34 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरसंपादकीयट्रेलर आला, सिनेमा येणार नाही

ट्रेलर आला, सिनेमा येणार नाही

Google News Follow

Related

द डे द क्लोन डाईड, हा सिनेमा १९७२ मध्ये येऊ घातला होता. ज्यूंचा नरसंहार हा त्या सिनेमाचा विषय होता. त्याचा ट्रेलर रिलीज झाला. परंतु हा सिनेमा कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. काही देश बुडव्यांनी लडाखमध्ये जो जेन-जीचा ट्रेलर दाखवला आहे, तेच देशभरात करण्याचा त्यांचा मनसुबा असला तरी ते होणे नाही. जे काही लडाखमध्ये झाले आहे, ते देशवासियांसाठी खाड्कन डोळे उघडणार आहे. कट कसे शिजवले जातात, त्यासाठी किती पूर्व तयारी करावी लागते हे जाणून घ्यायचे असेल तर लडाखच्या या उदाहरणाचे विच्छेदन करणे गरजेचे आहे.

पेटवापेटवी करणाऱ्यांना नेहमी भुसभुशीत जमीन शोधावी लागते. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचे त्रिभाजन केले. लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुण होती की, येत्या काही काळात लडाख पेटवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात मोहरे पेरले आहेत. त्यांनी कुरापती सुरू केलेल्या आहेत.

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, इथल्या पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सोनम वांगचुक हे लोकप्रिय व्यक्तिमत्व मैदानात उतरवण्यात आले. विदेशातून जेव्हा एखाद्या देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जातात. त्याची पूर्व तयारी किती आधीपासून केली जाते पाहा. एखाद्याला हेरायचे, त्याला नोबेल, मॅगासेसे पुरस्कार देऊन गौरवायचे. देशविदेशात त्याच्या भाषणांचे आयोजन करायचे, त्याच्या व्यक्तिमत्वाला एक चमक मिळवून द्यायची. हेच बांगलादेशात करण्यात आले. मोहमद युनूस यांना मायक्रो फायनान्समध्ये केलेल्या कामासाठी आधी नोबेल दिले, त्यानंतर त्यांचा बांगलादेशात सत्ता पालटासाठी वापर करण्यात आला.

हे ही वाचा:

भाजपाकडून बिहार, बंगाल, तामिळनाडूत निवडणूक प्रभार्यांची नियुक्ती

सोनम वांगचुक आणि त्यांच्या संस्थेची परकीय निधी कायदा उल्लंघन प्रकरणी चौकशी

युपी: बेकायदेशीर मदरशाच्या शौचालयात ४० अल्पवयीन मुली आढळल्या!

जीएसटी सुधार : उद्योगांसाठी कर भरणे सोपे

सोनम वांगचुक मेकॅनिकल इंजिनीअर (B.Tech.) आहेत; त्यांच्या कारकीर्दीत ते मुख्यत्वे शिक्षण सुधारणा, पर्यावरण आणि पाणी–संकट समस्यांवर काम करत आले. २००९ मध्ये थ्री इडीयट हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात जो फूनसुक वांगडू नावाचा जिनिअस दाखवण्यात आला होता तो हाच. या वांगचूकला २०१८ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्याचे फ्रान्स आणि अमेरिकेत दौरे झाले. भाषणे झाली.

हे महाशय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचे तांडव सुरू असताना त्याविरुद्ध तोंडात मळी भरून शांत बसले होते. कलम ३७० हटवल्यानंतर त्यांना सुरसुरी आली. ते लडाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी आंदोलने-उपोषणे करू लागले. टप्प्याटप्प्याने त्यांनी हा विषय तापवत नेला. एकीकडे चीन हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रात दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना पर्यावरण संरक्षणाचा विचार करून भारताने मख्खपणे बसून राहावे, अशी याची अपेक्षा होती.

उपोषणाच्या माध्यमातून वांगचुक वातावरण निर्मिती करत होता. महाराष्ट्रातही आपण आधी उपोषण, नंतर जाळपोळ आणि दगडफेक हे टप्पे पाहिले आहेत. तेच लडाखमध्ये झाले. वांगचुकच्या १५ दिवस सुरू असलेल्या उपोषणानंतर तेच घडले.उपोषण हे लोकशाहीतील हत्यार आहे. त्याचा राजकीय वापर अलिकडे वाढला आहे. लोकशाही मार्गाने उपोषण करणारे बाकीच्यांना मात्र हिंसेसाठी उकसवण्याचा प्रय़त्न करतायत. तेच वांगचूकने केले. जमावाला हुडी आणि मुखवटे घालून येण्यास सांगण्याचे प्रयोजन काय? तुम्ही जाळपोळ आणि लोकांच्या हत्या केल्या तर ओळख पटू नये हा वांगचूक यांचा उद्देश होता. त्याने जे काही सांगितले तेच घडले. आगीत तेल ओतण्याचे काम काँग्रेसचा स्थानिक नगरसेवक स्टान्झिन तेस्पांग याने केले, फुंटसॉग स्टांझिंग याने हातभार लावला. या सगळ्यांचा संबंध काँग्रेसशी आहे. राहुल गांधी यांच्याशी आहे.

हा सगळा गेम लक्षात घ्या. नेपाळमध्ये जेन झी चे आंदोलन झाल्यानंतर राहुल गांधी पेटले आहेत. देशातील तरुणांनी, विद्यार्थ्यांनी आणि जेन-झीने रस्त्यावर उतरावे असे आवाहन ते वारंवार करतायत. परंतु जे झी काही रस्त्यावर उतरायला तयार नाही. उलट हैदराबाद आणि दिल्लीत या विद्यापीठांच्या निवडणुका झाल्या त्यात जेन-झीने राहुल गांधी यांच्या पक्षाचे थोबाड रंगवत अभाविपला विजय मिळवून दिला.

जेव्हा तुम्ही लोकांना उचकवण्याचा प्रय़त्न करता आणि तो यशस्वी होत नाही तेव्हा कपाळ बडवण्याशिवाय तुमच्या हाती काही उरत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वत:च्या चेल्या चपाट्यांना हत्यार घेऊन मैदानात उतरवण्याचे आदेश दिलेले दिसतात. या लोकांना लडाखमध्ये भाजपाचे कार्यालय, सीआपपीएफची व्हॅन जाळली. काही लोकांचा या हिंसाचारात मृत्यू झाला. काँग्रेसला हेच देशभरात करायचे आहे.

राहुल गांधींना आता खात्री झाली आहे की, देशात आता निवडणुका लढवून ते पंतप्रधान होणार नाहीत. त्यांना या जन्मात सत्ता मिळणार नाही. म्हणून त्यांनी आधी निवडणूक आय़ोगाला बदनाम करण्याचा प्रय़त्न केला. स्पेशल इंटेसिव्ह ड्राईव्हला (एसआयआर) कऱण्याचा प्रय़त्न केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ही काँग्रेसची बी टीम एसआयआरच्या विरोधात वातावरण निर्मिती करतायत. मतदार यादीतील तथाकथित भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात जाण्याचा किंवा निवडणूक आय़ोगाने सांगितल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र देण्याचा सवालच नाही, असे निर्लज्जपणे लोकांना सांगतायत. त्यांना कोणताही गोष्ट सिद्ध न करता, वोट चोरीची कथा लोकांच्या गळ्यात मारायची होती. परंतु लोकांना आरोपांची राळ उडवण्याचे हे तंत्र आता परिचित झाले आहे. राहुल गांधी यांचा खोडारडेपणा पाहून उबगले आहेत. त्यांनी या प्रचाराकडे लक्ष दिले नाही. जेन झी सुद्धा नाही. ही जेन झी काँग्रेसच्या परिवारवादाच्या विरोधात आहे हे अभाविपला हैदराबाद, दिल्लीत मिळालेल्या विजयामुळे स्पष्ट झाले. त्यामुळे आता जेन झीच्या नावाखाली काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरवून अराजक निर्माण करणार, असे संकेत आता लडाखमधील हिंसाचाराने दिलेला आहे.

सत्तातुरांसाठी हिंसाचार आणि जनतेची गळचेपी हे अखेरचे हत्यार असते. जनतेच्या गळचेपीचे हत्यार इंदिरा गांधी आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी यांनी १९७५ मध्ये वापरले आहे. आता इंदिरा गांधी यांचा नातू देशात हिंसाचार निर्माण कऱण्याचा प्रयत्न करतोय का?

लडाखमध्ये झालेला हिंसाचार हा देशातील जनतेचे डोळे उघडणारा आहे. सत्तातुर गांधी परिवार आता कडेला आला आहे. लोकशाही मार्गाने सत्ता मिळत नसेल तर लोकशाहीलाच चूड लावण्याची त्यांची तयारी आहे. देशात हिंसेचा आगडोंब उसळला तरी चालेल, देशात अराजक निर्माण झाले तरी चालेल कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची हे त्यांचे ध्येय. आजीच्या उदाहरणावरून ते काही शिकलेले दिसत नाहीत. सर्वसामान्य माणूस हीच देशातील लोकशाहीची खरी ताकद आहे. तो हे चाळे सहन करणार नाही. कारण त्याने ओळखले आहे की, लडाखमध्ये जे काही झाले ते जेन झीचे नाही तर ‘जेन जी’ चे कारस्थान आहे. जेन जी म्हणजे बनावट गांधींचे जनरेशन.

देश लुटायला ज्यांना सत्ता हवी आहे, त्यांना हा सामान्य माणूसच नेस्तनाबूत केल्या शिवाय राहणार नाही. हा सर्वसामान्य माणूस खंबीर आहे. हे षडयंत्र उधळून लावण्यासाठी सक्षम आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा