29 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरसंपादकीयचांदी थांबता थांबेना दिग्गजांचे अंदाज उताणे पडले, २०२६ मध्ये २०० डॉलर?

चांदी थांबता थांबेना दिग्गजांचे अंदाज उताणे पडले, २०२६ मध्ये २०० डॉलर?

गुंतवणूक करून पैसे वाढवण्याचा राजमार्ग सोने, चांदी, तांब्यात

Google News Follow

Related

चांदीने २०२५ मध्ये सोन्यावरही कुरघोडी केलेली दिसते आहे. वर्षभरात चांदीच्या दरात १५० टक्क्यांपेक्षा जास्त भर पडली. १ जानेवारी २०२५ मध्ये चांदीचा भाव होता ९० हजार ५०० रुपये प्रति किलो. एक औंस चांदीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात २८.८७ डॉलर मोजावे लागत होते. २६ डिसेंबर रोजी हे दर ७८.८४ डॉलर झाले. भारतात प्रति किलो चांदीचा दर होता सुमारे अडीच लाख रुपये झाला. सर्वसामान्य लोकांचे डोळे पांढरे करणारे हे भाव आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते ही फक्त सुरूवात आहे. नामांकीत वित्तसंस्थांची भाकीते उताणी पडलेली असताना २०२६ च्या डिसेंबरपर्यंत हे भाव २०० डॉलर प्रति औस होतील अशी भाकीते काही दिग्गजांनी केलेली आहे.

वर्षभरात चांदी दिडशे टक्क्यांनी वधारली आहे. वर्षभरात झालेल्या दरवाढीत सोन्याला मागे टाकण्याचे काम चांदीने केले आहे. लोकांना ही भाव वाढ अति वाटते आहे. चांदी घ्यायची होती, परंतु राहून गेली असे लोक आता भाव खाली येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ज्यांनी घेतली, त्यांना असे वाटते आहे, की खूपच कमी पैसे गुंतवले आणखी गुंतवणूक केली पाहीजे होती. त्याचे कारण म्हणजे चांदीची ही आगेकूच थांबणार नाही, असे जगातील अनेक तज्ज्ञांना वाटते आहे. ही तर चांदीच्या तेजीची नुकती सुरूवात आहे, असे मत धातू आणि खनन क्षेत्रात काम करणाऱ्या वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अगरवाल यांनी काल व्यक्त केले आहे.

सर्वसामान्यांना चांदीचे दर कडाडल्याचा भास होत असताना अगरवाल यांनी केलेले विधान काही वेळेच संकेत देत आहे. अगरवाल एकटेच नाहीत. जगभरातील नामांकीत तज्ज्ञ हा दावा करतायत. सोन्याचे दर चांदीच्या तुलनेत स्थिर असतात. चांदी प्रचंड वाढली आणि तेवढ्यात झपाट्याने खाली आली असे इतिहासात अनेकदा झालेले आहे. दिवाळीच्या आसपास चांदी १ लाख ९० च्या जवळपास होती. दिवाळीनंतर या किमतीत प्रति किलो ४५ हजारांची घट झाली. चांदीचे दर ज्या वेगाने वाढतात. त्या वेगाने घटतात ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे चांदी आता अडीच लाख प्रति किलोच्या जवळपास असताना काही थोडा फायदा वसूल करतील आणि त्यामुळे भाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दरात काही प्रमाणात घट झाली तरी ती फार काळ टीकणार नाही. चांदीचे दर २०२५ प्रमाणे पुढील वर्षीही चांगला परतावा देतील यावर तज्ज्ञ ठाम आहेत.

हे ही वाचा:

पुढील पाच वर्षांत ४८ स्टेशन्सची क्षमता दुपटीने होणार

जपानचा विक्रमी संरक्षणसंकल्प, ९ ट्रिलियन येनपेक्षा अधिक होणार खर्च

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीत सन्मान

प्रकाश पर्व : साहिबमध्ये संगतची मोठी गर्दी

दरात जी वाढ होते आहे, त्यातील काही घटकांची चर्चा होते आहे. यात मागणी पुरवठ्यात असलेली तफावत, औद्योगिक वापरामुळे वाढलेली मागणी, खाणींमध्ये मंदावलेले उत्पादन असे महत्वाचे घटक आहेत, परंतु त्याही पेक्षा महत्वाचे काही घडते आहे. जे पडद्या मागे आहे, ज्याचा कुणाला थांग लागत नाही. या सुप्त घडामोडींबाबत तज्ज्ञही अंधारात आहेत. अमेरिकेने चांदीचा समावेश रेअर कमॉडीटीच्या यादीत केलेला आहे. चीन मोठ्या प्रमाणात चांदीची साठेबाजी करतो आहे. १ जानेवारीपासून चांदीच्या निर्यातीवर चीनने नवे निर्बंध लादलेले आहेत. चांदीची निर्यात नियंत्रित करण्याचे चीनचे धोरण आहे. चांदीचे दर वाढण्याची जी कारणे समोर येत आहेत, त्याच्या पलिकडे बरेच असे काही आहे, जे लोकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही.

रिज डॅड पुअऱ डॅडचे लेखक रॉबर्ट किओसाकी यांनी सोने आणि चांदीच्या दराबद्दल केलेली भविष्यवाणी न्यूज डंकाने एका व्हिडीयोच्या माध्यमातून मांडली होती. चांदी ५०० डॉलर आणि सोने १० हजार ड़ॉलर प्रति औस असेल असे भाकीत त्यांनी केले होते. त्यांनी या दरवाढीचे टप्पेही दिले होते. २०२६ साठी त्याचे चांदीच्या दरांचे भाकीत २०० डॉलरचे आहे.

किओसाकी सतत अमेरिकी डॉलरच्या विरोधात बोलतायत. तुम्हाला तुमची संपत्ती वाचवायची असेल तर कागदाचे कपटे साठवणे बंद करा. सोने, चांदी, प्लॅटीनम आणि बिट कॉईनमध्ये गुंतवणूक करा असे सातत्याने सांगतायत. किओसाकी चांदीबद्दल अनेक वर्षे बोलतायत. १९६५ मध्ये चांदी एक डॉलरपेक्षा कमी दराने मिळत होती, तेव्हापासून मी चांदी साठवतोय. १० नोव्हेंबरला त्यांनी एक्सवर पोस्ट टाकली होती. चांदी ५० डॉलरच्या पलिकडे गेली, आता पुढचा टप्पा ७० डॉलर. २०३० पर्य़ंत चांदीचा भाव प्रति औस ५०० ड़ॉलरचा टप्पा सहज गाठू शकेल, असेही ते म्हणाले आहेत. करन्सी वॉर या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जिम रिकार्ड्स यांनी २०२६ च्या अखेर पर्यंत सोने १० हजार डॉलर आणि चांदी २०० डॉलर जाईल असे भाकीत केलेले आहे.

९ ऑक्टोबरला चांदीने ५० डॉलरचा टप्पा गाठला होता. तीन महिन्यात चांदीच्या भावात सुमारे ६० टक्क्यांची भर पडली आहे. ही तेजी अभूतपूर्व आहे. अर्थ तज्ज्ञांचे सगळे अंदाज फोल ठरतायत. बड्या बड्यांचे अंदाज थकले आहेत. २०२५ च्या सुरूवातीला द्युकास्कोपी या स्विस बॅंकेने विविध वित्तिय संस्थांचे चांदीबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. २०३० पर्यंत चांदीचे कमाल दर ४५ डॉलरपर्यंत जातील असा अंदाज या बँकेने व्यक्त केला होता. काही नामांकीत वित्तसंस्थांचे अंदाजही त्यांनी दिले होते. गोल्डमन सॅक्सने २०२६ मध्ये चांदीचे दर ३५ डॉलरच्या जवळपास असतील असे भाकीत केले होते. सिटी बॅंकेचे २०२६ साठीचे लक्ष्य ३० ते ३२ डॉलरच्या दरम्यान होते. ही झाली २०२५ च्या सुरुवातीची काही भाकीते.

वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना ऑक्टोबरमध्ये बॅंक ऑफ अमेरिकाने वर्षअखेरपर्यंत चांदी ६५ डॉलरपर्यंत जाईल असे भाकीत केले होते. गुंतवणूकदारांनी हे भाकीत हवेत उडवून टाकले. जे.पी.मॉर्गनने २०२६ साठी चांदीचे दर ५६ डॉलरचे भाकीत केले होते, त्याचेही विसर्जन झालेले आहे.

या सगळ्या मोठ्या वित्त संस्था आहेत. जगभरातील दिग्गज या वित्तसंस्थांसाठी काम करतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडी, अर्थकारणातील बारकावे, राजकारणातील उलथापालथ त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी, त्याचे विश्लेषण करणारी अद्ययावत यंत्रणा या वित्तसंस्थांकडे असते. जगातील अनेक देशांतील महत्वाच्या लोकांशी यांचा थेट संपर्क असतो, सगळ्या बाजूने अचूक माहिती मिळण्याची शक्यता असतानाही या वित्तसंस्थांचे अंदाज कोलमडतायत. कारण असे काही तरी आहे, जे कुणाच्याच लक्षात येत नाही. जे दडवले जाते आहे. काही देश अत्यंत छुप्या हालचाली करतायत. अशा प्रकारे पावले टाकतायत की कोणालाही पायरव ऐकू येऊ नये. रेअर अर्थचा वापर करून जगाला वेठीस धरणारा चीन आता चांदीबाबतही तोच खेळ करतो आहे. अमेरिकाही या खेळात उतरला आहे. भारतालाही त्याची दखल घ्यावी लागणार आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदाराने केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत न राहाता, या तेजीचा भाग होऊन चार पैसे कमवावे, किओसाकीच्या भाषेत सांगायचे तर कागदी कपट्यांच्या मागे न लागता. आपले धन खऱ्या संपत्तीत गुंतवावे. आजूबाजूला काय घडतेय याच्याकडे बारीक नजर ठेवावी.

दिग्गजांनी वर्षाच्या सुरूवातीपासून अखेर पर्यंत २०२५ मधील चांदीच्या भावाचे जे भाकीत केले होते, प्रत्यक्षातील भाव त्याच्या खूपच पुढे गेले. खरे तर ही भाकीते चालू भावाच्या आसपास पण नाहीत. त्यामुळे किओसाकी, अनिल अगरवाल आणि जिम रिकार्ड्स यांच्या भाकीतांचा गांभीर्याने विचार करावा लागतो. किओसाकी चे अंदाज बरोबर ठरतायत. ते अंदाज बरोबर ठरावेत अशी परिस्थितीही आजूबाजूला दिसते आहे. शेअर मार्केटचा फुगा फुटेल असा अंदाज व्यक्त होत असताना लोकांना गुंतवणूक करून पैसे वाढवण्याचा राजमार्ग सोने, चांदी, तांबे या धातूंनी खुला करून दिलेला आहे. २०२५ मध्ये धातूंचा दबदबा राहीला. २०२६ मध्येही तो राहणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा