यंत न्या. लोकांची तुमच्याकडून एवढीच मर्यादित अपेक्षा आहे. महापालिकेत शिवसेनेच्या कार्यकाळात हजारो कोटींचा घोटाळा झाला. हा घपला देशातील सगळ्यांत मोठा घपला आहे, असा दावा भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला. राज्य सरकारने याप्रकरणी एसआयटीची स्थापना केली, दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी एसआयटीची स्थापना केली, पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवून आता वर्षभराचा काळ लोटला, पुढे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर आज तरी काहीच नाही, असेच आहे. राज्य सरकारकडे अजूनही तीन महिन्यांचा काळ आहे. या काळात फटाक्यांची माळ लावता येईल. भिजत पडलेली प्रकरणे धसास लावता येतील. सत्य जनतेसमोर ठसठशीतपणे मांडता येईल. सत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला सरकार न्याय करते आहे, हे दाखवून देता येईल. त्यामुळे महायुती सरकारने नरेटीव्हच्या नावाने ठणाणा करण्यापेक्षा सत्ता राबवून दाखवावी. त्यातच खरा पुरुषार्थ आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा