30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरसंपादकीयआता आधार संजयबाबा बंगालींचा...

आता आधार संजयबाबा बंगालींचा…

राऊत हे पोपट घेऊन रस्त्यावर बसणारे भविष्यवेत्ते आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Google News Follow

Related

भविष्य, मूठकरणी, भूत-प्रेत, ग्रहपिडा, किया कराया… सबका समाधान. बाबा सुलेमान बंगाली… अशा जाहिराती पूर्वी लोकल रेल्वेच्या डब्यावर हमखास पाहायला मिळायच्या. शिउबाठाचे नेते संजय राऊत अलिकडे या बंगालीबाबांसारखी भाकीतं करत असतात. फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असे भाकीत त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून अशा भाकीतांची जंत्री सादर करणारे राऊत हे शिउबाठाचे नेते, कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत की पोपट घेऊन रस्त्यावर बसणारे भविष्यवेत्ते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या १६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केले. याप्रकरणीचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. संजय राऊत यांचे भाकीत या खटल्याच्या सुनावणीवरच आधारित आहे. न्यायालयाने एकदा व्हेंटीलेटर काढले की सरकारचे रामनाम सत्य, असा राऊत यांचा दावा आहे.

जेव्हा न्याय संजय राऊत यांच्या बाजूने असतो तेव्हा तो न्याय होतो. म्हणजे संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मिळालेला जामीन हा न्याय होता. शिउबाठाच्या मेळाव्याला न्यायालयाने शिवतीर्थावर परवानगी दिली तेव्हा तो न्याय होता. मात्र जेव्हा निकाल यांच्या विरोधात जातो तेव्हा न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव असतो.

अपात्रतेप्रकरणी भविष्यवाणी खोटी ठरली आणि तोंडावर आपटायला झालं तर त्याचीही पळवाट राऊतांनी तयार ठेवली आहे. ‘न्याय व्यवस्थेवर कोणाचा दबाव नसेल तर निकाल आमच्या बाजूने लागणार’, असे राऊत म्हणाले आहेत. राफेल, पेगॅसस, नोटबंदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीनचिट दिल्यामुळे शिउबाठाला पोटदुखी झाली होती. सामनातून करपट ढेकरही देण्यात आले. आता १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी तोंडावर आपटावे लागणार याची राऊत यांना खात्री आहे. त्यामुळेच केंद्र सरकारचा दबाव वगैरे अशी कारणमीमांसा त्यांनी आधीच तयार करून ठेवली आहे. शिउबाठाला जेव्हा दिलासा मिळेल तेव्हा तो न्याय असतो अन्यथा दिलासा घोटाळा.

भविष्य सांगण्याचा धंदा राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार असतानाच सुरू केला. मविआ सरकार २५ वर्षे टिकेल ही त्यांची भविष्यवाणी होती. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील. २०२४ नंतर केंद्रात आमचे सरकार येईल, अशा अनेक भविष्यवाण्या करून त्यांनी माध्यमांना बातम्या पुरवल्या. जनतेचेही जमेल तितके मनोरंजन केले. आता तर परिस्थिती अशी आहे की लोकांना काही मसालेदार मनोरंजन ऐकायचे असेल तेव्हा ते विनोदी सिनेमे अथवा मालिकांच्या वाटेला न जाता संजय राऊत किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तोंडपाटीलकी ऐकत असतात.

यापूर्वी राऊतांची सगळी भाकीतं तोंडावर पडली आहेत. रस्त्यावर पोपट घेऊन बसणाऱ्यांचे भविष्यही कधी कधी खरे होते. परंतु राऊतांचा स्ट्राईकरेट तेवढाही नाही. नया दिन, नई रात या सिनेमात संजीव कुमार या अभिनेत्याने ९ भूमिका केल्या आहेत. एकाच सिनेमात इतक्या भूमिका करणे हा विक्रम होता. असे अनेक प्रयोग पुढे अनेक अभिनेत्यांनी केले. पण हिंदी सिनेमात असा पहिला प्रयोग करण्याचा इतिहास घडवणारा कलाकार म्हणून लोक संजीव कुमार यांनाच ओळखतात.
महाराष्ट्राच्या राजकारणातील संजय कुमार उर्फ संजय राऊत यांनी संजीव कुमारलाही मात दिलेली आहे. पक्षाचे नेते, खासदार, प्रवक्ते, पक्ष नेतृत्वाचे प्रमुख सल्लागार, सामनाचे कार्यकारी संपादक, कंपाऊंडर, महाविकास आघाडीचे चाणक्य, विरोधकांसाठी मुलुख मैदान तोफ आणि बरेचदा भविष्यवेत्ते बंगालीबाबा.

हे ही वाचा:

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

‘त्या’ फेरीवाल्यांचे दादर, कोण आहे गॉडफादर?

सामर्थ्य आहे वाटाघाटीचे!!

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

अलिकडेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रेशीमबाग भेटीनंतर तिथे लिंबू-टाचण्या शोधण्याचा सल्ला सरसंघचालक मोहनराव भागवतांना दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर तिथे लिंब सापडल्याचा गौप्यस्फोट केला होता. ही लिंब खरोखरीच सापडली असतील तर ती ठेवली कोणी? कोणत्या बंगाली बाबाच्या सांगण्यावरून ती ठेवण्यात आली, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला. शिवसेनेत एकेकाळी शिवसेनाप्रमुखांसारखे खमके नेतृत्व असल्यामुळे दत्ताजी साळवी, रमेश मोरे, यांच्यासारखे वाघाचे अवसान असलेले नेते होते. पक्षासाठी हाणामाऱ्या करणारे, तुरुंगात जाणारे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे शिउबाठाच्या राजकारणात वाघ संपले असून आता लिंबू-मिर्च्या आणि किडुक मिडुक भविष्यवाण्या सांगणारे बंगालीबाबा उरले आहेत.

कर्तृत्व गाजवून, मतपेटीतून सरकार आणण्याची धमक नसल्यामुळे उद्धव ठाकरे मागील दाराने मुख्यमंत्री झाले. आता खंजीर खूपसून मुख्यमंत्री बनण्याचे बळही उरले नाहीत. त्यामुळे उरल्यासुरल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी संजय राऊत शिंदे-फडणवीसांचे सरकार जाणार, केंद्रात आमचे सरकार येणार, हिशोब चुकते करणार अशा पडीक भविष्यवाण्या सतत करत असतात. पक्षाला भविष्य उरले नसल्यामुळे तूर्तास वेळ मारून नेण्यासाठी संजय राऊतांच्या भविष्यवाण्यांचाच आधार उरला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

Leave a Reply to विश्वास डिग्गीकर प्रतिक्रिया रद्द करा

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा