28 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरसंपादकीयफक्त थयथयाट, की आता तरी रस्त्यावर उतरणार?

फक्त थयथयाट, की आता तरी रस्त्यावर उतरणार?

भाजपाला शिव्या घालण्यामुळे आपली परिस्थिती सुधारेल असा उद्धव ठाकरे यांना अजून विश्वास आहे.

Google News Follow

Related

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांना पटणे आणि पचणे कठीण आहे. देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीवर या घटनाक्रमाचा परिणाम होईल अशी गमतीदार प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी काल दिली. पक्ष सतत गाळात जात असताना फक्त थयथयाट करण्याच्या पलिकडे उद्धव ठाकरे काहीही करताना दिसत नाहीत. थयथयाट आणि कद्रूपणा हीच रणनीती असल्यामुळे यातून काहीही साध्य होताना दिसत नाही.

गेल्या अनेक निकालांनंतर ठाकरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर फक्त त्यांच्या बाजूने निर्णय लागला तरच त्यांचा न्याय संस्थेवर विश्वास असतो, अन्यथा सगळं कसं विकलं गेले आहे. सर्व यंत्रणा कशा केंद्र सरकारच्या गुलाम झाल्या आहेत, असा गळा काढून सर्व रडत असतात.

निवडणूक आय़ोगाच्या निकालावर नजर टाकली तर एक राजकीय पक्ष चालवताना घटनेने स्पष्ट केलेल्या तरतुदी धाब्यावर बसवून हम करे सो कायदा या वृत्तीने पक्ष चालवण्याचा प्रयत्न अंगाशी आला असे म्हणता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून १९९९ मध्ये शिवसेनेचा चेहरा मोहरा कागदोपत्री तरी लोकशाहीवादी दिसेल अशाप्रकारे पक्षाची घटना तयार करून घेतली. २०१८ मध्ये ही घटना बदलण्यात आली. त्यात शिवसेनाप्रमुखांनी केलेले बदल बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षप्रमुख म्हणून सर्व अधिकार केंद्रीत करण्यात आले.

हे बदल पीपल्स रेप्रेझेंटेटीव्ह एक्ट १९५१ च्या तरतुदींना धाब्यावर बसवणारे होते. नवी घटना पक्षांतर्गत लोकशाहीला मारक असल्याची टिप्पणी आयोगाने केलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या घटनेच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होऊ शकत नव्हता. वेळोवेळी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पक्षाच्या विविध आघाड्यांचा तपशीलही आयोगाकडे कधी सादर कऱण्यात आला नव्हता, असा आक्षेप आयोगाने घेतला. म्हणून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची संख्या या निकषावर हा निर्णय झाला.

राम विलास पासवान यांच्या निधनानंतर लोकजनशक्ती पार्टीत हाच पेच निर्माण झाला होता. त्यांचा मुलगा चिराग पासवान विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला. तेव्हाही रामविलास यांचा मुलगा आहे, म्हणून पक्षाचा ताबा चिराग यांना मिळाला नव्हता.

हा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग विकला गेला असल्याची टीका केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा उल्लेख चोर असा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीला श्रद्धांजली अर्पण करून बेबंदशाही सुरू झाली आहे, असे जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दुसऱ्या दिवशी एका खुल्या कारमध्ये उभे राहून उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित केले. रस्त्यावर उतणार असल्याचे जाहीर करण्यासाठी बहुधा ते मातोश्री बाहेरच्या रस्त्यावर आले होते. जमलेले मूठभर कार्यकर्ते साहेब आदेश द्या, आदेश द्या असा गलका करत होते. परतुं या मूठभर लोकांना उद्धव ठाकरे आदेश तरी काय देणार? कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश देऊन त्यांना रवाना करण्यात आले. १९६९ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कारच्या बोनेटवर उभे राहून केलेल्या भाषणाची तुलना करण्याचा मोह ठाकरेंच्या मर्जीतील मीडियाला आवरला नाही. परंतु सातत्याने ही तुलना करूनही उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आसपास सुद्धा पोहोचले नाहीत हे मीडियाच्या लक्षात येत नाही.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर जे काही घडले त्याची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे पुन्हा करतायत. एकनाथ शिंदे आणि भाजपाला शिव्या घालण्यामुळे आपली परिस्थिती सुधारेल असा उद्धव ठाकरे यांना अजून विश्वास आहे. सरकार इतिहास जमा झाल्यानंतर उद्धव यांची परिस्थिती पाहिली तर बुडत्याचा पाय खोलात अशीच आहे. निवडणूक आय़ोगाने तात्पुरते दिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्हही कसबा, चिंचवडच्या पोट निवडणुकीनंतर गोठवले जाणार आहे.

निवडणूक आय़ोगाने दिलेल्या निकाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले आहे. तिथे निकाल विरोधात लागला तर ठाकरे सर्वोच्च न्यायालयाला शिव्या घालायला मोकळे होतील. ठाकरे यांनी देशात आणीबाणी लादल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. लोकशाही संपवण्याचे कारस्थान सुरू आहेत, असा त्यांचा दावा आहे. परंतु त्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांनी मात्र अत्यंत संयत प्रतिक्रिया देत नाव आणि चिन्ह गेल्यामुळे ठाकरेंना काही फरक पडणार नाही, असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

निकी यादवच्या खुनात नवरा साहिलसह त्याचे वडीलही सामील

गिरीश बापटांबद्दल राष्ट्रवादीला चिंता का?

केदार धाम मंदिराचे दार या तारखेला उघडणार

अब्जाधीश बँकर ‘बाओ फॅन’ चीनमधून बेपत्ता,

लोक आपल्याचा मागे आहेत, कार्यकर्ते आपल्याला सोडून गेलेले नाहीत यावर ठाकरेंचा ठाम विश्वास असेल तर मग ते थयथयाट आणि शेलक्या भाषेचा प्रयोग का करतायत? मातोश्री बाहेर जमलेल्या किरकोळ गर्दी समोर भाषण ठोकून त्यांना काय सिद्ध करायचे आहे? मी तुमच्या सोबत लढणार आहे, हे वारंवार सांगून उद्धव ठाकरे लढायला उतरतच नाहीत. महाप्रबोधन यात्रा त्यांनी जाहीर तर केली, परंतु तिचा भार एकट्या सुषमा अंधारे वाहतायत. आजही उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेरच कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. उद्या उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा सिलसिला सुरू होईल. पुढे हळुहळु सगळे थंड होईल. पण उद्धव ठाकरे काही केल्या मातोश्री सोडणार नाहीत, हे निश्चित.

वाईट काळ अजून सरलेला नाही. आता व्हीप म्हणून भरत गोगावले जो आदेश काढतील तो उद्धव गटाचे म्हणवल्या जाणाऱ्या आमदार, खासदारांनाही पाळावा लागेल. मग फक्त आदित्य आणि उद्धवच उरतील. तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट होईल.   देशात आणीबाणी लादली असल्याचा दावा उद्धव ठाकरे करतायत. परंतु या आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची त्यांनी ताकद नाही. कारण माझ्यासोबत जनता आहे, कार्यकर्ते आहेत, हा दावाच मुळात पोकळ आहे. रस्त्यावर उतरण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांनी कधीच गमावलेली आहे.

आता जाता जाता ठाकरेंच्या कद्रुपणाने त्यांच्या सद्यस्थितीत हातभार कसा लावला यावर बोलू. ज्या तरुण आणि बुद्धीमान वकीलामुळे भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकारचे स्वप्न भंगले आणि पुढे महाविकास आघाडीचे सरकार येण्याचा मार्ग प्रशस्थ झाला. त्या वकीलाकडे ठाकरे यांनी धाव घेतली होती. परंतु त्याने ही मागणी झिडकारली. कारण गेल्या वेळी त्याने जो युक्तिवाद केला, त्याची फी सुद्धा ठाकरेंनी त्याला दिली नाही. किंवा सरकार आल्यावर त्याचे काही भलेही केले नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी त्याचे फोन घेणेही बंद केले होते. आता सर्वस्व गमावल्यानंतर पुन्हा त्याची आठवण ठाकरेंना होणे स्वाभाविक होते. परंतु आता फोन न घेण्याची वेळ समोरच्या व्यक्तिची होती. थोडक्यात सांगायचे झाले तर कुऱ्हाडीवर पाय मारण्याची हौस ठाकरेंना इथवर घेऊन आलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा